घर कशाला म्हणायचा हा प्रश्न मला माझं सोलापूरचं घर सोडल्यापासून सतत पडत आलाय. नोकरीनिमित्त मी ज्या ज्या ठिकाणी गेले आहे आणि राहिले आहे ते प्रत्येक घर मला माझं आणि आपलं वाटलं आहे. त्या प्रत्येक घराने मला भरभरून प्रेम आणि यश दिलं आहे. आयुष्य झपाट्याने बदलत गेलं आणि आम्ही एका अश्या देशात आलो, ज्याला आपलं म्हणताना किंवा त्या देशाने आम्हाला आपलं म्हणत असतानाच आम्ही एक मोठा निर्णय घेतला आणि ह्या देशात आमच्या नावाचं एक घर उभं राहीलं. पहिलं घर घेणं हा एवढा भावनिक निर्णय का असतो? विचार करत गेलं की समजतं, ही गोष्ट फक्त एका कागदावर सही करणं असतं का? पैसे देऊन तर आपण भाड्याच्या घरात पण राहतो मग स्वत:च्या नावावर असलेल्या घराची ही ओढ कसली? पृथ्वीवर माणूस उपराच म्हणतात, त्याच पृथ्वीच्या अवाढव्य गोलावर एक ठिपका माझा! मी इथे जगून गेलो, कष्ट करून गेलो, काही कमावून गेलो त्याचं हे प्रतिकात्मक रूप, असा विचार माणसं करत असतील का? की माझं म्हणजे जिथे मला काहीही करण्याचं स्वातंत्र्य! ह्या स्वातंत्र्याची ओढ त्यात असावी. कारण काहीही असलं तरी हा निर्णय भावनेने भरलेले असतो हे मात्र नक्की. मध्यंतरी कुठे त...