Skip to main content

तू “ती” आहेस!!


 जे तुला आजही कळालेलं नाहीये ते त्याला मनुष्यनिर्मितीच्या वेळीच कळालं होतं.

”तो” जन्माला आला आणि हे अद्भुत जग बघून अवाक झाला.ही सृष्टी सर्वप्रथम पाहिल्याच्या आनंदात तो चित्कार करणार

इतक्यात त्याला “तू” दिसलीस,

"आदिमाय!!"

त्याला त्याच्या जन्माचं रहस्य उमगलं आणि एका झटक्यात त्याचा मद ओसरला.मरणयातना सहन करूनदेखील डोळ्यात

प्रेम,माया आणि काळजीने बघणाऱ्या त्या सुंदर अन अगाध शक्तीला अर्थात ‘तिला’ पाहून त्याच्या मनात प्रचंड आदरभाव

आणि भीती उत्पन्न झाली, नवनिर्माण असूनही त्याची शक्ती नवनिर्मिती केलेल्या तिच्यापुढे फिकी पडली.शरीरातून शरीर

निर्माण करूनही ती तितकीच सशक्त,उत्स्फूर्त आणि तेजस्वी होती.त्याला ती जादू वाटली अन त्याच्या मनातल्या पुरुषी

अहंकाराची धग पुरती विझली गेली.

तो पुराणातही डोकावला.तिथेही तेच!जिथे देवांनी हात टेकले तिथे ती दुर्गेचं कधी कालीच रूप घेऊन आली अन तिनं

समस्त सृष्टीला वरदान दिलं.हे बघूनही त्याला स्वतःचा दुबळेपणा मान्य करण्यात कमीपणा वाटू लागला.तिचं अप्रतिम

लावण्य, तिच्यातली प्रचंड ऊर्जा,तिचं तेज, तिचं सामर्थ्य, तिची सहनशक्ती, तिचं पावित्र्य,तिचं देवत्व, तिचं सौष्ठव, तिचं

शक्तिशाली असूनही नाजूक अन मोहक दिसणं हे सगळंच त्याला खलू लागलं.

त्याच्यातला पुरुष जागा झाला अन त्यानं तिच्या अत्यंत मायाळू मनाचा ताबा घ्यायचा ठरवला.तिला बहाल झालेल

नवनिर्मितीच वरदान त्याच्याशिवाय कसं निष्क्रीय आहे हे त्यानं तिला पटवून देऊन तिची कूस दुबळी केली.तिला स्वतःच्या

प्रेमात पाडून तो कसा तिचा स्वामी आहे अन तिनं त्याची कशी सेवा करत राहील पाहिजे हे तिला सतत सांगून तिचं हृदय

दुबळ केलं.जेंव्हा ती त्याच्या पुरती प्रेमात पडली अन स्वतःच सर्वस्व त्याला अर्पण केलं त्यावेळी तिच्या देहावर,

मनावर,इच्छांवर,स्वप्नांवर तिच्याही आधी त्याचाच अधिकार आहे हे भरवून त्यानं तिच्या शरिराला दुबळ करायला चालू

केलं.तिचं पाऊल दुसरीकडे पडायला नको म्हणून सशक्त पूर्णअंगिनी असलेल्या तिला त्यानं अर्धअंगिणी केलं अन तिचं

कर्तृत्ववान पाऊल दुबळ करून टाकलं.ती बाहेर पडली,शिकली की तिच्यापुढे,तिच्या प्रज्ञेपुढे त्याचा पराभव निश्चित आहे हे

तो जाणून होता.म्हणून त्यानं तिला तिचं कर्तृत्व चूल,मुलं आहे हे ठासून सांगितलं अन तिचा मेंदू दुबळा केला.या

संसारमायेत अडकलेली ती भेदरून गेली.त्यानं तिच्या शक्ती झाकून स्वतःचा वांझ पुरुषार्थ तिला सातत्यानं दाखवला अन

स्वतःला खरच दुबळी समजायला लागली.

ती हेच विसरून गेली, की ती अग्निचं तत्व आहे, पाण्याची शीतलता आहे, वाऱ्याची गती आहे,आभाळाची व्याप्ती

आहे,पृथ्वीची माया आहे, ती अन्नपूर्णा आहे, ती दुर्गा,काली,साक्षात सरस्वती,लक्ष्मी आहे,या सृष्टीचं सगळ्यात मोहक अन

सगळ्यात रौद्रस्वरूप ती आहे.

तिला सतत एवढंच सांगून गुंतवण्यात आलं की ती आई आहे,ती पत्नी आहे,ती मुलगी आहे,ती बहीण आहे अन अशी अनेक

नाती ज्यांनी तिला चारित्र्याची भीती घातली, विटाळाची लागण केली, बंधनांची साखळी घातली, तिच्या गुणावगुणांवर घराची

इज्जत आहे, मान आहे असं खोटं भासवून तो स्वतः खुशाल स्वातंत्र्याचा स्वैराचार करत राहिला.ती भोळी त्याला देव मानून

स्वतःच देवीपण विसरली.त्यानं कधी तिला कुमारिका म्हणून बंधनात ठेवलं,तर कधी विधवा म्हणून ती कशी त्याच्याशिवाय

शून्य आहे हे सांगून दडपल.ती सौभाग्यवती आहे म्हणून तिला मान आहे असं भरवून सगळ्या रूढी,परंपरा पुरुषप्रधान

केल्या अन तिच्या आयुष्यातलं सगळ्यात सर्वोच्च श्रेष्ठत्व स्वतःकडे घेतलं.स्वतःच षंढ असणं त्यानं तिला वांझ करून

लपवल.तिला कधी सती व्हायला लावलं तर कधी त्यानं तिला जाळलं.त्यानं तिच्या मनाच,शरीराच, मेंदूच असं काही

खच्चीकरण केलंय की ती आजतागायत स्वतःच विशाल रूप आठवू शकली नाही.

