#न्यूयॉर्कनामा
#भाग_दोन
फिनिक्समधून आमचं रात्री विमान होतं. इकडे ज्या ज्या अमेरिकन लोकांना आम्ही न्यूयॉर्कला जातोय हे माहिती होतं त्यापैकी बरेच लोक कधी अमेरिकेच्या पूर्व भागात गेलेच नव्हते. त्यातलाच एक आमचा कॅब ड्रायवर होता. आमच्यापेक्षा जास्त त्याला आम्ही न्यूयॉर्कला जातोय म्हणून उत्सुकता वाटत होती. आम्हाला खूप शुभेच्छा देत माझ्या हातातलं सामान, “तू नको उचलूस” म्हणून आपण घेत अगदी दारापर्यंत सोडवायला आला. मी त्याला म्हणलं, की आमच्या घरचा माणूस आम्हाला सोडायला आलाय अशी भावना येतेय तुला बघून, त्यावर प्रसन्न हसून तुमचा प्रवास सुखरुप होवो म्हणून निघून गेला.
कोण कुठली माणसं ही?
पण माणसाला माणसासाठी माणसासारखा आनंद होणारी!
आमच्या त्यांच्यात संबंध काय तर माणूस असण्याचा!
पुढे आम्हाला भेटणाऱ्या फार गोड माणसांच्या गोष्टीची ही नांदी होती.
विमानात बसलो आणि मी कुठला सिनेमा पाहायचा म्हणून स्क्रिन पाहात होते, तेवढ्यात विमान फिरुन वगैरे रनवेला लागलं होतं. माझं बाहेर अजिबात लक्ष नव्हतं, पण जय पूर्ण वेळ माझ्याकडे पाहात होता, मी विचारलं काय झालं तर हसून म्हणाला, की पहिल्यांदा विमानाचा प्रवास करणारी प्रज्ञा ते ३ विमानांचा प्रवास झालेली प्रज्ञा ह्यातला फरक बघतोय. आम्हाला हसूच आवरेना, पहिल्या प्रवासात माझं नाक विमानाबाहेरच होतं, मी उड्या मारत होते, हसत होते, आश्चर्यचकित होत होते, आता सवय झाली.
माणसाचं आणि भौतिक गोष्टीचं नातंच असं असंत, मिळेपर्यंत काय ते कौतुक, नंतर त्याचं तेवढं अप्रूप वाटत नाही. पण अर्थातच तंत्रज्ञानाचा आदर आणि बाहेर दिसणारा निसर्गाचा चमत्कार हा अजूनही आमच्या कुतूहलाचाच विषय आहे. तो काही कमी होईल असं वाटत नाही.
सकाळी विमान उतरलं, म्हणजे न्यूयॉर्क आमच्यापेक्षा वेळेत पुढे असल्याने तिकडच्या सकाळी आम्ही तिथे पोहोचलो. हा देश आकाराने एवढा मोठा आहे की देशातल्या देशातच वेगवेगळया वेळा आहेत. ही एक गंमतच! अर्थात न्यूयॉर्क आणि आम्ही राहतो ते अंतर आपल्या काश्मीर ते कन्याकुमारीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे दूसऱ्या देशात जाण्याचाच अनुभव घेतला म्हणायला काही हरकत नाही.
सगळी प्रोसिजर करून बाहेर आलो, तर विमानतळावर सुरेख चित्रे काढलेली, तिथला इतिहास, तिथली संस्कृती दर्शवणारी चित्रे! विमानतळाच्या आत तितकी थंडी जाणवली नाही तरी आम्ही तिथेच अंगावर लेयर्स चढवून घेतले कारण फोनमध्ये बाहेरची थंडी जास्त असणार असं सांगितलं होतं. बॅग्स ढकलत बाहेर आलो, म्हणजे दरवाजा ढकलून पहिल्यांदा रस्त्यावर पाय ठेवला आणि
उफ्फफफ!!!!
थंडीचा असा काही प्रकार अनुभवला की आयुष्यात विसरता यायचं नाही. तो पहिलाच सेकंदच इतका अंगावर येणारा आणि गोठवणारा होता की पुढचा आठवडा कसा जाणार आहे याची जणू सूचनाच होती. फोनवर तापमान पाहिलं तर दोन डिग्री! शरीर आणि शब्द दोन्ही गोठून गेले.
