घर कशाला म्हणायचा हा प्रश्न मला माझं सोलापूरचं घर सोडल्यापासून सतत पडत आलाय. नोकरीनिमित्त मी ज्या ज्या ठिकाणी गेले आहे आणि राहिले आहे ते प्रत्येक घर मला माझं आणि आपलं वाटलं आहे. त्या प्रत्येक घराने मला भरभरून प्रेम आणि यश दिलं आहे. आयुष्य झपाट्याने बदलत गेलं आणि आम्ही एका अश्या देशात आलो, ज्याला आपलं म्हणताना किंवा त्या देशाने आम्हाला आपलं म्हणत असतानाच आम्ही एक मोठा निर्णय घेतला आणि ह्या देशात आमच्या नावाचं एक घर उभं राहीलं.
पहिलं घर घेणं हा एवढा भावनिक निर्णय का असतो? विचार करत गेलं की समजतं, ही गोष्ट फक्त एका कागदावर सही करणं असतं का? पैसे देऊन तर आपण भाड्याच्या घरात पण राहतो मग स्वत:च्या नावावर असलेल्या घराची ही ओढ कसली? पृथ्वीवर माणूस उपराच म्हणतात, त्याच पृथ्वीच्या अवाढव्य गोलावर एक ठिपका माझा! मी इथे जगून गेलो, कष्ट करून गेलो, काही कमावून गेलो त्याचं हे प्रतिकात्मक रूप, असा विचार माणसं करत असतील का? की माझं म्हणजे जिथे मला काहीही करण्याचं स्वातंत्र्य! ह्या स्वातंत्र्याची ओढ त्यात असावी. कारण काहीही असलं तरी हा निर्णय भावनेने भरलेले असतो हे मात्र नक्की.
मध्यंतरी कुठे तरी ऐकलं की वाचलं, तुम्ही जे फळ खाता, ते तुमच्या नावावर त्याच दिवशी लिहिलेलं असतं ज्या दिवशी त्या फळाच्या झाडाची बी कुणी तरी जमिनीत रोवतं. मग ते झाड त्याचा वेळ घेऊन उगवतं. मग फळांचे ऋतु दर वर्षी फुलून येतात. त्यातल्या कुठल्या तरी एका फळाला माळी तोडतो. कुणाला तरी विकतो. तो कुणाला तरी विकतो आणि असा खरेदी विक्रीचा प्रवास तुम्ही ते खरेदी करून घरी आणता आणि खाता तेंव्हा संपतो. ते तुमच्या नशिबी मात्र खूप आधीच लिहून ठेवलेलं असतं. तरीही त्याला मधला हा प्रवास कारण अनिवार्य असतं.
माझा आणि जयचा प्रवास किती दूरवरचा आहे हे त्याला-मला सोडून कधी कुणाला कळणं शक्य आहे का? असं कधी होत असतं का? ज्याचा त्याचा प्रवास ज्याने त्याने जगायचा, त्यातले खाचखळगे ज्याला त्याला माहिती! बाकीचे फक्त दर्शक, बॅकस्टेजची धावपळ ज्यांनी पाहिलेली नाही ते सारे सारे दर्शक.....
मला ह्या घराच्या कागदपत्रावर सही करताना प्रत्येक वेळी वाटलं, 7 ऑगस्ट 2015 ला पहिल्यांदा माझी आणि जयची जेंव्हा भेट झाली आणि मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला त्याने माझा हात हातात घेतला त्याच वेळी अमेरिका देशात, अरिझोना राज्यात ह्या मेसा, गिल्बर्ट गावांच्या मध्यात असलेलं देखणं घर आमच्या दोघांच्या नावावर झालं असेल का?
सगळं लिहिलेलं असेल का आधीच?
आज ह्या सह्या करण्यास्तव मग आम्ही प्रेमात पडलो, पडत राहिलो, एकमेकांचा हात पकडून प्रवास करत राहिलो, मग घरचे ह्या प्रेमाच्या प्रेमात पडले, आम्ही लग्न केलं, संसाराचं गाठोडं पाठीवर बांधून एकमेकांच्या विश्वासाच्या आधारावर दुसऱ्या देशात आलो, इथे आधीच्या दोन भाड्याच्या घरात संसार सुरू केला. ह्या दोन्ही घरांनी आम्हाला भरारी घ्यायचं बाळ दिलं. आणि आज ह्या छोट्याश्या जागेला आणि घराला आमचं नाव लागलं.
कळायला लागलं तेव्हापासूनच माझ्या डोक्यात माझं घर म्हटलं की एक अशी जागा यायची जिथे पांढर्या रंगाचे स्वच्छ पडदे सावकाश गतीने उडत आहेत. घरात भरपूर पुस्तकं आहेत. संगीताचे सूर त्या घराच्या भिंतींवरून प्रवास करात आहेत. भिंतीला जे कान असतात त्या कानांनी सतत हसण्याचा, प्रेमाचा, उत्तम सिनेमांचा, गप्पांचा, कुकरच्या शिट्ट्यांचा, स्वयंपाकाचा आवाज ऐकला आहे. घराबाहेर सतत चपलांचा ढीग लागतो. घरात जेवण्याच्या पंगतीच्या पंगती उठत आहेत. चहाचे कप रिते होत आहेत. हे स्वप्नातलं घर माझं असलं तरी तिथे येणाऱ्या प्रत्येकाला ती आपली हक्काची जागा वाटते आहे.
