रात्रीचा दुसरा प्रहर झाला, शेजारी झोपलेल्या अनयाच्या अंगावर लख्ख चंद्रप्रकाश पडला होता.पण तो वळलेला.एवढ्यातच
त्या कुशीवर वळलेला तिचा अनय! हक्काचा,जगाला ओरडून सांगता येईल असा तिचा अनय! त्याच्या मनात कुठे तरी गाठ
बसलेली.त्यानं आजवर तिला शब्दांनी कधी बोलून दाखवलं न्हवत.पण त्याच्या कुठल्याही कृतीत आजकाल ती न्हवती.
तिच्यातल्या बायकोनं त्याच्या केसांवरून हात फिरवला.रुसून झोपलेल्या त्याच्या शांतचेहऱ्याकडे बघून तिचे डोळे गच्च
भरले.चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात तिला पटकन काही जाणवलं, ती उठली, उठण्याआधी पायातले जाड घुंगरू तिनं
अलगद काढून ठेवलेआणि ती निघाली.भरधाव वेगानं!चंद्राच्या प्रकाशात चमकणारी यमुना बघुन तिचं मन भरून आलं.ती
काठाशी पोहोचली.कृष्ण आणखी यायचा होता…
राधा-कृष्ण!
जगात असणाऱ्या विविध प्रेमांमध्ये सर्वोच्च आणि दुर्मिळ असणार अशारीरीक आत्म्याच प्रेम! त्याला कुठला स्पर्श न्हवता
की कसली हाव न्हवती, कसली अपेक्षा न्हवती की कसली देवाणघेवाण न्हवती, त्याला न कोणत्या नात्याचा बंध होता ना
कोणती भाषा होती. बरोबर आणि चूक यापलीकडल्या जगातली ती भावना, ते जग जिथे आत्म्याचा आत्म्याशी संवाद
घडायचा. आणि म्हणूनच ते पवित्र होतं, राधेच्या डोईवरल्या चंद्रप्रकाशाएवढं पवित्र!
तिच्या मनात घर, अनय, परतीच्या वाटेवरली संकटं असं काही बाही येत होतं…
तितक्यात वेणू निनादली…
त्या स्वर्गीय स्वरांनी तो आसमंत भरून गेला…
यमुनेच संथ वाहणारं थंड पाणी, हिरव्यागर्द वनवेलींनी बहरून गेलेला तो काठ,
चंद्रप्रकाशात स्वर्ग वाटणारं ते दृश्य अन त्यात माधवाचा गोड पावा…
राधेन डोळे गच्च बंद केले….
ती देहभान विसरली…
ती कोण आहे, कुठची आहे, इथून आधीच काय पुढचं काय सगळं सगळं विसरली….
तो समोर आला…
सावळ्या सुंदर त्याला पाहून ती प्रसन्न हसली.
त्यांना शब्दांची गरज न्हवती.
डोळ्यांनी चालणारा तो संवाद अतिशय मनोहारी होता.
डोळ्यांनी फक्त प्रेमाची, समाधानाची, पूर्णत्वाची,कृतज्ञेची देवाणघेवाण होत होती.
कित्येक वेळ वातावरणात ते मंजुळ स्वर घुमत होते.
काही वेळानं सूर्यदेव नभी यायचे होते.
त्यानं बासरी थांबवली.
अन राधेकडं बघत म्हणाला,
“राधे निरोपाची घटका आली, रुक्मिणी अन सत्यभामेचे डोळे उघडण्यापूर्वी मला जायला हवं”
राधेन पूर्वेकडे रागात बघत म्हटलं,
“मला मुळी हा सुर्यच आवडत नाही”
कृष्ण- (हसत हसत) "का ग?"
राधा- "तु नजरेआड होतोस न म्हणून, खूप भीती वाटते तू गेलास की, असं वाटत उद्या मला येताच आलं नाही आणि मी
तुला परत भेटलेच नाही तर?, मग आयुष्याला काय अर्थ उरेल, मग मी मनीच हितगुज कुणाजवळ करू, अस वाटतं, ही
घटका कधी संपूच नये, काळ इथेच थांबावा, माझं आयुष्य इथेच सरावं अन मला मृत्युनं इथे तु सोबत असतानाच मिठी
मारावी"
कृष्ण जोरात हसतो.
राधा-"का हसलास रे?"
कृष्ण- "राधे, रोज रात्री तु असाच चेहरा करून हेच बोलतेस आणि घाबरतेस, तरी आपण रोज भेटतो कि, तसेच उद्या
भेटणार आहोत. आणि अशी हट्टी नको होऊस, सगळ्यात निर्पेक्ष मैत्री आहे ही, त्यावर अपेक्षेचं ओझं नको करुस, चल मी
निघतो"
असं म्हणत तो पावा वाजवत निघाला.
अनाहूतपणे त्याला थांबवण्यासाठी राधेचे हात त्याच्याकडे झेपावले.
तो गेला होता.
ते हात तसेच होते त्याच्याकडे...
जो जवळचा असूनही हक्काचा न्हवता.
तिनं मान वळवून घराकडे पाहिलं.
जिथं हक्काचा असूनही जवळ नसणारा राहत होता.
डोळ्यात डबडबलेली आसवं तिनं केविलवाण हसून दाबली.
भगवान विष्णुंच्या अवतरापुढे, त्या किमयागार भगवान श्रीकृष्णापुढे नाव लागण इतकं सोप्प थोडी न होतं!
राधाकृष्णार्पण.
राधे राधे!!
-प्र.ज्ञा.जोशी
( हा प्रसंग माझ्या कल्पनेत साकारलेला आहे!)
Comments
Post a Comment