Skip to main content

गुरू ईश्वर तातमाय

 



गुरू ईश्वर तातमाय

गुरूविण जगी थोर काय


त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही.


माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही.


आजाराने त्रासलेला असलेला देह इहलोकीच्या प्रवासातून सुटून अनंताच्या प्रवासास गेला तर तो त्रासातून सुटतो हा विचार मेंदूला पटला तरी मनाला पटवून देणं अवघड आहे. बाई गेल्या हा निरोप मी डोळे मिटून शांतपणे ऐकला. डोळ्यातून पाणी येत राहिलं. त्या सिरीयस होत्या त्यामुळे ही बातमी येणारच होती पण नंतर दिवसभरांत खूप हमसून हमसून रडू येत राहिलं.


माझ्या विचारसरणीवर त्यांचा एवढा प्रभाव आहे की माझ्या अस्तित्वाचा एक मोठा भाग कायमचा निसटून गेला असं वाटतंय. माझ्या कोणत्याही मित्र मैत्रिणीशी मी एवढ्या गप्पा मारल्या नसतील तेवढ्या मी बाईंशी मारल्या आहेत. त्या गप्पांमधून माझ्या हाती काय अनमोल विचार लागले हे केवळ मलाच माहिती!


पहिल्यांदा क्लासला गेले त्यावेळी मी नऊ वर्षांची होते. दोन मोठ्या वेण्या आणि फ्रॉक घालून त्यांच्या दारात उभी असलेली मी आणि आतून येत “ तू प्रज्ञा का? ये ये आत ये. बसकर घेऊन बस” असं गोड हसत आत घेणाऱ्या बाई मला लख्ख आठवतात. तिथपासून चालू झालेला प्रवास आम्ही शेवटच्या माझ्या लग्नाच्या रिसेप्शनला भेटलो तिथवर! अमेरिकेतून त्यांना फोन करायचे त्या प्रत्येक वेळी अतिशय आनंदाने आणि कौतुकाने बोलायच्या, माझी बडबड ऐकायच्या.


त्यांचं आयुष्य एका विशिष्ट शिस्तीने आणि कणखरपणाने त्या जगल्या होत्या. मला त्यांच्या माहेरची, आजोळची, सासरची सगळी माणसं माहिती होती. त्यांच्या आठवणी आणि गोष्टी मी कित्येकदा त्यांच्याकडून ऐकलेल्या होत्या. एक मुलगी आपल्या आईवडिलांचा किती छान सांभाळ करून शकते याचा धडा मी त्यांच्या आठवणींवरून शिकले होते. त्यांचं बालपण, मुंबईला घालवलेल्या सुट्ट्या, सोलापुरात होणाऱ्या मैफिली, त्यांना सिद्धेश्वर शाळेत लागलेल्या नोकरीची घटना, त्यांच्या उच्चविद्याविभूषित भावडांच्या कर्तृत्व कथा, एक स्त्री नोकरी करते तेंव्हा काय काय गोष्टी बदलून जातात ह्या सगळ्या आठवणी त्या भरभरून सांगायच्या. त्या कळत्या नकळत्या वयात ह्या संस्काराचा पगडा मनावर बसलेला.


आम्ही सगळे शिष्य, बाई आणि काका सोबत सोलापूरांतल्या गाण्याच्या मैफिलींना जायचो. गाणं ऐकलं पाहिजे, ते कसं आणि का ऐकलं पाहिजे हे बाईंनी शिकवलं. एकेका कलेवर दुसऱ्या कलेचा प्रभाव त्यांनी समजाऊन सांगितला. आमचा गाण्याच्या क्लासचे विद्यार्थी, बाई आणि काका हे आमचं एक छोटं कुटुंबच होतं. अजित दादा आणि अतिंद्र दादाबद्दल आम्ही नेहमी त्यांच्या कर्तृत्व आणि यशाच्या गोष्टी ऐकायचो. त्या दोघांकडे पाहून प्रेरितही व्हायचो.