आम्ही मॅनहॅटनएमध्ये अगदी मुख्य भागात, म्हणजे टाइम्स स्क्वेअरच्या बाजूस आणि न्यूयॉर्क टाइम्स ऑफिसच्या अगदी समोरच होटेल घेतलं होतं, त्यामुळे एयरपोर्ट ते मॅनहॅटन कसं जायचं हे जय फोनवर पाहात होता.
आम्ही दोघे तिथे रस्त्याच्या बाजूस असलेल्या एका बुथसमान जागी जाऊन उभारलो होतो, तेवढाच थंड हवेपासून बचाव! तितक्यात एक उंचापुरा देखणा मुलगा आम्हाला हाय म्हणत तिथे आला, त्यालाही मॅनहॅटन मध्येच जायचं होतं. तिथे होणारा ब्रॉडवे शो बघायला म्हणून तो खास आला होता. तो म्हणाला बसेस चांगल्या असतात इथल्या, आपण त्याने जाऊया. आम्ही तुम्हीचे आता “आपण” झालो होतो.
आम्ही भारतातले आहोत हे कळल्यावर म्हणला, की तुम्ही पंजाबचे आहात का?
नाही रे तुला असं का वाटलं विचारल्यावर म्हणाला,
माझी प्रेयसी पंजाबी आहे.
मग तुझी खायची चंगळ आहे म्हणल्यावर म्हणाला,
चंगळ तिची पण आहे कारण मी इटालियन आहे!
एवढा सुंदर देश सोडून इकडे का आलास? म्हणल्यावर म्हणाला,
मला जग बघायचंय, आणि जग सहज फिरायला अमेरिकन पगारच लागतो म्हणून आलो मग अमेरिकेत!
त्याच्या त्या वाक्यांनी मी फार विचारात पडले, खरंच की! फक्त चलनात काय फरक पडला, देशोदेशीच्या लोकांचं राहणीमान आणि भविष्यच बदलतं. त्याच्या त्या एका वाक्याने माझ्या डोक्यात गोळा झालेल्या विचारांनी बराच वेळ पिंगा घातला.
तेवढ्यात एक वयस्कर बाई आमच्याजवळ आली. आमच्याच विमानाने आलेली, एकदम उत्साही बाई. बोलल्यावर कळलं की ती कॅलिफोर्नियावरून आली होती. कॅलिफोर्निया म्हणजे आमचे शेजारी राज्य. थंडीबद्दल बोलता बोलता म्हणाली की “आपल्या” लोकांना सवयचं नाही ना गं ह्या असल्या थंडीची! अरिझोना आणि कॅलिफोर्निया हवेला थोडे बहुत सारखे, दोन्ही पश्चिमेकडले, त्यामुळे आता आम्ही “आपण” झालो होतो.
आपण किती जणांचे आपले असतो आणि किती वेगवेगळया गटांमध्ये सामील असतो ह्याचा आजकाल मजेशीर प्रत्यय येतो.
आम्ही सगळे एकाच दिशेने निघालेले प्रवासी!
तेवढ्यात बस आली! काय सुविधाजन्य बस!!
त्याच्या अमेरिकन ड्रायव्हरने खाली उतरून सगळ्यांच सामान घेऊन ते डिक्कीत ठेवलं.केवढा धिप्पाड होता तो!
बघून क्षणभर भीती वाटावी असा उंचापुरा अंगापिंडाने धिप्पाड!!
आमच्या मोठ्या मोठ्या बॅग्स त्याने लीलया उचलून ठेवल्या.
सामान ठेऊन झाल्यावर आम्ही सगळे वर चढलो, मला न्यूयॉर्कचा पहिला नजारा मिस नव्हता करायचा त्यामुळे मी अगदी पहिल्या सीटवर बसूया म्हणून पाहिलं तर तिथे सामान ठेऊन ती जागा अडवलेली, मी ड्रायवरला विचारलं की कुणाचं सामान आहे तर धीरगंभीर आवाजात माझं सामान आहे म्हणाला, झालं का!