त्याला हे ठामपणे माहितीये, तिच्याशिवाय त्याच्या वासना,भावना शमवायची ताकद कुणातच नाही.त्याच्या डोळ्यांना ती

लागते, त्याच्या कानांना तिचा मधुरध्वनी लागतो, त्याच्या पोटाची भूक शमवायला ती लागते, त्याच्या पायापाशी ठेवायला ती

लागते, त्याच्या हृदयाला रिझवत ठेवायला ती लागती, त्याच्या मेंदूची सारी मर्यादा तिच्यावर येऊन थांबते.त्याच नाव

वाढवायलाही ती लागते, त्याच्या नावाचा अनादर करायलादेखील ती लागते.त्याच्या तोंडून पहिला शब्ददेखील आई म्हणून

येतो अन मरतेवेळी शेवटची कळ सोसताना देखील आई ग असा उद्गार निघतो.त्याच्या तोंडी आरतीदेखील तिचीच अन

शिव्यांची लाखोली ही तिचीच!!

जन्मतःक्षणी जिच्या पायाशी पालथं होऊन तो दंडवत घालतो तिलाच पायाशी ठेवण्याची तो वलग्ना करतो.

तुझ्याशिवाय तो शून्य आहे ग!त्याला अस्तित्वच ते काय? त्याच्या पुरुषी अहंकाराला कुरवाळत त्यानं तुला स्वत्व विसरायला

लावलं.केवळ तुझ्या अजोड प्रेम,समर्पण करण्याच्या गुणांमुळे!तो तुझ्यापुढे सगळ्याच बाबतीत दुबळा आहे.त्यानं

ठरवलेल्या तुझ्या प्रत्येक दुबळ्या गोष्टींना ओरडून त्यांच्या शक्तीची जाणीव करून दे!

तुझ्यातली स्त्री जागी कर!

तुझ्यातली देवी जागी कर!

तुझ्यातली शक्ती जागी कर!

तू आहेस म्हणून हे जग आहे,चालतंय,पळतयं!

ज्याक्षणी तू हे जग पूर्णपणे सोडशील त्याक्षणी ह्या सृष्टीचा अंत होईल!

तुला कमी लेखणाऱ्याला दुर्गा होऊन उत्तर दे!

तुला पायापाशी ठेवणाऱ्याला काली होऊन उत्तर दे!

तुझ्या बुद्धीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्याला सरवस्ती होऊन उत्तर दे!

संपत्तीच्या जोरावर तुझ्यावर मालकी दाखवणाऱ्याला लक्ष्मी होऊन उत्तर दे!

एकदा तू होऊन बघ!

तू काल,आज अन नेहमीच त्याच्यापेक्षा बुद्धिमान,

बलाढ्य,सामर्थ्यवान,तेजस्वी,सुंदर,अगाध,अजोड,विशाल,रौद्र,शीतल,मायाळू आहेस.

एक दिवस “तो” जिच्या स्त्रीत्वाचा हेवा करेल,

तू “ती” आहेस!!

-प्रज्ञा भाग्यश्री जोशी.

Comments

Popular posts from this blog

जिया रा धाकधुक होये

 जिया रा धाकधुक होये रमाताई विमानात बसल्या आणि कानात हेडफोन्स घातले तर इंग्लीश विंग्लिशमधलं गाणं वाजलं. त्यातल्या काही ओळी ऐकून खरं तर त्यांचे डोळेच भरून आले. “पियाबीन दिल लगे ना मन मा लागे चैन, कैसे जाऊ मै पराये देस” अगदी त्यांच्या आयुष्यावरच बेतलेल्या ओळी वाटतं होत्या.  दिनेशराव गेले त्यालाही आता बरीच वर्षे उलटली होती. अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार!  एकुलता एक आणि हुशार मुलगा पदरात टाकून ते अनंताच्या प्रवासास निघून गेले आणि खरंच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. स्वभावाने त्यांच्यासारख्याच असणार्‍या आणि कुशाग्र बुध्दीच्या त्यांच्या मुलाने, सत्याने वडीलांसारखा हुशार इंजिनियर होऊन आणि त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले.  आयटीची पंढरी मानल्या गेलेल्या अमेरिकेत जाऊन उच्चपदस्थ नोकरी मिळवली आणि रमाताईंनी सत्यजितला वाढवताना केलेल्या कष्टाचे चीज झाले. मागच्याच वर्षी त्याच्यासारखीच गोड, गुणी, हसरी मुलगी त्यांच्या घरी सून म्हणून आली आणि घर पुन्हा हसू खेळू लागलं. अमेरिकेला जाताच सुनेने रमाताईंचा विजा काढायला घेतला आणि, “आई आता वर्षाचे सहा महिने इकडे यायचं. पुढल्या सहा मह...

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...

गुरू ईश्वर तातमाय

  गुरू ईश्वर तातमाय गुरूविण जगी थोर काय त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही. माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही. आजाराने त्रासलेला असल...