कोपर्यात एक सुबक लाकडी डेस्क आहे. त्यावर जुन्या धाटणीचा एक हिरव्या काचेचा, पिवळ्या उजेडाचा लैंप आहे. ह्या कोपर्यात भरपूर मनन, चिंतन, अभ्यास होतो आहे. घराबाहेर एक हिरवीगार बाग आहे. तिथे मी जुन्या पद्धतीचा पोटाशी बेल्ट बांधायच्या वळणाचा झुळझुळता, सैलसर, पांढरा रोब घालून आराम खुर्चीत पहुडलेली आहे. बाजूला एक पालथे ठेवलेले पुस्तकं आहे. केटल चहाने भरलेली आहे. कुणाला कशाची घाई नाहीये. पक्ष्यांच्या चिवचिवाटाने मी एक डोळा उघडून पाहते, झाडांवर पक्षी येऊन बसले आहेत. त्यांच्यासाठी ठेवलेलं मातीच्या भांड्यातलं दाणा-पाणी घेऊन ते उडून जात आहेत.
असं काहीसं चित्र मी इमॅजीन केलेलं. जय आयुष्यात आला तेव्हापासून हे सगळं चित्र, पण आता त्यात मी जयच्या मिठीत असलेली मला दिसत आलेली आहे. संध्याकाळी दिवा लावताना जय आणि मी म्हणत असलेल्या श्लोकांच्या घोषावर हात जोडून देवापाशी बसलेला माझा जय.
ह्या घरात दु:ख, तिरस्कार, द्वेष, अपमान सोडून बाकीचं सगळं आहे! खूप आनंद, समाधान, भरभरून वाहणारी कृतज्ञता, आदर, कला, खाणं, गाणं, पुस्तकं, चित्रे, रंग, फोटोज, खूप लेखक, कवी, विचारवंत, गायक, वादक, पेटी, तबला, तानपुरा, प्रेमाने आणलेल्या किंवा मिळालेल्या वस्तू, सगळंच! सरस्वतीचं घरात प्रसन्न वास्तव्य आणि सरस्वतीच्या पाठीमागून तिचा हात पकडून आलेली लक्ष्मी! माझी आई म्हणते, कष्टाने आलेली, कमावलेली लक्ष्मी कायमचा वास करते. ह्या घरी ह्या दोघींनी असं सहवास्तव्य करावं.
हे आमचं घर पहिल्यांदा पाहायला गेलो तेंव्हा माझ्या डोळ्यात असलेलं घराचं चित्र बरोबर फिट बसलं, खरं तर त्याहून सुंदर! माझा निर्णय आत शिरताच पक्का झालेला. घराच्या मागच्या बागेत, संत्र्यांनी लगडलेली माझ्या उंचीहून मोठी 6-7 झाडं बघून तर वाटलं, हीच ती आपल्या आजवरच्या कष्टांची फळं!
कॅलिफोर्निया फिरताना तिथल्या घरांच्या मी प्रेमात पडले होते. त्रिकोणी, चौकोनी बे डिझाइन्सच्या खिडक्या आणि त्यावर झुलणारे पडदे यांनी मला ठार प्रेमात पाडलं होतं. ह्या घराला ती बे डेन आहे. मी मनात हळूच म्हटलं, “ तुला कसं कळलं रे घरा, की मला हे हवं होतं?”
घरच्यांना सगळं कळवलं तेंव्हा आशीर्वाद, अभिमान, कौतुक, कुतूहल, किती काय काय आमच्या आईवडीलांनी आम्हाला पाठवलं. आम्हा उभयंतांची ओटी तिथेच काठोकाठ भरून गेली. पण त्यांच्या नकळत आम्ही त्यांच्याकडून आणखीही काही घेतलंय, जे या घरात आम्ही रूजवणार आहोत. अगत्यशीलता, आदरातिथ्य, कृतज्ञता, परोपकार, एकमेकांवरचं प्रेम हे सगळं सगळं आम्ही दोघेही आमच्या सांगली आणि सोलापूरच्या घरातून गुपचूप घेऊन आलो आहोत. ते सगळं आता ह्या घरी रूजवणार आहोत.
ह्या आधी जय, सांगलीतलं घरं, मग सोलापूरचं हॉस्टेल, म्हैसूरच इन्फोसिसचं हॉस्टेल, हिंजेवाडीतलं घर, अमेरिकेत टेंपीमधील एक घरं असा प्रवास करून इथवर आला आहे. माझा, सोलापूरातलं घर, मुंबईतलं घर, हिंजेवाडीतलं घर, कोथरूडचं घर, शनिवार पेठेतलं घर असा प्रवास झाला आहे.
