पाहिलंय मी तिला
नैवेद्याकडे घेत असलेला सवयीचा हात मागे घेताना
पाहिलंय मी तिला
मळवट भरलेल्या देवीसमोर कोपऱ्यात उभं राहून थरथरत हात जोडताना
पाहिलंय मी तिला
केसांमधल्या गजऱ्याच्या रिकाम्या जागेवरून हात फिरवताना
पाहिलंय मी तिला
हिरव्याकंच बांगड्याच्यामधून उठून जाताना
पाहिलंय मी तिला
हळदीकुंकू चालू असलेल्या घरासमोरून भराभर चालत जाताना
पाहिलंय मी तिला
रिकाम्या पडलेल्या ओटीच्या पदराची स्वतःशीच गाठ बांधताना
पाहिलंय मी तिला
हार घातलेल्या फोटोकडे रात्र रात्र बघत आसवं गाळताना
पाहिलंय मी तिला
लक्ष्मी यायची म्हणून अडगळीत लपताना
पाहिलंय मी तिला
मंगलकार्यातील हजेरी टाळताना
पाहिलंय मी तिला
जोडवी नसलेल्या पायांनी हळू हळू पावलं टाकताना
पाहिलंय मी तिला
काळ्या मण्यांच्या त्या गळ्यातल्याऐवजी काळ्या दोऱ्यांची माळ घालताना
पाहिलंय मी तिला
वर्षानुवर्षे तिची पूजा चालत असलेल्या देवाला अचानक तिच्या हातचं काहीच चालत नसताना
पाहिलंय मी तिला
पलंगाच्या त्या रिकाम्या बाजूकडे रागानं बघताना
पाहिलंय मी तिला
हजारो उखाणे येत असूनही उसनं हसू आणून गप्प बसताना
पाहिलंय मी तिला
वडाच्या पारावरच्या दोऱ्या घेऊन फिरणाऱ्या बायका निर्जीव डोळ्यांनी बघताना
पाहिलंय मी तिला
तिचा "सौभाग्यवती भव" हा आशीर्वाद "आयुष्यमान भव" मध्ये बदलताना
पाहिलंय मी तिला
सवयीनं अहो म्हणता म्हणता ओठ दुमडताना
पाहिलंय मी तिला
संध्याकाळच्या वेळी घरातून सवाष्ण कुंकू न लावता जाताना पाहून हळहळताना
पाहिलंय मी तिला
तिचं रंगीबेरंगी कपाट पांढर होताना
पाहिलंय मी तिला
लग्नाच्या वाढदिवशी प्रेतासारखी थंड होताना
पाहिलंय मी तिला
आलवणात नसूनही आलवणात असताना
पाहिलंय मी तिला
वर्षानुवर्षे कुंकू लावून खूण पडलेल्या ललाटी काळा इवलासा ठिपका लावताना
पाहिलंय मी तिला
रोज थोडी थोडी सतीच्या आगीत जळताना
~प्र. ज्ञा. जोशी
Comments
Post a Comment