(Written for the strongest bond of all those great fathers in the world and their darling daughters)
"To my शेर"
आधीच सांगतो, "बाबा तू रडतोयेस का रे?"असं विचारायचं नाहीस.अवघड जात ग तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर देणं.खरं
सांगू ,मला खूप हेवा वाटतो निशादचा...माझी बाहुलीसाठी हट्ट करणारी छोटी परी ज्यावेळी खऱ्या आयुष्यात चालत्या
बोलत्या बाहुल्याच्या प्रेमात पडली, खूप भीती वाटली ग...असं कसं माझ्या बाळाला दुसऱ्याच्या हाती सोपवायचं? तुझी
आई टोमणा मारून गेली,"मी न्हवते आले तुमच्यासोबत घर मागे सोडून?"
तू पहिल्यांदा पाऊल टाकलस ना तो फोटो बघत बसलेलो.तू सप्तपदीमध्ये पहिलं पाऊल टाकलस ना तेंव्हाही
वाटलं.आत्ता-आत्ता तर माझा हात सोडून चालायला शिकलेलं पिल्लू आज आयुष्यात खूप मोठं पाऊल टाकतय!
बापाचं काळीज आहे ना ग,बोलून दाखवता येत नाही....पण काळजी वाटते.लग्नाच्या पंगतीत निशाद तुला घास भरवत
होते,सगळे फोटो काढत होते, हसत होते,मी मात्र कोपऱ्यात उभा होतो.थोडासा खट्टू होऊनच...तुला पहिला दात
आलेला त्यावेळी तुला 'गम गम भात' भरवलेला न मी ते आठवलं.....तुझ्या परीक्षेच्या काळात तुझ्या मागे मागे येऊन
घास भरवायचो पण आज मात्र मी बाजूला होतो, खूप समजावलं मनाला...पण तरी...निशादचा खूप हेवा वाटला...
भटजी घाई करायला लागले तेंव्हा तुला बोलवायला तुझ्या खोलीत आलो.मेअकपवाली तुझी हेअरस्टाईल करत
होती.एकदा तुझी आई गावाला गेल्यावर मी तुझे केस बांधले होते.अर्धे बाहेर-अर्धे बांधलेले.तरी खूप गोड दिसत
होतीस.आजच्या तुझ्या 'लूक'पेक्षा तेंव्हाही चिऊ मला जास्त आवडली होती.का माहिती नाही...
कोणी तरी येऊन म्हणून गेलं, "काका शेरवानीत छान दिसताय!"मी पटकन म्हणून गेलो, "हो आमच्या चिऊनी घेतली
मला"!! तुझा पहिला पगार झाला ना,त्यादिवशी खूप मिश्र भावनांनी मी स्तब्ध झालो होतो.मला न्हवता ग एवढा
पगार.पण माझ्या मुलीला मिळाला."तुम्हाला मुलगा नाहीये का?" अस विचारणाऱ्या त्या प्रत्येक बेकार मुलाच्या
बापाला जाऊन हे सांगावस वाटलं की लहानपणी वडिलांनी घेतलेल्या कपड्यानंतर जर कुणी मला हौसेने कपडे
घेतले असतील तर ते माझ्या मुलीने घेतलेत.मला तुझा सार्थ अभिमान वाटतो बाळा तुझा!
तुझ्यासमोर रोखून धरलेल्या सगळ्या भावना घरी गेल्यावर तुझ्या खोलीत जाऊन मोकळ्या केल्या. बाप म्हणे
मोठ्यानी रडत नसतो.पण तुझं कपाट, तुझा पसारा, तुझे कपडे काहीच जागेवर न्हवतं...दुखलं ग हृदयात...घरभर
पैंजणांचा आवाज करत दुडूदुडू धावणारे पाय आज वाजत न्हवते...माझं तुझ्या दंग्यांनी भरलेलं घर शांत शांत भासत
होतं...
"बाबा या न फोटो काढुयात" तुझा आवाज कानी पडला आणि चटकन वळलो.तुम्ही निशादचा वडिलांसोबत फोटो
घेत होतात...हसलो पण डोळ्यात पाणी आलं,माझं लेकरू नवीन लोकात चटकन मिसळून गेलंय याचा आनंदही
झाला.
लग्नातल्या त्या 'कन्यादान' विधीचा तर रागच आला.आधीच मी माझं सर्वस्व दिल जावयाला.इतकंच काय, तुझ्या
नावपुढंच माझं नाव काढून त्याच्या नावासाठी जागा पण करून दिली.आणि त्यात पुन्हा हे दान वगैरे...
माझाच चेहरा घेऊन जन्मलेल्या माझ्या शेरावर मला पूर्ण विश्वास आहे.जस तू आपलं घर चांदण्यांनी उजळून
टाकलस तसं तेही घर उजळवशील.आता तुला तुझ्याच घरी आणायसाठी त्यांची परवानगी घ्यायची हे जरा पटत नाही
ग मला.काय करू सवय लागली आहे न हे म्हणायची....
"बाप आहे मी तिचा!!! "
-प्र.ज्ञा. जोशी
Comments
Post a Comment