दोघांचा मिळून ह्या आधीचं टेंपीमधील एक घर, मग फिनिक्समधलं घर असा छोटा प्रवास आहे. ह्या सगळ्या घरांचे आमच्यावर ऋण आहे. ही घरं, इथली माणसं सगळ्यांनी आम्ही आता जिथे उभे आहोत तिथे उभं राहायला बळ दिलं आहे. ह्या घरात पाय ठेवताना मी ह्या सगळ्या घरांचं स्मरण व्यक्त केलं आहे. त्या घरांवर आमची नावं नसली तरी तिथल्या भिंतीवर आमच्या आठवणी कायमच्या कोरलेल्या आहेत.
ह्या सगळ्या पलीकडे ह्या आमच्या घराला आमचा असा एक एलिमेंट असेल. जयप्रज्ञाचा! आम्ही एकमेकांवर करतो ते प्रेम ह्या घराच्या भिंतींना ओथंबून टाकणार आहे. आम्हाला एकमेकाप्रति जो अतीव आदर वाटतो तो ह्या घराचा पाया असणार आहे. आम्हाला आयुष्याप्रती जी काठोकाठ कृतज्ञता वाटते, त्याचं छत डोईवर असणार आहे.
चावी हातात घेताना, सोलापूरचा वाडा माझ्या डोळ्यातल्या अश्रूंमधून वाहत राहिला. परवा सोलापूरला गेलेले, तेंव्हा त्या घराच्या छताची एक ढपली माझ्यासमोर पडली. माणसांनी भरलेला तो वाडा आता फार शांत झालाय. चाळीस माणसांच्या घरात आता मागे फक्त सहा माणसं राहिली आहेत. मला कुणी घर म्हटलं की तोच वाडा डोळ्यासमोर येतो. त्याचं भवितव्य काय मला माहिती नाही. पण ह्या माझ्या नव्या घरावर मला मी सोलापूरच्या वाड्यावर केलं तसं भरभरून प्रेम करता यावं. आयुष्यात 6-7 वेळेस पत्ते बदलले तरी मला माझा वाडा जसा घर म्हणून प्रेमाने आठवतो, तसं आम्हाला आणि आमच्या मुलांना हे घर स्मरणीय राहूदे.
माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांच्या बदल्यांमुळे बरीच घरं बदलली, तर माझ्या आईने लग्नानंतर 18व्या वर्षी जी आमच्या वाड्याची पायरी चढली, त्यानंतर ती बाहेरच पडली नाही. दोघींची सुखदुःख वेगळी, आयुष्यं वेगळी. मिळेल त्या घरावर जीव ओतून प्रेम करणाऱ्या आणि घराला घरपण देणार्या ह्या दोन स्त्रिया! त्या दोघींनी त्यांच्या आशीर्वादाचे हात माझ्या डोक्यावर ठेवले आहेत. त्यांच्यातली माया आणि ममत्व आम्हाला पुढे नेता यावं.
लहान वयात घर सोडून एयरफोर्ससाठी बाहेर पडलेले माझे सासरे आणि ज्या घरात जन्म झाला त्याच वाड्यात आजतागायत अडचण असूनही राहणारे माझे वडील, दोघांच्या कष्टाचा प्रवास वेगळा पण कष्ट तेवढेच, चाललेल्या वाटांवरच्या खस्ता सारख्याच, घराला नाव लावण्याच्या कागदावर घर मालकाच्या ब्रॅकेटपुढे, “प्रज्ञा ज्ञानेश्वर जोशी” आणि “ जय किरण शेटे” लिहिलेलं होतं. त्या कागदावर आणि घरावर आमच्या वडीलांची नावं नव्हती, त्या दोघांच्या कष्टाने पार केलेला एक दूरचा प्रवास होता.
आमच्या पहिल्या घराचं हे पुष्प दोन्ही आईवडीलांच्या चरणी सादर अर्पण! ते इकडे कधी येऊन घराची शोभा वाढवतील ह्याची आता आस लागली आहे.
हयात नसलेल्या जयच्या आजी-आजोबांची, माझ्या आजोबांची, आणि आमचं सगळं कौतुक पाहणाऱ्या माझ्या सोलापूरच्या आजीची प्रकर्षाने आठवण येते आहे. “भल्याची पुण्याई उभी तुझ्या मागं!” त्यांनी पुण्याईची गाठोडी कमावली आणि आमच्यासाठी ठेवून गेले. त्याच्या बळावर आमच्या जगात मोठ्या उड्या!
बाकी इथल्या आणि तिथल्या सगळ्या मित्रपरिवाराच्या प्रेमाशिवाय कुठलाही आनंद पूर्णत्वाला कसा जाईल? अमेरिकेत असलेल्या मित्र परिवाराने भरभरून प्रेम करून भारतातल्या परिवाराची उणीव भरून काढली आहे. त्यांना मित्र म्हणणं चूक ठरेल, ते आमचं कुटुंबच आहे. स्नेह असाच राहूदे आणि वृद्धिंगत होऊ देत.
1424 , लेट्स गो !
- प्रज्ञा जय
Comments
Post a Comment