काही गाण्यांचा जन्मच मुळी एका गोष्टीसाठी झालेला असतो बहुदा….
सुरवातीच्या काही सेकंदातच ती कानामार्गे शिरून डोळ्यातून घळाघळा वाहायला लागतात.शब्द चालू ही झालेले नसतात,
जरी झाले तरी एखादा शब्द घुसतो असा खसकन हृदयात आणि टचकन डोळ्यांचा रस्ता शोधतो, डोळे घट्ट मिटून तो रस्ता
अडवायचा कितीही व्यर्थ आटापिटा केला तरी तो शब्द वाहून जातोच, कदाचित आणखीनच वेगाने...कारण त्या गाण्याचं
कामच असतं, ह्रदय घुसळून त्यातल्या भावनांना डोळ्यांपर्यंत न्यायचं.
हे असं भडाभडा मोकळं होणं बघून समोरचा गायक ही त्याच्या स्वरांना डोळ्यातून वाहू दिल्याबद्दल रसिकापुढे हात
जोडतो.कदाचित ते स्वर, गाणं असं अश्रुंमध्ये रूपांतरित होऊन आणखी पवित्र होत असावं.
पण तिथून निघणारा स्वर, हृदयात घेऊन,कुठल्याश्या आठवणींच्या बेटावर फिरून, एखादा शब्दाचा ह्रदयात घुसलेला
बाण हळुवार काढून, शरीरावर तो स्वर काट्यांरूपी मिरवून, तेवढ्या वेळापूरता मेंदू शिथिल करून, काळ-वेळ-जागेच
भान विसरून, डोळ्यांवाटे घळाघळा वाहू देऊन आपणच पवित्र होऊन जातो.
प्रत्येकाच्या ह्रदयाचा कप्प्यात असं एखादं गाणं संग्रही असतंच.जे कुठून तरी वर आल्यासरशी जखमा उघडया करून
माणूस असल्याची अथवा मन असल्याची प्रकर्षाने जाणीव करून देऊन जातं.
-प्र.ज्ञा.जोशी

Comments
Post a Comment