मातीत लोळणाऱ्या, त्यातच मोठ्या झालेल्या माणसाला एकदा कविता सुचली.
त्याच मातीत, त्याच मातीवर
त्याने ती लिहून काढली
मग दुसरी सुचली.
आभाळ, पाणी, दुष्काळ, गवत, करपलेली पिकं, झाडाशी लटकणारे गळे, कर्जाच्या पावत्या, घामेजलेले काळवंडलेले चेहरे आणि सदरे, रापलेल्या बाया, राकटलेले बाप्ये...
हे सगळे सगळे एक एक कविता देऊन गेले त्याला.
का लिहीत होता हे त्यालाही माहिती नव्हतं
त्या माणसाचा आता कवी झाला होता.
आता जे दिसत नव्हत ते दिसू लागलं.
नको तितकं दिसू लागलं.
मग डाचू लागलं!
मग कवीला भेट मिळालेली अस्वस्थता,
त्यालाही भेट म्हणून स्वीकारावी लागली.
आणि त्यातुन मग मळणीतून खाली मोत्यासारखे दाणे पडावेत तसे एक एक टपोर शब्द पडू लागले.
शेतीत आणि कवितेत फारसा फरक वाटलाच नाही त्याला.
मनात उठलेली उबळ बियांसारखी दाबून टाकायची
मनाच्या कसदार जमिनीत,
मग कधी आसवांचा पाऊस होतो,
तर कधी भावनेचं खत त्याला घालायच.
अस्वस्थ होऊन बियांमधून कोवळं रोप बाहेर यावं
तशी कवितेची प्रेरणा बाहेर येते मग!
तिला आंजारायचं गोंजारायचं काही काळ,
मग आपणच आधी मनात मोठं करायचं,
लोकाहाती देण्याएवढं झालं की मग लिहून काढायचं
मग कुणी तरी भला प्रकाशक येतो त्याची वहीतून कापणी करुन चांगल्या बाजारात मिळणाऱ्या पुस्तकांच्या बाजारात तिला नेऊन बसवतो.
मळक्या कागदावरून उठून आता ती बुकबाइंडिंग केलेल्या शुभ्र पानांवर विराजमान झालेली असते.
जसं सुपर मार्केटमध्ये हातात उचलेल्या आकर्षक पॅकेजिंगच्या धान्याच्या पिशवीकडे बघून ते धान्य पिकवलेल्या शेतकर्याचे भेगा पाडलेले, काळवंडलेले थकलेले हात आपल्याला दिसत नसतात. तसंच आता कवितेचं झालेलं असतं.
“मातीतला कवी” वगैरे म्हणून बिरुद मिळालेलं असतं.
तो हातात ते कवितेचं पुस्तक घेतो.
त्याने लिहिलेलं शब्द आता त्यालाच परके वाटू लागतात.
आपले असून त्यानं तो परक्यागत जवळ घेतो.
आपल्या हाताचा पानावर डागबिग तर पाडणार नाही म्हणून बिचकतो.
त्याने न दिलेला एक चकाचक सुगंध त्या पानांना येत असतो.
आयुष्यभर धोतर घातलेल्या बापाला अचानक एक दिवशी सुटबुटात स्टेजवर मान्यवरांमध्ये नेऊन बसवलं तर तो कसा बिचकेल तसे आपले शब्द बिचकताहेत का काय ह्या पुस्तकात असंही त्याला वाटून जातं.
मळक्या बांडातच कविता शोभून दिसत होती असंही वाटून जातं.
मग एके दिवशी प्रकाशन सोहळ्याचा घाट घातलेला असतो.
मातीतल्या कवीला त्या झगमगाटात जमिनित गाडून घ्यावसं वाटतं.
सगळे कविवर्य कवितांवर खूप खूप बोलतात.
संवेदनशीलता, खरा कवी, दुःख, बळीराजा, त्याचे भोग, राजकारण वगैरे वगैरे बक्कळ भाषणं झाडतात.
एवढं सगळं कळतंय ह्या लोकांना मग यांना का काही करावं वाटलं नसेल शेतकऱ्यासाठी?
त्याला वाटतं राहतं.
तो फार काही बोलत नाही. मला इथे यायचा मान दिला म्हणून धन्यवाद वगैरे म्हणून गप्प राहतो.
२४ हजाराचं देणं फेडणं झालं नाही म्हणून आत्महत्या केलेल्या तात्याचं प्रेत त्याला आजूबाजूच्या शानदार गाड्या, लाखांचे कॅमेरे, फोन्स, बॅग्स, ह्या सगळ्यात दिसू लागतं.
चोवीस हजार फक्त चोवीस हजार!!!
ह्या सगळ्या झगमगतात अगदी नगण्य!
तात्याच्या जीवासारखे.
आपल्यासारखे!
घुसमाट वाढू लागते.
एसीत पण घाम येतो.
वावरातल्या गार वाऱ्याची आठवण होते.
कवी पळत सुटतो.
मुकाट!
बेभान!
शेत दिसेपर्यंत
मातीत येतो. लोळतो. अंगावर माती लावतो.
मातीला म्हणतो,
“नाही!! तुझ्या पोटातून आलेल्या पिकाला तेवढा भाव,
जेवढा तुझ्यावर लिहिलेल्या कवितेला आहे.
विकली. मी तुझी कविता विकली!!
ज्यांना मातीचा गंधच ठाऊक नाही अश्या बाजारात न्यून विकली.
आता कुठली कविता अन् काय”
मातीतला कवी मातीत डोकं खुपसून खूप रडतो.
मग शांत होतो. खूप शांत.
आता ना त्याला कविता सुचते, ना शब्द.
भावना वगैरे पण उठत नाहीत.
सगळं दाबून जातं. कवीमन दुष्काळात पिक करपून जावं तसं करपून जातं.
कवी राकट दिसू लागतो.
तात्यासारखा, कवीच्या बापासारखा.
त्याचा पुन्हा शेतकरी होतो.
प्रत्येक शेतकरी कविता ना लिहिलेला पण कविता जगलेला एक कवीच असतो.
का एक अख्खी कविताच कदाचित....
हे सगळे प्रश्न मातीत गाडून,
मातीतला कवी “आभाळाएवढा शेतकरी” होतो.
- प्र. ज्ञा. जोशी
Comments
Post a Comment