Skip to main content

न्यूयॉर्कनामा - भाग ३










 #न्यूयॉर्कनामा

#भाग_३


हॉटेलमध्ये अंगावर चढवलेल्या तीन शर्ट्स, तीन पँट्स, हातमोजे, पायमोजे, कानटोपी यांची दणकट मदत झाली होती. बाहेरची थंडी जाणवत असली तरी झोंबत नव्हती. 

आम्ही एका कॉफी शॉप मधून कॉफी पिक करुन चालत चालत पिझ्झेरिया शोधत निघालो. आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात चहाच्या टपऱ्या दिसतील तेवढ्या प्रमाणात इकडे कॉफी शॉप आणि पिझ्झेरिया दिसतात. लोकांना तिथेही ते बसून खायला वेळ नसल्याने हातात कॉफी कप्स घेऊन ते झपाझप चालताना दिसतात. 

न्यूयॉर्कचा पिझ्झा जगत् फेमस आहे. मी आणि जय दोघीही पिझ्झाप्रेमी आहोत. आम्हाला आपलं सात्विक मराठी जेवण सगळ्यात प्रिय असलं तरी जगातल्या सगळ्या चवी ट्राय केल्या पाहिजेत या मताचे आम्ही असल्याने बाहेर असलो की ज्या त्या प्रांताचं  विशेष आवडीने खातो. त्यात दोघेही शाकाहारी असल्याने मांसाहार करणाऱ्या लोकांएवढे ऑप्शन्स मिळत नाहीत पण सगळीकडे वेज ऑप्शन्स असतात हे विशेष!

तर एके ठिकाणी पिझ्झाचे तुकडे घेऊन ते चघळत आम्ही सेंट्रल पार्क गाठायचा प्लॅन केला, अर्धा दिवस आधीच सरला असल्याने उरलेला दिवस कसा सत्कारणी लावता येईल याकडे आमचा भर होता. एकच ठिकाण आज उरकणार असू तर मग चला सेंट्रल पार्कला! कारण हे एकच ठिकाण १० जागा कवर करेल एवढं मोठं होतं.

तिकडे जायला सबवे बेस्ट ऑप्शन होता, तसाही सबंध न्यूयॉर्कमध्ये फिरायला सबवे हा बेस्ट ऑप्शनच आहे, आपल्या मुंबईतल्या लोकल्सची ही परदेशी दिलेली सुसज्ज, हायफाय बहीण.

जमिनीच्या खालून अंडरग्राउंड धावणारी, लंडनमधल्या अर्धगोलाकार ट्यूब्सना चौकोनी स्टेशनवरून पळवल्याचा प्रकार! सबवेचं जाळं इतका मोठ्ठं आणि शिस्तबध्द आहे की कुठूनही कुठेही जायचा असूदे, प्रत्येक चौकात हिरव्या-पांढऱ्या दिव्याखाली जाणारे सबवेचे जिने, आणि मिनिटा- मिनिटाला अगदी वेळेत धावणाऱ्या सबवे! ह्यांच्या शिस्तीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 

लंडन आणि बॉस्टनमधल्या रेल्वे ह्या दोन पदरी आहेत. पण १९०२ एमध्ये इथली सबवे ही बांधतानाच चार पदरी बांधली गेली, मधल्या दोन गतीमान आणि बाजूच्या प्रत्येक स्टेशन घेत जाणाऱ्या धीम्या गतीच्या. 

वर गगनाला भिडणाऱ्या इमारती, त्यांचे जमीनीत शिरलेले भक्कम पाये, त्यातून रस्ते काढत सबवेसाठी खोदलेली भुयारे, जमिनीला जमिनीशी जोडणं जेवढं कठीण त्याहून महाकठीण मॅनहॅटनला न्यूयॉर्कच्या इतर बेटांशी पाण्याखालून जोडणं! 

पाण्याच्या खाली तीनशे किलोचे नळ लावून पाणी उपसून सबवेसाठी भुयारे खोदली गेली. उपसलेली माती दोन्ही बाजूस शिस्तबध्द पध्दतीने टाकून बेटाचा आकार सव्वापट केला. सध्या सबवे सहाशे पासष्ट मैल आणि पावणेपचाशे थांब्याची आहे. 


स्टेशन्सवर नवे सिनेमे आणि नाटकांची पोस्टर्स लावलेली. 

काही ठिकाणी चित्रे काढलेली, तर काही ठिकाणी व्रात्य लोकांनी काही खोड्याही केलेल्या. 


आपल्या देशावर निरातिशय प्रेम करत देशाविरूद्ध म्हणजे तिथलं सरकार किंवा त्यांनी घेतलेली पण ह्यांना न आवडलेली धोरणे यावर कडवी टीका करणे हा बहुतांश अमेरिकन नागरिकांचा स्वभाव आहे, जो बऱ्याच ठिकाणी झळकत असतो. 