अजित दादासोबत ते युरोप फिरले. त्यांच्या तिथल्या प्रवासाच्या गोष्टी ऐकून लहानपणी सोलापूर आणि आजोळचं गाव यापलीकडे जग न पाहिलेल्या मला भारावून जायला व्हायचं. त्यावर “प्रज्ञा एक दिवशी तू परदेशी जाशील, तुझे अनुभव सांगशील आणि मी ऐकेन.” असं म्हणायच्या. पुढे मी अमेरिकेला आले आणि त्यांना फोन करे त्या प्रत्येक वेळी त्या म्हणत, “बघ मी म्हणाले होते की एके दिवशी तुझ्या प्रवासकथा मी ऐकेन!”

आयफेल टॉवरच्या वरच्या टोकापर्यंत जाता येतं, तिथे जायला लिफ्ट असते हे त्यांनी सांगितलेलं ऐकून मी डोळे विस्फारले होते. मी स्वतः जेंव्हा आयफेलच्या टोकावर गेले तेंव्हा मला फक्त त्यांची आठवण येत होती. आम्ही बोललेलं आठवत राहिलं.  


त्यांना माझं अपार कौतुक होतं. माझ्या समोर त्यांनी ते कधी केलं नाही. पण आमच्या घराजवळील छोट्या मुलींनी गाण्याचा क्लास लावला. त्यांना त्या माझं उदाहरण द्यायच्या. कौतुक करायच्या. त्या मुली घरी येऊन मला सांगायच्या. ते ऐकलं की कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं.


नोकरीमुळे पुण्याला गेले. आणि गाण्याचा क्लास थांबला. शेवटची विशारदची परीक्षा द्यायची राहिलेली. सोलापूरला गेले की त्यांना न भेटता मी कधीच सोलापूर सोडलं नाही. त्या प्रत्येक वेळी म्हणायच्या , “ तिकडे पुण्यात क्लास लाव पण परीक्षा देऊन टाक.” आणि माझं उत्तर असायचं,” नाही बाई, गुरु बदलायचा विचार केला तरी मला नको वाटतं. कधी तरी योग जुळून येईल आणि तुमच्याकडूनच परीक्षा देईन”


मला नोकरी लागली त्यावेळी मी बाईंना म्हणाले, “आई आणि बाई नसत्या तर मी आज अशी नसते. या यशात तुमचा मोठ्ठा वाटा आहे बाई, मला तुम्हाला भेट घ्यायची आहे, मला काही तरी छान सुचवा.” त्या प्रत्येक वेळी मला हेच म्हणत राहिल्या, “ तू विशारद झालीस की मला आपसूक भेट मिळालीच”  गुरु किती निस्वार्थ असतो याचा चालता बोलता परिपाठ होता त्या!


कित्येक राग, चिजा, ठुमऱ्या, भजनं, भावगीते, अभंग.....

कितीही लिहीत राहिले तरी यादी छोटी पडेल एवढं त्यांनी शिकवलं आहे. मी आजही ती गाणी कधी गात असले की मन लगेच गाण्याच्या क्लासमध्येच जातं. समोर पेटीवर बसलेल्या बाई आठवतात आणि त्यांच्याभोवती गोलाकार बसलेल्या आम्ही सगळ्याजणी!


