भल्या पहाटे गार वाऱ्याची झुळूक आली.
त्या वाऱ्यासोबत तुझ्या केसांचा सुगंध…
काल रात्री मी आणलेल्या गजऱ्याच्या कळ्यांचा अजूनही हवेत असलेला दर्प जाणवला.
झटकन कुशीवरून वळलो.तू गाढ झोपलेलीस.
पुन्हा तोच निरागस चेहरा, तेच टपोरे शांत डोळे , तेच गुलाबाच्या पाकळीसम दुमडलेले गुलाबी ओठ,
पुन्हा माझं मानेखाली हात घेऊन तुला बघत बसणं,
तुझ्या चेहऱ्यावर खिडकीतून येणारा चांदण्याचा प्रकाश हातानी अडवण आणि पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडणं.
कितीदा अन कसा कसा तुझ्या प्रेमात पडावं मला खरंच कळत नाही बघ...
त्या नाजूक गोऱ्यापान हातांमध्ये मी माझा हात गुंफला तर झटकन वळलीस आणि माझ्या कुशीत शिरून झोपलीस.
अगदी लहान मुलासारखी……
मला जर कुणी विचारलं न की जगातला सगळ्यात आनंदी क्षण कोणता?
तर मी क्षणार्धात उत्तर देईन!
"गाढ झोपलेल्या तुझ्या केसांवरून हात फिरवत फिरवत तुला कुशीत घेऊन झोपणं"!
का कुणास ठाऊक तुझ्या आवडत्या गाण्याच्या दोन ओळी गुणगुणाव्याश्या वाटल्या.
“केंव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली,
मिटले चुकून डोळे,हरवून रात्र गेली…..”
किती नशीबवान आहे ग मी,आत्ता या क्षणी स्वर्गसुख म्हणजे काय ते कळतंय मला.
माझ्या या निरागस, सुंदर बायकोच्या सौंदर्यावर जणू मला हक्क दाखवायचा होता म्हणून हलकेच ओठ तुझ्या
कपाळाजवळ नेले.
पुन्हा प्रेमात पडलेला मी…..
पुन्हा एकदा जागा झालो….
रोजच पडणाऱ्या त्या स्वप्नातून…..
आजही फसवलं होत मला….
तू, त्या रात्रीनी, त्या मोगऱ्यानी,त्या चांदण्यांनी,त्या झुळुकीनी….
मी ही फसलो होतो….रोजच्यासारखा…..
पुन्हा तेच स्वप्न,
पुन्हा तुझा भास,
पुन्हा ते जाग होणं,
पुन्हा तुझं नसणं,
पुन्हा माझं मूक पण आर्ततेने अंधारात रडणं…..
पुन्हा तुझ्या मोगऱ्याचा हार घातलेल्या फोटोकडे बघणं….
आणि नियतीनं माझ्यावर हसून क्रूरपणे गुणगुणण….
“उसवून श्वास माझा, फसवून रात्र गेली”
-प्र. ज्ञा.जोशी

अप्रतिम शब्दांचा शृंगार.... शुभेच्छा.
ReplyDelete