ह्यात गटबाजी पण आहे. आमच्यासमोर आम्ही दोन अमेरिकन बायकांमध्ये एका गंभीर राजकीय मुद्द्यावर भांडणं होताना पाहिली. त्यामुळे सगळ्यांना सरसकट सारखेच म्हणूनही  गणता येत नाही. 

तिकीट काढायची पध्दत अगदी सोप्पी! कार्ड टैप केलं की एकवेळचे २.९० डॉलर कट व्हायचे मग आत गेलात की कुठूनही कुठेही जा! सगळं कसं क्षणार्धात, नो मेस!

सतत सबवेचा वापर करणाऱ्या लोकांसाठी पासेस बरे पडतात. 

आमची सबवे आली आणि आम्ही आत शिरलो, आत मध्ये स्टॉप्सचे डिजिटल बोर्ड्स लावलेले, टीव्हीसारखे वाटणारे आडवे स्क्रीन्स आणि त्यावर नाताळ जवळ आलाय म्हणून कूकीज आणि केक्सच्या रिसिपीज दाखवत होते. आत अतरंगी जनता बसलेली, कुणी स्वतःशी बडबडताना दिसलं, तर कुणी पुस्तक वाचताना, कुणी झोपलेले, तर कुणी गिटार वाजवत, एक मुलगी स्वत:भोवती गिरकी घेत नृत्य सराव करत, तर काही लोक शांतपणे बसलेले!

आश्चर्य हे की तिथे मला फोनमध्ये तोंड घालून बसलेले लोकच फारसे  दिसले नाहीत. 

अगदी अगदी तुरळक टक्का, काही करत नसतील तर शांत बसलेले लोक!

हेही आताच्या काळात आश्चर्यच की!

भरपूर जागा असल्याने धक्काधक्की नाही, सगळं कसं वेगात, शिस्तीत आणि शांततेत!

आमचं स्टेशन आलं आणि आम्ही उतरलो, जिना चढून बाहेर आलो की वेगळच जग! 

जयला याची फार गंमत वाटायची, तो म्हणायचा जादुई भुयारे वाटतात ही, आतून बाहेर आलो की एक वेगळीच दुनिया स्वागत करते. 

खरंच होतं म्हणा! आतासुद्धा सेंट्रल पार्कच्या बाहेरचा हा परिसर आणि आम्ही उतरलो होतो तो भाग अगदी वेगळे! सबवे स्टेशनच्या बाहेरच आम्ही बराच वेळ रेंगाळलो. वेगवेगळया आकाराच्या इमारती, चकाचक रोषणाईने भरलेली दुकाने आणि सगळीकडे नाताळचा फिवर!

-प्रज्ञा


Comments

Popular posts from this blog

जिया रा धाकधुक होये

 जिया रा धाकधुक होये रमाताई विमानात बसल्या आणि कानात हेडफोन्स घातले तर इंग्लीश विंग्लिशमधलं गाणं वाजलं. त्यातल्या काही ओळी ऐकून खरं तर त्यांचे डोळेच भरून आले. “पियाबीन दिल लगे ना मन मा लागे चैन, कैसे जाऊ मै पराये देस” अगदी त्यांच्या आयुष्यावरच बेतलेल्या ओळी वाटतं होत्या.  दिनेशराव गेले त्यालाही आता बरीच वर्षे उलटली होती. अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार!  एकुलता एक आणि हुशार मुलगा पदरात टाकून ते अनंताच्या प्रवासास निघून गेले आणि खरंच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. स्वभावाने त्यांच्यासारख्याच असणार्‍या आणि कुशाग्र बुध्दीच्या त्यांच्या मुलाने, सत्याने वडीलांसारखा हुशार इंजिनियर होऊन आणि त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले.  आयटीची पंढरी मानल्या गेलेल्या अमेरिकेत जाऊन उच्चपदस्थ नोकरी मिळवली आणि रमाताईंनी सत्यजितला वाढवताना केलेल्या कष्टाचे चीज झाले. मागच्याच वर्षी त्याच्यासारखीच गोड, गुणी, हसरी मुलगी त्यांच्या घरी सून म्हणून आली आणि घर पुन्हा हसू खेळू लागलं. अमेरिकेला जाताच सुनेने रमाताईंचा विजा काढायला घेतला आणि, “आई आता वर्षाचे सहा महिने इकडे यायचं. पुढल्या सहा मह...

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...

गुरू ईश्वर तातमाय

  गुरू ईश्वर तातमाय गुरूविण जगी थोर काय त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही. माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही. आजाराने त्रासलेला असल...