Skip to main content

पुरुष असाही असतो


 

तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.

 

तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.

 

एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं. 


तुझ्याबद्दल बोलताना ती नेहमी हसून बोलते. एकदम भानावर आलो. ते डोळे, ते हसू, ते केस, ते गाणं आपलं नाहीये. त्यात तू आहेस भारंभार भरलेला हे जाणवलं. त्या क्षणी तुझा थोडा राग, थोडी इर्शा आणि हेवा वाटला. पण लगेच अपराधी वाटलं. तुमच्यात मी कसा येऊ शकतो? तिच्या आयुष्यात पण मी आत्ता आलोय. तू आल्याच्या किती तरी नंतर, माझी लायकी नाही अशी मुलगी मिळण्याची हे खरंय. मला मान्य करण्यात काही चुकीचं वाटतं नाही.

 

तिने तुझ्यासारख्याच मुलाशीच लग्न करावं. मला तिच्याबद्दल असं वाटण्यापूर्वी तिच्याकडून नेहमी तुझ्याबद्दल ऐकायचो आणि एक जोडपं म्हणून तुमचा खूप आदर करायचो. आजही करतो. हे असं मनात आलं आणि गोंधळ झाला बघ. मुद्दाम नाही कुणी असा विचार करत. तो येतो, प्रेम होतं, त्याला कोण काय करू शकेल. समोरच्याचं आपल्यावर प्रेम नाहीये, ते कधीच होणार नाही हे आठवलं की दुखतं थोडं हे पण कबूल करतो. 


तिच्याकडून कसलीच अपेक्षा नसली तरी मनात कितीदा तरी, तुझ्याआधी मी तिच्या आयुष्यात आलो असतो तर किंवा तुझ्यावर तिचं प्रेम नसतंच तर, किंवा तू कधीच तिच्यावर प्रेम केलं नसतं आणि तुम्ही नात्यात नसताच तर किंवा तुमच्या घरच्यांनी तुमचं प्रेम नाकारून तुमचं लग्नच ठरवलं नसतं तर असे विचार मनात नको नको म्हणताना पण येऊन गेलेत हेही कबूल करतो. म्हणजे मी तुमचं वाईट चिंतत आहे असं नाहीये. तिला तुझ्यासारखा जोडीदार मिळालाय यासाठी सगळ्यात जास्त मी खूश आहे. 


माझा तिच्यावर जीव असेल तर तिचं भलं व्हावं असंच मला वाटायला हवं. त्या भल्यात मी नसलो किंवा माझं भलं नसलं तरी. कारण हेच बरोबर आहे. खूप खूश आहे ती सध्या, लग्न जवळ येतंय तशी आणखी खुलत जात आहे. तिच्या आनंदावर असलं काही तरी सांगून मला विरजण पाडायचं नव्हतं. 


मी तिच्याशी मैत्री ठेऊ नये असं म्हणालास तरी मला मान्य आहे. जोडीदार कोणत्याही मैत्रीपेक्षा महत्त्वाचा! मी फक्त प्रेम केलंय. पण तू तिच्या सुख-दुःखात सहभागी आहेस, तिला होणारी वेदना पण तिच्यासोबत जगतोस, तिच्या कुटुंबाचा भाग आहेस, तिच्यासोबत सगळ्या जबाबदाऱ्या घेतो आहेस, त्या पुर्ण करायला मेहनत करतोयेस. 


तुला मी तिच्या जवळ नसावं वाटलं तर त्यात काही वावगं नाही. मला मान्य आहे. मी अगदी शांततेत निघून जाईन. ती थोडे दिवस मला ओरडेल आणि नंतर तुझ्यासोबत संसारात रमून जाईल.”

 

तिच्या होणार्‍या नवऱ्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, 


“ तिच्याबाबतीत मी पूर्ण सिक्युअर आहे. ती कशी आहे हे मला माहिती आहे. तू तिला हे सांगितलं असतं तर ती चिडली नसती पण तिला तुझ्यासाठी वाईट वाटलं असतं. एवढ्या स्वच्छ मनाची मुलगी आहे.

पण तुला असं वाटतं असेल की मी तिला सांगू नये, त्याने तुमची मैत्री गढूळ होईल तर मी सांगणार नाही तिला. मला तिच्यापासून काही लपवता येत नाही, पण तुझं म्हणणं लक्षात ठेऊन मीच हे विसरुन जाईन. 


