“शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले”
हेच वाटलं होतं जेंव्हा माधवाने तिला पहिल्यांदा पाहिलं होतं.
लांबसडक रेशमी केसांची वेणी, त्यावर मोगरा-चाफ्याचा गजरा, सात्विकतेचं प्रमाण सांगणारे डोळे, संयमाची हद्द दाखवणारे
नाजूक ओठ, सोज्वळतेचा अर्थ सांगणारा नक्षत्रासम चंद्रासारखा गौरवर्णी तेजस्वी चेहरा,त्या तेजाने आणखी उठून दिसणारे
कानातले मोती!!
चहाचा कप हाती देता हलका स्पर्श झाला,दोघेही प्रथम स्पर्शानी शहारून उठले.सगळे शब्द, सूर अवघडले होते, जेंव्हा
तिने नाव विचारल्यावर मधाळ आवाजात “रमा!” म्हणून सांगितलं होते.
“तुझा शब्द की थेंब हा अमृताचा
तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा”
पसंद तर पाहताच पडली होती अन खरोखरीच पेशव्यांच्या रमा माधवासम भासणारी ही जोडी लग्नाच्या बोहल्यावर चढली
होती….
“आज तू डोळ्यात माझ्या
मिसळून डोळे पहा
तू अशी जवळी रहा”
ह्याच ओळी डोक्यात घुमत होत्या जेंव्हा लग्नानंतर पहिल्यांदा तिच्याशी बायको म्हणून संवाद साधत होता.माधवाला पेटी
वाजवत सुंदर गाणी गायचा भारी छंद! लग्नानंतर त्याला सगळ्यांनी हट्ट धरला गाणी गायचा.त्यानं तिच्यासाठी गायलेलं पहिलं
गाणं…
“आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे”
अहाहा! काय लाजली होती! अख्खी लाल झालेली!नजर वर न करता जणू हे तिजसाठी न्हवतच अशी ती अन त्यावर
चटकन त्यानं पुढल्या ओळी गायल्या होत्या…
“लाजून हासणे अन हासून ते पाहणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे”
ती धावतच खोलीत पळत गेली.सगळी मंडळी खळखळून हसली.
संसारवेल फुलायला लागलेली, स्वरांनी, शब्दांनी, प्रेमानी, स्पर्शानी,प्रगल्भतेनी,वैचारिकतेनी,रंगानी….
आता तर माधवाच जरा नजरेआड होणंही रमेला सहन व्हायच नाही.त्याच्या घरी यायच्या सांजवेळी पावसानं हजेरी
लावलेली.अंगणातल्या हजारी मोगऱ्याच्या वेलीखाली भिजत आपल्यातच गुंग होऊन ती गात होती…
“धरेस भिजवुनी गेल्या धारा
फुलून जाईचा सुके फुलोरा
नभ धरणीशी जोडून गेले
सप्तरंगसे तू
कधी रे येशील तू, जिवलगा…
कधी रे येशील तू”
त्यानं ऐकलं ते गाणं..
त्या पावसाला, तिच्या त्या भिजलेल्या मोहक रुपाला, तिच्या गोड स्वरांना, तिच्या प्रेमळ आर्ततेला त्यानं
मनभरून डोळ्यात, ह्रदयात साठवून घेतलं.तिच्या नकळत तिच्या बाजूस जाऊन बसला.
ओल्या मातीचा सुगंध, त्यात मोगऱ्याचा सुवास, त्यात तिचं ते लाजून आपल्याशीच गुणगुणनं!
त्यानं तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतलं.ती आधी दचकली, आपलं गाणं त्यानं ऐकलं हे उमगून ती लाजून
त्याच्या छातीत तिनं तोंड लपवलं. आणि तो गायला लागला.
“लाजऱ्या माझ्या फुला रे
गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने
अंथरा रे ही हवा
भारलेल्या ह्या स्वरांनी भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा”
भरभर काळ पुढे जातो नाही, पण प्रेम तर मुरंब्यासारखं आहे ते मुरतच गेलं.आणखी आणखी वाढत गेलं. वयाचा उत्तरार्ध
आला तर मन, स्वर,गाणं आणि प्रेम सगळंच तरुण होतं. आता एकमेकांच्या जोडीदाराच्या भूमिका निभावत निभावत कधी
कधी एकमेकांचे आईबाप पण व्हायचे.उन्हात चांदण आजही हसायचं पण शरीराचं उन्ह ओसरत चाललं होतं.सूर आजकाल
अवघडायचे पण ते शरीरामुळे….आजही तिच्या मिठीत विश्वाचं रहस्य उलगडायचे अन आयुष्याचेही…
अन घडू नये ते घडले!!
