रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे.
एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली,
“सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!”
मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत.
वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता.
दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती.
आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं अजिबात बंधन नसणाऱ्या, अगणित स्क्रोल करता येऊ शकणाऱ्या सोशल मिडीयाच्या फिड्स प्रत्येकाच्या हातात आहेत. त्या भरायच्या म्हणजे तेवढी चॅनेल्स आली.
तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या, देशातल्या, परदेशातल्या, जगातल्या, परग्रहावरच्या सगळ्या घडामोडींचा आपला ॲक्सेस आहे.
जेवढे टीव्ही चॅनेल्स तेवढी सोशल मीडिया पेजेस, जेवढी वर्तमानपत्रे तेवढे पेजेस, त्याशिवाय इनफ्लुएन्सर, वैयक्तिक पत्रकार, या पक्षाचे त्या पक्षाचे असे हजारो माहितीचे स्रोत!
नाही, एखादी माहिती ही ज्ञानाचा भाग असेल तर तिचा अखंड स्रोत मिळावा. पण बातम्या किंवा निधन वार्ता वाचून आपण “ हे काय आता रोजचंच झालंय” असं म्हणू लागलो तर माणूस म्हणून आपण कुठे प्रवास करतो आहोत?
उगाच मिळत चाललेल्या, बहुतेक वेळेला निरोपयोगी असलेल्या ह्या बातम्यांचं आपण काय करतोय? आपल्या मेंदूत कसं प्रोसेस करतोय हे सगळं? फिल होऊ नये म्हणून ह्रदयाकडे जाणारे त्याचे दोर कापत नाही ना तो?
बरं यात आपण वैयक्तिकरित्या ह्या पेजेसना फॉलो केलं नाही तरी ह्या बातम्या ट्रेंडिंग असतात, त्यांचा रिच तुमच्या वॉलपर्यंत पोहोचणारच आहे.
माणूस म्हणून आपलं किंवा एखाद्याचं जगणं या बातम्यांच्या ढिगाऱ्याखाली कवडीमोल होऊ नये. मला कुणाचीही मृत्यूवार्ता दिसली की त्यांच्या घरच्यांचं काय होत असेल विचार करून डोळ्यात चटकन पाणी येतं. हे असं खूप वाटत राहिलं की निराश वाटू शकतं. आपलं आयुष्य छान चालू असलं तरी एखादी अकाली मरणाची बातमी वाचून आयुष्य क्षणभंगुर आहे असं वाटून ते जगण्याच्या उत्साहावर काही काळ ते परिणामी करू शकतं.
पण म्हणून ते फिलच करून घ्यायचं नाही असा प्रयत्न करणं हे एक माणूस म्हणून मला पटत नाही. तो एक भावनिक आणि सांस्कृतिक ऱ्हास आहे.
सोशल मीडिया वाईटच आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्याचे फायदे सांगताना किती तरी स्वतंत्र लेख होतील. मुद्दा त्या प्रवाहात अकारण मिळत चाललेल्या डेटाचा आहे.
कमीत कमी काय करू शकतो, आपण स्वतःहून जे फॉलो करतोय ते प्रसन्न, पॉझीटीव आहे का हे तपासून घ्यावं. यात माणसं पण आली. सतत रडक्या पोस्ट टाकणाऱ्या किंवा कुणाला तरी उद्देशून काही तरी तिरकस लिहणाऱ्या बाळबोध लोकांना सरळ हाईड किंवा ब्लॉक करावं. हेच न्यूज चॅनल्स किंवा इन्फ्लूएन्सर्स बाबतीतही लागू होतं.
सोशल मीडियावर काही काळ घातल्यानंतर, त्याचा प्रभाव काही काळ डोक्यात चालू राहतो. आधी सोशल मीडियाचा वेळ कमी करावा. ते सोडून वैयक्तिक आयुष्यात इतर भरपूर ॲक्टिवीटी असाव्यात.
वाचन, व्यायाम, संवाद, चालणे,गायन/ नृत्य / चित्रकला इत्यादी कला जोपासणे, स्क्रीनशी संबंध नसलेल्या भरपूर गोष्टी आयुष्यात करणे , एखादं नाटक पाहणे, लाईव्ह परफॉर्मन्सेस पाहणे, आर्ट गॅलरीज धुंडाळणे, नव्या लोकांना भेटणे हा मेंदूसाठी खुराक असतो. आपल्या भावना, संवेदनशीलता , विचार तासून लख्ख ठेवण्याचं काम या गोष्टी करतात.
सगळं जगच यांत्रिक होतंय. आपणच केलंय. आधी सोय असणारं सगळं आता गरज झालंय. चटकन मुव ऑन होण्याचा काळ आहे. संवेदनेतून मुव ऑन होता होता माणूस म्हणून मुव ऑन होऊन आपलं यंत्र नको व्हायला असं वाटतं.
लिहीण्यासारखं बरंच आहे पण हा लेख रिमाईंडर आहे. ह्या सगळ्या यांत्रिकी खडखडाटात माणूस म्हणून आपलं ओलेपण जपून ठेवण्यासाठी जे जे आवश्यक ते सगळं करत राहायचं आहे सांगण्यासाठी हा छोटा रिमाईंडर!
- प्रज्ञा
Comments
Post a Comment