तरी त्याला आपल्याकडच्या दादा-अण्णा-भाऊला विचारावं त्या स्वरात मी त्याला विचारलं,
मला बसायचंय इथे, न्यूयॉर्कचं पहिलं दर्शन मिस करायचं नाहीये म्हणून, तुझे सामान दुसरीकडे ठेवतोस का??
तर म्हणाला
“इज़ दिस युआर फर्स्ट टाईम टू न्यूयॉर्क?”
होय म्हणल्यावर मग मला तुझी मर्जी ठेवावी लागेल पोरी असं म्हणून बिचाऱ्याने त्याचं सामान त्याच्या पायाशी नेऊन ठेवलं, पोरीने माझं सामान हलवलं!!! असं मजेत म्हणून हसून गेला, मघाशी त्याची वाटलेली भीती किती फोल होती याचा अनुभव आला.
मग काय मी आणि श्रीयूत शेटे पहिल्या सीटवर रेलून खिडकीतून येणारं बिनकामी ऊन अंगावर घेऊ लागलो.
तिकीट काढताना कॅलिफोर्नियन बाई म्हणाली, माझी मैत्रीण पुढच्या स्टॉपवर बसमध्ये चढणार आहे तर तिच्याकडून घ्या माझं तिकीट! त्यावर पण आमचा दयाळू ड्रायवर काहीही म्हणाला नाही.
मग इटालियन भाऊ आणि कॅलिफोर्नियन काकूच्या इटलीच्या गप्पा ऐकत आम्ही निघालो!
बसमध्ये थंडी जाणवत नव्हती पण प्रत्येक स्टॉपवर चढणारे प्रवासी मात्र असे काही कुडकुडत आत शिरत होते की बाहेरच्या थंडीची धडकीच बसावी.
ड्रायवर मध्ये मध्ये आम्हाला, आता तू इकडे बघ, आता तिकडे बघ, आता हे दिसेल, आता ते दिसेल म्हणत गाईड करू लागला.
आणि मग निळ्या रंगाचा बोर्ड दिसला,
वेलकम टू न्यूयॉर्क!
डोक्यात टेलर स्विफ्ट गाऊ लागली, ह्याच शब्दात.
आणि गाडी थोडया वेळात मॅनहॅटनएमध्ये शिरली!
गगनभेदी, गगनचुंबी इमारतींच्या मधून मुंगीसारखी वाटणारी आमची बस आणि त्यातले खिडकीबाहेर कुतूहलाने पाहणारे विस्फारलेले दोन चिमुकले डोळे...
“न्यूयॉर्क मे लंबी लंबी बिल्डिंग्स होती है ना?,
नही शशी वो मॅनहॅटन है!”
आपली श्रीदेवी आणि तिची उत्सुकता आता कानात घुमत होती.
आणि मग आलं, सकाळी सकाळी आठ वाजता जाहिरातींनी झगमगलेलं, टाइम्स स्क्वेअर!
आल्या आल्या डोळे दीपले होते.
आम्ही तिथे उतरलो, सामान घेऊन सगळ्यांचा निरोप घेतला,
पुन्हा कधी दिसायचे हे गोड लोक!
सारे प्रवासी घडीचे!
बाहेरच्या थंडीत इकडे बघू का तिकडे बघू या अवस्थेत हॉटेलचा रस्ता शोधू लागलो.
हॉटेल अगदी बाजूच्याच गल्लीत निघालं.
मग स्वतःभोवती गोल गोल फिरत आजूबाजूला बघत, सोबतच्या अतिशय नीटनेटकं आवरलेल्या लोकांच्या लोंढ्यासह हॉटेलकडे निघालो.
इतक्या उशिरा उठल्यावर स्वतःच्याच झोपेवर चिडत,
“माझा न्यूयॉर्क मधला वेळ तू वाया घातलास”
शांत प्रसन्नचित जयराव आम्ही तयार झालो आणि निघालो त्या दिवशी चाललेल्या पुढच्या वीस हजार पावलांच्या भटकंतीला!

Comments
Post a Comment