ह्रदयविकाराच्या झटक्याने शब्दांच्या पलीकडले दुःख दिले.आता रमा माधवाची खरोखरीच आई शोभायची.तिनं
जिद्द नाही सोडली, प्रयत्नांची शर्थ केली पण प्रत्येक मैफिलीची भैरवी कधी न कधी वाजतेच.
अन ती घटका आलीच!
तिनं हट्टाने पेटून त्यांना निरोपाच्या क्षणाआधी दवाखान्यातून घरी आणलं.कुणालाच कळेना काय झालं,माधवराव मात्र
थकल्या डोळ्यांनी मंद हसत होते, रमेला मनात म्हणत,
“मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे”
तिनं त्यांना पाहायचा कार्यक्रम झालेला त्या बैठकीच्या खोलीत झोपवल.त्यांच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली,
“आलेच!”
ती खोलीत गेली, तिनं लग्नातला शालू काढला, नेसला, लग्नात त्यांच्या सोवळ्याशी बांधलेली शाल अंगी पांघरली, पांढरे केस
बांधून त्यावर मोगरा माळला. ठसठशीत कुंकू कोरल.मोठ्ठ मंगळसूत्र, माधवाने तिच्यासाठी केलेला राणीहार, चिंचपेटी,
मोत्याच्या कुड्या, नथ,पाटल्या, जोडवी, पैंजण सगळं सगळं त्या सुरकुतलेल्या पण तरीही सुंदर शरीरावर घातलं
नखशिखांत लक्ष्मी दिसू लागली.अगदी वरूनखालवर सौभाग्याच्या अलंकरांनी मढुन गेली होती.
शेवटची….!
धावतच माधवाजवळ आली.तिला दारात बघून माधवासह सगळ्यांचे डोळे पाणावले.वयाच्या सत्तरीतली रमा वयाच्या
एकविसाव्या रमेहुन कमी सुंदर दिसत न्हवती.ती त्याच्या जवळ गेली, त्याच्या डोळ्यात डोळे घालून मनभरून त्याला
पाहून घेतलं, त्यानंही तिला पाहून घेतलं, बैठकीनेही हुंदका देत
“आज तू डोळ्यात माझ्या
मिसळून डोळे पहा,
तू अशी जवळी रहा”
म्हणत शब्दांच्या पलीकडली ती घटका गाऊन घेतली.
तिने त्याला मांडीवर घेतलं, त्याचा हात हातात घेतला.
त्याला हळुवार गोंजारत म्हणाली,
“ आता इथून पुढचा प्रवास वेगळा आहे हां जरा,
काळजी घ्यायची मी येईपर्यंत,
त्रास होईल अशी गोष्ट करायची नाही,
काही दिवस एकट्यानेच गावं लागेल,
पण मी आले की गाऊ पुन्हा सोबत…
पत्ता न देता चाललात आज प्रथमच, तरी येईन तुमचे स्वर शोधत…
आता विश्रांतीची वेळ झाली, शांत झोपाल न?”
अन तिच्या मुखातून त्या ओळी बाहेर पडल्या,
“शांत हे आभाळ सारे,शांत तारे, शांत वारे
या झऱ्याचा सूर आता मंद झाला रे
निज माझ्या नंदलाला रे”
पुसटशी "रमा!" अशी हाक मारून
“आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त”
अस म्हणत माधव दूरच्या प्रवासास निघून गेला….
अंगणात ती वेल अजूनही आहे बरं, पाऊसही येतो मधून मधून….
ती रमासुद्धा तिथेच असते म्हणे, गाण्याचे स्वरही ऐकू येतात कधी कधी….
फक्त गाणं वेगळं असतं एवढंच…
“सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजूनही चांदरात्र आहे”
- प्र.ज्ञा. जोशी
Too good👌
ReplyDeleteThank you so much 😊
Delete