काका गेले त्यावेळी त्यांना भेटायला गेले. क्लास चालू नसला तर त्या कुठल्याश्या कामात गुंतलेल्या असायच्या. काका दार उघडायचे. आतून बाईंनी काकांना मारलेली हाक ऐकू यायची, “अहो पहा कोण आलंय ते!!” यावेळी बाईंनी दरवाजा उघडला तेंव्हा मला दारांतच हुंदका आला. त्यांना ते कळलं, हातावर थोपटत त्यांनी शांतपणे मान हलवली. काकांशीही माझा वेगळा बाँड होता. त्यांना मोबाईल किंवा लॅपटॉपवर काहीही अडलं की ते क्लास संपायची वाट पाहायचे आणि मला क्लास झाला की विचारायला यायचे. बाईंना मी त्यावेळी म्हटलं, गणराजमध्ये येण्याचं कारण तुम्ही आणि काका आहात. काका राहिले नाहीत पण तुम्ही खूप खूप आणि निरोगी आयुष्य जगा बाई, ह्या घराला कुलूप लागलेलं दिसलं, उघडायला कुणी राहिलं नाही तर लहानपणीच्या सगळ्यात सुंदर आठवणी पुन्हा जागवण्याचा आणि जगण्याचा आमचा रस्ता बंद होऊन जाईल” त्यावर त्यांचेही डोळे भरून आले. कितीही लिहिलं तरी आमच्या त्यांच्यावरच्या प्रेमाला आणि आदराला मांडण्यात शब्दांना न्याय देता यायचा  नाही.


अतिंद्र दादाच्या, अजित दादाच्या लग्नात आम्ही अगदी घरच्यांसारखे सहभागी होतो. तेजा वहिनी, प्रिया वहिनींसोबत तितकाच प्रेमळ बाँड शेअर केला आहे.


गाण्याचा क्लास झाला की मी आणि बाई गप्पा मारत असू. अगदी कशावरही! जगातला कोणताच विषय परका नसे. साहित्य, करियर, शिक्षण, परदेश, संगीत, आयुष्य अगदी सगळं! माझ्या आईचा रात्र झाली म्हणून बाईंना फोन येई तेंव्हा आम्ही दोघी हसू आणि मग मी निघत असे.


“प्रज्ञा आपण हे जे बोलतो ते सगळ्यांना कळलं, समजलं पाहिजे बघ. जगाचं सौंदर्य पाहता आला पाहिजे. प्रवास कशासाठी असतो हे समजलं पाहिजे. शिक्षण पैशासोबत कुठे कामाला येत असतं हे कळलं पाहिजे. आयुष्य असं भरभरून, मानाने जगता आलं पाहिजे” हे सतत म्हणायच्या. त्यांनी “ प्रज्ञा असं कळलं पाहिजे बघ!” हे त्यांचे शब्द आणि त्यामागचा विचार माझ्यासोबत अगदी माझ्या आत मी जपून ठेवलेत.


जयशी लग्न ठरायचं होतं, त्याआधीच एकदा मी त्यांना जयबद्दल सांगायला भेटले. त्यांनी सगळं शांतपणे ऐकलं आणि हसत म्हणाल्या, “ उत्तम स्थळ आहे! मी येईन लग्नाला.” तेंव्हा किती हायसं वाटलं मला. मी त्यांना म्हणाले, “ बोहल्यावर चढण्याआधी आईवडिलांसोबत काही ४-५ लोकांची मला आनंदाने संमती हवी होती. त्यात अर्थातच तुम्ही होतात बाई! मला फार आनंद झालाय.” त्यावर त्या म्हणाल्या,

“तू कधी चुकीचा निर्णय घेशील हे मला खरच वाटत नाही. त्याला न पाहताच तो कसा असेल हे सांगेन मी” केवढा विश्वास! केवढं प्रेम!


संगीतातली गुरु शिष्य परंपरा इतर क्षेत्रातल्या परंपरेपेक्षा जरा वेगळी असते.  आमच्यात संगीतातली परंपराही तितकीच जपली गेली होती आणि वैयक्तिक आयुष्यातही असा दाट स्नेहबंध जुळला होता.


दोन्ही मुलांच्या आणि सुनांच्या कर्तृत्वाने त्यांच्या डोळ्यात नेहमी एक समाधानाची झलक होती. यावर्षी अतिंद्र दादाला सवाईमध्ये गाताना पाहून त्यांची काय भावना झाली असेल हे मी अगदीच जाणून आहे. एका आईसाठी आणि गुरूसाठी किती अतीव अभिमानाचा क्षण! 


