#न्यूयॉर्कनामा
#भाग_एक
रात्री न्यूयॉर्क ट्रिपवरून घरी पोहोचलो आणि इथली शांतता पाहून नकळत कानात न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरचा गदारोळ कानात घुमू लागला. क्षणभर असं वाटलं की आपण मन मागे त्या शहराकडे ठेऊन आलो की काय?
जगात अशी बरीच ठिकाणं असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला एक कुतूहल किंवा कौतुक असतं. त्या ठिकाणी वा शहरांत प्रत्यक्ष न जाताही आपल्याला हा अनुभव येऊ शकतो. या बाबतीत माझी यादी लांबलचक आहे. मला एकंदरीतच लोक, शहरं, संस्कृती, भाषा, खानपान पद्धती इत्यादी गोष्टीत फार रस वाटतो.
मी एकटी जितकी पुस्तकांमध्ये डोकं घालून असते तितकीच लोकांच्या गर्दीतही रमते. त्यामुळे खूप कथा आजूबाजूला वास्तव्यास असतात. या सगळ्या कथा, हे अनुभव माझ्या आयुष्याची ओंजळ किती समॄद्ध करतात हे शब्दात सांगणं कठीण आहे.
पण ह्या कथा आपण सांगितल्या पाहिजेत. आपल्या ओंजळीत वाहून जाईल इतका आनंद आला तर तो वाटून टाकला पाहिजे. म्हणजे मग पुन्हा आपण नव्याने ओंजळ भरून घ्यायला मोकळे!
मग ठरवलं, की या शहराची आणि आपली गोष्ट सांगायची.
न्यूयॉर्क!
नावच किती नावीन्य सांगणारं, सळसळत्या उत्साहाने भरलेलं!
आपल्या कित्येकांच्या आयुष्यात बॉलिवूडच्या सिनेमामधून ऐकिवात असलेलं, काहींना हॉलिवूडच्या, काहींना पुस्तकांमधून, काहींना तिथल्या आर्थिक गणितांवरून होणार्या सारीपाटामुळे , काहींना त्याच्या इतिहासामुळे, काहींना तिथल्या गगनभेदी इमारतींमुळे, काहींना त्याच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीमुळे वगैरे वगैरे वगैरे!!
ही यादी न संपणारी आहे!
एकाच शहराच्या पोटात एवढं काही दडलेलं असू शकतं!
मीना प्रभू म्हणतात त्याप्रमाणे, एका नगरात वसलेलं एक मोठं जग!
कोरोनात मीना ताईंच “न्यूयॉर्क न्यूयॉर्क” वाचायला घेतलेलं. त्यावेळी मी ह्या शहराबद्दल वाचून थक्क झाले होते.
पण त्याला भेट द्यायचा योग इतक्या लवकर जुळून येईल असं अजिबात वाटलं नव्हतं.
युरोप फिरायला जायच्या तयारीत असलेले आम्ही, आमचा तो दौरा काही कारणाने रद्द झाला आणि अमेरिकेतच फिरायला जायचं असं ठरलं.
आम्ही पश्चिम अमेरिकेत राहतो त्यामुळे आमच्यासाठी पूर्व अमेरिकेला जाणे दुसर्या देशी जाण्यासारखेच होते, मग पूर्व अमेरिका पक्की केल्यावर दोघांच्याही तोंडून एकच नाव आपसूक बाहेर पडलं,
“न्यूयॉर्क! न्यूयॉर्क!!”
आणि तयारी चालू झाली, मी मीना ताईंचं पुस्तक पहिल्यापासून वाचून काढलं, यावेळी मी तिथे जाणार आहे हे माहिती असल्याने माझा वाचनाचा रोख वेगळा होता. त्यातले संदर्भ वाचून मी गुगलवर ती माहिती पाहायचे, ती ठिकाणे सर्च करायचे आणि त्यातल्या कोणत्या ठिकाणी कधी जायचं आहे याचा एक भरभक्कम आराखडा तयार केला.
इथे थंडी इतकी असह्य नसल्याने थंड प्रदेशातल्या कपड्यांची खरेदी झाली, फिरायच्या प्लॅनने, जागांच्या ऐतिहासिक संदर्भांनी भरलेल्या डायऱ्या, हे शहर चालत बघायचं असल्याने चालता चालता लागणारा खाऊ, पाण्याच्या बाटल्या आणि दणकट बुटं असा सगळा तामझाम झाला आणि आम्ही जगाच्या आर्थिक राजधानीला भेटायला निघालो!
जॉन गॅराल्ड म्हणतो त्याप्रमाणे,
“The Big Apple, the dream of every lad that ever threw a leg over a thoroughbred and the goal of all horsemen. There are many apples on the tree but there is only one big Apple. That’s New York.”
माझं आणि जयचं हे वर्ष फार धामधूमीत गेलं, आमचं अख्खं आयुष्यच बदललं म्हणा ना!
मग या वर्षाचा शेवट गोड करायला आम्हाला ह्या मोठ्या सफरचंदाचा घास घ्यावासा वाटला त्यात नवल ते काय!
चला मग बसा पटकन yellow टॅक्सीत, उदयापासून माझ्या नजरेनी, शब्दांनी आणि फोटोजनी एक एक भागात न्यूयॉर्कची सफर चालू करू!
हॉप ऑन गाइज!
- प्रज्ञा

Comments
Post a Comment