पहाटेच्या सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच ते दोन तेजस्वी डोळे उघडले.
त्या वातावरणातील तेज सूर्याचं की त्या दोन डोळ्यांचं असा प्रश्न पडावा इतके ते सुंदर,मोहक,टपोरे धारदार नेत्र....
ती उठली...
ज्या पायात गुलामीची, पारतंत्र्याची दोर बांधली होती, त्या पायातले घुंगरू वाजले.
ज्या हातांवर अन्यायाचे वळ उमटले होते, ते तिनं तोड्यानी,पाटल्यानी, बांगडयांनी झाकून घेतले.
प्रत्येकवेळी संतापल्यावर फुरफुरणारे तिचे नाजूक बाहु,जे वेळोवेळी बळांनी शांत केले गेले होते,
त्यावर तिने बाजूबंद चढवले.
आवाज दाबून टाकलेल्या त्या गळ्यावर तिने ठुशी घातली.
स्वतःच्याही मनाची राणी नसणाऱ्या तिने त्याखाली राणीहार घातला.
ज्याच्याविरुध्द संतापाची,अन्यायाची आग छातीत जळत होती ,त्या छातीवर त्याच्या नावाचं भरभक्कम मंगळसूत्र चढवलं.
ज्याचं सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरलं होतं, त्या कम्बरेवर तिनं कंबरपट्टा घातला.
जिच्या भाळी भविष्य लिहायचा हक्क खुद्द तिच्या सटवाईला देखील न्हवता, त्यावर तिनं कुंकू रेखलं.
डोळ्यातील वेदनेच्या, वेदनेनी सांडू पाहणाऱ्या अश्रूंच्या निषेधार्थ तिनं काळ काजळ घातलं.
सगळी आसवं गोळा करून त्यांचा निर्धाराने गजरा माळला.
आतून संतापून उठलेल्या महाकालीला तिने वरकरणी सुमुखी,संयमी श्रीलक्ष्मीच स्वरूप दिलं.
ते नखशिखांत लावण्य नजरेसमोर आलेल्या सुर्यासमोर उभं ठाकल.
ती गर्जली!
"जळतोस तू ही, जळते मीही,
तुझी आग फक्त दिवसाची,
तर माझी दिवसरात्रीची,
तुझ्या अन माझ्यात,
सांग आता प्रभा मोठी कोणाची?"
~प्र. ज्ञा.जोशी

Comments
Post a Comment