Skip to main content

Posts

Showing posts from February, 2025

शिवपार्वती पतये

  ज -  माझ्या आवडत्या देवांत महादेव सगळ्यात वर आहेत. प्र -  का रे? ज -  शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. तिला काही झालं तर ब्रम्हांड उलथं पालथं करून टाकतात. वैराग्यवस्था फक्त तिच्यासाठी टाकून गृहस्थ होतात. मला त्यांचं प्रेम माझ्या खूप जवळचं वाटतं. प्र -  तू तसाच आहेस न म्हणून! ज - ओहोहो ! बिग वर्ड मई बिग वर्ड !! प्र -  अरे खरंच की. प्रेम करणं तर झालंच पण व्यक्तिशः पण शिवतत्व जागृत आहे तुझ्यात. जगाच्या टीका वा कौतुकाची पर्वा नसलेला. आपल्या स्पेसमध्ये ध्यानस्थ असल्यासारखा आपलं काम करत राहणारा. ना आपलं कर्तृत्व कुणाला सांगणारा ना कधी कौतुकाची अपेक्षा करणारा, किंचित गर्व नसणारा. अतिशय कंटेंट असलेला माझा शिव! ज -  त्याचं कारण माझ्या आजूबाजूला आहे. माझी शक्ती मला इतकं दणदणीत साजरं करते की मला कधी दुसऱ्याच्या कौतुकाची गरजच पडत नाही. तिने माझा हात पकडला की जगात काहीही करू शकेन एवढा आत्मविश्वास आपोआप येतो. जगाचे लाख शब्द आणि मईचा एक शब्द असा रेशो आहे. त्यामुळे मी शांत, समाधानी, कंटेंट राहणं साहजिक आहे. देवीतत्वासोबत राहतो मी, कुणाच्या टीकेची काय पर्वा मला! परत सांगतो...

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...

मातीतला कवी

मातीत लोळणाऱ्या, त्यातच मोठ्या झालेल्या माणसाला एकदा कविता सुचली. त्याच मातीत, त्याच मातीवर त्याने ती लिहून काढली  मग दुसरी सुचली. आभाळ, पाणी, दुष्काळ, गवत, करपलेली पिकं, झाडाशी लटकणारे गळे, कर्जाच्या पावत्या, घामेजलेले काळवंडलेले चेहरे आणि सदरे, रापलेल्या बाया, राकटलेले बाप्ये... हे सगळे सगळे एक एक कविता देऊन गेले त्याला. का लिहीत होता हे त्यालाही माहिती नव्हतं  त्या माणसाचा आता कवी झाला होता. आता जे दिसत नव्हत ते दिसू लागलं. नको तितकं दिसू लागलं. मग डाचू लागलं! मग कवीला भेट मिळालेली अस्वस्थता, त्यालाही भेट म्हणून स्वीकारावी लागली. आणि त्यातुन मग मळणीतून खाली मोत्यासारखे दाणे पडावेत तसे एक एक टपोर शब्द पडू लागले. शेतीत आणि कवितेत फारसा फरक वाटलाच नाही त्याला. मनात उठलेली उबळ बियांसारखी दाबून टाकायची मनाच्या कसदार जमिनीत, मग कधी आसवांचा पाऊस होतो,  तर कधी भावनेचं खत त्याला घालायच.  अस्वस्थ होऊन बियांमधून कोवळं रोप बाहेर यावं  तशी कवितेची प्रेरणा बाहेर येते मग! तिला आंजारायचं गोंजारायचं काही काळ,  मग आपणच आधी मनात मोठं करायचं,  लोकाहाती देण्याएवढं झालं ...