खरं सांगू, थांबवलंय मी आजकाल
लोकांमध्ये मिसळणं, भरभरून बोलणं।
खोट्या चेहऱ्यांशी मनापासून
माझ्या आत्म्याला जोडणं।।
नाही रमत आजकाल मन
गोंगाटात अन जमावात ।
या काळजातून उठलेल्या भावना
बसताना दिसत नाहीत खोल आत।।
जमत नाही आजकाल
खोटं हसणं अन खोटी स्तुती करणं।
ह्रदय तसं आजही सरळच आहे
पण मीच चालू केलय त्याला अडवणं।।
आजकाल नाहीच होत मला
कुणालाही आपलंसं करून घेणं।
थांबवलंय मी कोरड्या नात्यामध्ये
मायेचं रक्त मिसळवण।।
नका विश्वास ठेवू बरं
तुमच्यात बसले, हसले जरी।
जीव लावायचे नाही आता
तुम्ही प्रेमाचा वर्षाव केला तरी।।
गरज नाही आता तुमच्या सावलीची
जरी आला पाऊस अथवा चटक्याचं ऊन।
सवय झालीये आता एकटीनं सुखात नाचून
अन एकटीनं दुःखात रडून।।
बदललेली नाहीये बदलवलेली आहे
रडणारी नाहीये थाठ्यात उभारलेली आहे।
बसणारी नाहीये चढणारी आहे
हवीशी वाटणारी नाहीये हेवा वाटणारी आहे।।
खरं सांगू थांबवलंय मी आजकाल
कशालाही महत्व देणं।
जेव्हापासून चालू झालंय एकांतातल्या
आत्म्याशी हितगुज करणं।।
-प्र.ज्ञा.जोशी.

Comments
Post a Comment