तू तिच्या प्रेमात आहेस यात मला आश्चर्य वाटत नाही. ती आहेच तशी, कुणी प्रेमात पडावा, कुणालाही मोह व्हावा अशी! मला आश्चर्य ती माझ्या प्रेमात कशी पडली आहे याचं वाटतं. माझे ग्रह स्ट्राँग होते. माझा श्वास आहे ती. आणि मला तिच्याकडून तू कसा आहेस हेही ऐकून माहिती आहे. त्यामुळे माझा राग नाही तुझ्यावर. काही संबंधच नाही. असे किती तरी असतील ज्यांनी कधी व्यक्त नसेल केलं. 


आम्ही दोघे नात्यात आहोत हे माहिती असूनही कुणी तिला त्रास दिला असता तर मात्र माझा मार खाल्ला असता.  तुला मला सांगावसं वाटलं म्हणजे तुला मी तितका समजुतदार वाटलो यातच सगळं आलं. तुमची मैत्री सुंदर आहे. तिचा तुझ्यावर मित्रा म्हणून जीव आहे. तो तसाच राहूदे. 


तुला मोठा भाऊ म्हणून सल्ला देतो. तिच्यावरचं प्रेम मैत्रिणीवरचं प्रेम म्हणून बघता आलं तर बघ. माझ्यासाठी नाही, तुझ्या होणार्‍या बायकोसाठी. तुझ्या मनात तुझ्या बायकोसाठी शंभर टक्के जागा असावी. त्यात कुणाचाच वाटा नको.ती वेगळी असेल, तिला कुणाशी कंपेअर करू नकोस. त्याहून मोठा अपमान नाही. बाकी तू जाणता आहेस. 


आणि हो मी चहा गाळताना नाही पण पिताना सुंदर दिसतो, समोर टपरी आहे, चहा घ्यायचा का?”


आणि दोघीही हसतात. डोळे पुसत मित्र म्हणतो,

“आज कळलं, ती तुझ्या एवढ्या प्रेमात आकंठ का बुडली आहे ते. इतके दिवस तिच्या प्रेमात होतो, आता तिच्या नवऱ्याच्या आहे. 


बोलून हलकं वाटलं खूप. आता अपराधी वाटतं नाही. तुमच्या लग्नाच्या वरातीत आनंदाने नाचेन आता. आणि हो, माझ्या होणार्‍या बायकोवर पण प्रामाणिक प्रेम करेन. चल चहा घेऊ.”

 

#पुरुष_असाही_असतो     

 


Comments

  1. कधी कधी एखादी सिरीज बघताना हाच विचार येतो यात दाखवले तसे समजूतदार पुरुष खरच असतात का... भारी वाटतं हे वाचून!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जिया रा धाकधुक होये

 जिया रा धाकधुक होये रमाताई विमानात बसल्या आणि कानात हेडफोन्स घातले तर इंग्लीश विंग्लिशमधलं गाणं वाजलं. त्यातल्या काही ओळी ऐकून खरं तर त्यांचे डोळेच भरून आले. “पियाबीन दिल लगे ना मन मा लागे चैन, कैसे जाऊ मै पराये देस” अगदी त्यांच्या आयुष्यावरच बेतलेल्या ओळी वाटतं होत्या.  दिनेशराव गेले त्यालाही आता बरीच वर्षे उलटली होती. अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार!  एकुलता एक आणि हुशार मुलगा पदरात टाकून ते अनंताच्या प्रवासास निघून गेले आणि खरंच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. स्वभावाने त्यांच्यासारख्याच असणार्‍या आणि कुशाग्र बुध्दीच्या त्यांच्या मुलाने, सत्याने वडीलांसारखा हुशार इंजिनियर होऊन आणि त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले.  आयटीची पंढरी मानल्या गेलेल्या अमेरिकेत जाऊन उच्चपदस्थ नोकरी मिळवली आणि रमाताईंनी सत्यजितला वाढवताना केलेल्या कष्टाचे चीज झाले. मागच्याच वर्षी त्याच्यासारखीच गोड, गुणी, हसरी मुलगी त्यांच्या घरी सून म्हणून आली आणि घर पुन्हा हसू खेळू लागलं. अमेरिकेला जाताच सुनेने रमाताईंचा विजा काढायला घेतला आणि, “आई आता वर्षाचे सहा महिने इकडे यायचं. पुढल्या सहा मह...

गुरू ईश्वर तातमाय

  गुरू ईश्वर तातमाय गुरूविण जगी थोर काय त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही. माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही. आजाराने त्रासलेला असल...