खूप दिवसांचा बोलवत होता म्हटलं जाऊन यावं
अथांग विशाल असलेलं त्याचंही मन जरा राखावं ।
मला पाहून खुश झाला,गडगडाट करीत हसला
हसून हसून कसा पुरता हिरवा निळा होऊन गेला ।
म्हणाला माझ्यावर लिहिणार वगैरे असशील तर आधीच सांग
तुझ्यासाठी सोपा करेन कुणाला न सापडणारा माझा थांग ।
मला शांत शांत बघून तोही झाला अंतर्मुख जरा
म्हणाला धून ऐकशील का थोडी, वाहवू का थंडगार वारा ।
म्हणालीस तर पाण्यालाही सांगतो थोडं खळखळतं संगीत द्यायला
पानांची सळसळ तर केंव्हाचीच तयार होऊन बसलीये साथीला ।
या सगळ्याचा परिणाम म्हणून माझंच मन खदखदून आलं
पोटातलं दुःख कसं मी कसोशीने ओठावरचं थांबवलं ।
त्यावर तिरकस हसत म्हणाला रडायचं तर रडून घे खुशाल आता
तुझ्या जगातल्या लपवाछपवीच्या इथे नकोस मारू बाता ।
ना जाणो कित्येकांची मन ठेवलीत मी नीट राखून
तुझ्याही मनाचा मोती ठेवेन की एखाद्या शिंपल्यात झाकून ।
त्या निरव शांततेत माझ्या हुंदक्याचा आवाज घुमला ।
दुःखाचा पूल तुटून रडण्याचा आवाज त्या आभाळाला भिडला ।
किती वेळ होऊन गेला याची मोजदाद न्हवती
माझं मन मोकळं होईपर्यंत शांतता त्यानंही राखली होती ।
हलकेच विचारलं त्यानं आता कसं वाटतंय?
ओझ्याने भारलेलं तुझं मन आता मोरपिसासारखं भासतंय ।
मी चटकन त्याच्या कुशीत शिरले
डोळे पुसत त्याचे आभार मानले।
आभारप्रदर्शन बघून त्याचा स्वर मात्र जरा भारावला
त्यानं ओळखून घेतलेलं की निरोपाचा क्षण आता आला ।
म्हणाला मला सवय आहे याची तू नकोस वाईट वाटून घेऊ
तुम्हा सगळ्यांची सुख दुःख आम्ही अशीच सांभाळून ठेऊ।
फक्त पुन्हा कधी येशील तेवढं मात्र सांग आता
हजारोंच्या गर्दीतुन वाट काढून तुझी माझी लिहूयात कथा ।
त्याला सोडून निघताना ढगातून हलकेच दोन थेंब येऊन हातावरती ओरघळले
त्यांनाच दौतीत टाकून मी असे कागदावरती उतरवले ।
~प्र. ज्ञा. जोशी
Comments
Post a Comment