एक अतिशय उत्तम, समृद्ध, समाधानी आणि संपन्न आयुष्य त्या जगल्या. त्यांच्या हाताखालून कित्येक विद्यार्थी शिकले आणि त्यांच्या परीस स्पर्शाने समृद्ध झाले. स्वभावाने कणखर असलेल्या त्यांना त्यांच्या प्रिय जणांनी खचून रडलेलं अजिबातच सहन व्हायचं नाही. त्याउलट त्या नेहमी म्हणायच्या, “ देवाने बाकी काही नाही पण भरपूर कष्ट करण्याची ताकद द्यावी” त्याप्रमाणे त्यांच्यावर प्रेम असणाऱ्या लोकांनी त्यांच्यासारखं कणखर, समृद्ध आणि कष्टाने मिळालेल्या यशाचा सुगंध लाभलेलं आयुष्य जगणं हीच खरी श्रद्धांजली असेल.


आमच्या गेल्या जवळपास वीस वर्षांच्या आठवणी, त्यांचे विचार, त्यांची शिकवण मला आयुष्यभर पुरवून वापरायची आहे. मी शेवटचा निरोप द्यायला तिथे नव्हते त्यामुळे त्या आहेत असंच मला वाटत राहणार आहे. मला याच भ्रमात जगायला आवडेल.


यापुढे लावलेल्या प्रत्येक सच्च्या सुरात, 

गायलेल्या प्रत्येक सुरेल रागांत, 

गाणे ऐकून मिळालेल्या कौतुकांत, 

संगीतात आणि आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक यशात, 

आयुष्यात अवघड परिस्थिती आली तर तुम्हाला स्मरून घेतलेल्या कणखर निर्णयात  

तुम्ही सदैव राहाल बाई!  


माझ्या आयुष्याला, गाण्याला आणि विचारांना सुरेख वळण देणाऱ्या माझ्या आदरणीय, वंदनीय आणि प्रिय गुरुस्मृतीस साष्टांग सादर नमन!


तुमची कृतज्ञ शिष्या

प्रज्ञा


Comments

Popular posts from this blog

जिया रा धाकधुक होये

 जिया रा धाकधुक होये रमाताई विमानात बसल्या आणि कानात हेडफोन्स घातले तर इंग्लीश विंग्लिशमधलं गाणं वाजलं. त्यातल्या काही ओळी ऐकून खरं तर त्यांचे डोळेच भरून आले. “पियाबीन दिल लगे ना मन मा लागे चैन, कैसे जाऊ मै पराये देस” अगदी त्यांच्या आयुष्यावरच बेतलेल्या ओळी वाटतं होत्या.  दिनेशराव गेले त्यालाही आता बरीच वर्षे उलटली होती. अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार!  एकुलता एक आणि हुशार मुलगा पदरात टाकून ते अनंताच्या प्रवासास निघून गेले आणि खरंच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. स्वभावाने त्यांच्यासारख्याच असणार्‍या आणि कुशाग्र बुध्दीच्या त्यांच्या मुलाने, सत्याने वडीलांसारखा हुशार इंजिनियर होऊन आणि त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले.  आयटीची पंढरी मानल्या गेलेल्या अमेरिकेत जाऊन उच्चपदस्थ नोकरी मिळवली आणि रमाताईंनी सत्यजितला वाढवताना केलेल्या कष्टाचे चीज झाले. मागच्याच वर्षी त्याच्यासारखीच गोड, गुणी, हसरी मुलगी त्यांच्या घरी सून म्हणून आली आणि घर पुन्हा हसू खेळू लागलं. अमेरिकेला जाताच सुनेने रमाताईंचा विजा काढायला घेतला आणि, “आई आता वर्षाचे सहा महिने इकडे यायचं. पुढल्या सहा मह...

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...