आजवर आम्हा दाम्पत्याला दोनदा मिशेलिन स्टार रेस्टोरेंटमध्ये खाण्याचा योग आला. मजा अशी की दरवेळी खाताना किंवा खाऊन झाल्यावर आम्हाला ते रेस्टोरेंट मिशेलिन स्टार प्राप्त आहे हे कळले आहे. पहिला अनुभव इटलीत घेतला आणि दुसरा सॅन फ्रान्सिस्कोत! पहिलं रेस्टॉरेंट इतकं ऑथेंटीक इटालियन होतं की तिथल्या कुणाला इंग्लिशही येत नव्हतं. तो अनुभव नंतर आज हा सॅन फ्रान्सिस्कोमधील! एक तर ह्या शहरात अप्रतिम चवीच्या पदार्थांची रेलचेल आहे. त्यात हे भारतीय पदार्थांचं रेस्टॉरेंट आणि त्याला मिशेलिन स्टार!! किती सुरेख गोष्ट!
तर! सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आमच्या हॉटेलजवळ पाचच मिनीटांवर हे रेस्टॉरेंट होतं. तिथे फिल्टर कॉफी मिळते हे कळलं आणि तिकडे निघालो. बाहेरून आतील रेस्टोरेंटचा अंदाज येत नव्हता पण आत गेलो तर एक सुरेख सजवलेली स्पेस होती. तिथे बसून नीट निरखल्यावर कळलं की कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये दक्षिण भारताच्या खुणा सांगणार्या वस्तू चित्रे सजवली होती. ते मॉडर्न आणि पारंपरिक मिश्रण इतकं बेमालूम जमलं होतं की ते रेस्टोरेंट नेमकं कुठलं कळत नव्हतं.
आमचा पुढचा दिवस आखलेला होता त्यामुळे जागा नाही तर बार चेअर चालेल म्हणून बार चेअर्सवर बसलो. समोर बारटेंडर अतिशय शांत हसऱ्या चेहऱ्याने पण विलक्षण गतीने कसली कसली सुंदर दिसणारी पेये बनवत होती. अमेरिकेत आल्यापासून मला दारू समोर दिसली की तेवढी भीती वाटत नाही. आधी जरा अवघडायला व्हायचं. इथे दारू पिणाऱ्याला आणि दारूला पण शिस्त आहे का काय असं वाटावं इतके सहज आणि व्यवस्थित लोक मद्यपानानंतर वावरतात. त्यांच्या दैनंदिन आयुष्याचाच तो भाग आहे.
आम्ही चहा आणि कॉफीची ऑर्डर दिली. थोड्या वेळात आपल्याकडे टपरीवर मिळतो तश्या ग्लास मध्ये चहा आणि टिपिकल पितळेच्या ग्लास आणि वाटीत कॉफी सर्व केली गेली. बाहेर पाऊस पडत होता. सबंध शहरात गार वारं सुटलं होतं. आत गरम गरम चहा कॉफी पिताना घशाला “ हाच काय तो स्वर्ग” अशी जाणीव झाली असावी. काय गंमत आहे बघा! समोर दारूचे पाट वाहत आहेत आणि आम्ही ते बघत चहा कॉफी पितोय! तसं पाहल्यास दोन्हीही व्यसनच! फक्त चहा कॉफी चढत नाही म्हणून त्यातला त्यात सोवळ्याचा आनंद!
मेन्यू कार्ड न्याहाळताना शेफने केलेली धमाल दिसत होती आणि राहवलं नाही म्हणून आम्ही एक चाट आणि एक डेझर्ट ऑर्डर केलं. मास्टरशेफमध्ये आपण ज्या रेसिपीज पाहतो तसा काहीसा फिल होता. जे चाट होतं त्यात मेदू वाड्याचा वापर दही वड्यात केला होता. सजावट अफलातून! वर द्राक्षे, योगर्ट फोम वगैरे आणि डेझर्ट वटलप्पन नावाचा एक पदार्थ होता. जो एक कोकोनट कस्टर्ड म्हणजेच नारळाच्या दुधापासून बनवलेलं एक कस्टर्ड, ज्याला साखरेऐवजी गुळाचा कॅरेमल बेस होता. आपल्याकडे गूळ खोबऱ्याचे कॉम्बिनेशन वापरून किती तरी गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्याचा हा मॉडर्न मिशेलिन टेक! काजू आणि बटरस्कॉचची क्रीम बाजूला गुळाचा इंटेन्स फ्लेवर कट करायला सर्व केली होती.
मजेची गोष्ट अशी की त्याच्यावर खाण्यायोग्य फुले पाने यांची सजावट होती. मला शेपूसारखं पान दिसलं आणि जरा गंमत वाटली. वास घेतला तर शेपू, आश्चर्य ताणलं जाऊन मी खाऊन बघितलं तर शेपूच होता!! काय वेडेपणा आहे असं वाटलं, गोड पदार्थात शेपू का घालेल कुणी? जयदेवाने शांतपणे त्याचा पूर्ण तुकडा घेऊन तोंडात टाकला. आणि डोळे मिटून मिटक्या मारून खायला लागला. ते पाहून मी पण तसंच खाल्लं आणि खरोखर तो शेपू एकत्रित घासात चविष्ट लागत होता. कसा काय ते शेफच जाणो.
एवढ्या चकचकीत हॉटेलात वाढलेलं चाट नारळाच्या करवंटीत दिलं होतं आणि काजू-बटरस्कॉच आईस्क्रीम अगदी घरच्या स्टीलच्या पसरट वाटीत दिलं होतं. त्यात वाढणारे वाढपी अमेरिकन, मी वर म्हणाले, त्याप्रमाणे
पूर्व पश्चिम संगम बेमालूम जमला होता. मला ती जागा, जेवण अतिशय आवडल्याने मी गुगलवर शेफ आणि हॉटेलबद्दल सर्च केलं तर पहिल्याच ओळीत कळलं की हे रेस्टोरेंट मिशेलिन स्टार विजेते होतं. बाहेरच्या रांगा, आतला माहौल, सुग्रास खाद्यपदार्थ हे सगळं बघता मिशेलिनची सार्थकता पटत होती.
वेटरने विचारलं, तुम्हाला आवडलं का सगळं? तिला सांगितलं, कॉफी प्यायला म्हणून आलो आणि चार गोष्टी जास्तीच्या खाऊन जातोय. फिल्टर कॉफीसाठी एवढा आटापिटा तिच्या अमेरिकन आत्म्याला काय कळायचा? मी तिला फिल्टर कॉफी अमेरिकन कॉफीपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगितलं तर म्हणाली, मला भारतात कशी पितात सांगशील का? मी तशी ट्राय करते. तिला सांगितल्यावर म्हणाली आजपासून फिल्टर कॉफी प्यायला मला मजा येणार! आणखी एका परदेशी माणसाला देशी गोष्टीच्या प्रेमात पाडून माझा भारतीय आत्मा सुखावला.
अतिशय आनंदात, मिशेलिनचा आणखी एक स्टार अनुभवून त्या सुंदर शहराच्या पुढच्या प्रवासासाठी उभयंता हसत, गात, छत्र्या फिरवत चालू लागलो.
- प्रज्ञा
Comments
Post a Comment