जिथे जिथे माझे आवाज थांबले,
तिथे तिथे शब्द कागदावर उमटायला लागले.
रात्रीच्या किर्रर्र शांततेत माझ्या शाईचा समुद्र खवळून उठेल, खदखद करेल, विराटी हास्य दाखवेल,
पण मन मोकळं होईल,
जे मेंदूला सुचतय ते व्यक्त केलं जाईल.
प्रचंड आवडतं मला शब्दांशी खेळणं.
खूप इमानदार असतात ते...
जे म्हणायचं आहे ते नेमकं पकडतात.
मनात झालेली शब्दांची गर्दी कागदावर उतरवली की विलक्षण समाधान मिळतं.
जे म्हणायचं आहे ते नेमक्या ओळीत साधलं गेलं की मिळणारं सुख अपार आहे.
कित्येकदा मनातल्या शब्दांनी कागदाचा पत्ता विचारला,
मी नाही दाखवला तो शाईवाटेने जाणारा रस्ता...
या गद्दारीसाठी क्षमस्व शब्दांनो!!
मी त्या प्रत्येक शब्दावर प्रेम करते,
ज्यांनी जगायला जगवायला शिकवलं.
- तुमची ऋणी
प्र. ज्ञा. जोशी

Comments
Post a Comment