Skip to main content

न्यूयॉर्कनामा - भाग ४











सेंट्रल पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलो आणि रस्तात एका मॅनहोलवर मेड इन इंडिया असं दिसलं आणि पावले आपोआप थबकली. माझ्या भारतात बनलेली वस्तू!


तसं आता अमेरिकेत भारतीय वस्तू किंवा माणसं नवीन राहिली नाहीत. सगळीकडे तुम्हाला ती दिसतात. पण माझ्यासारख्या नव्याने परदेशी आलेल्या माणसाला अजूनही कुठे भारतीय काही दिसलं तरी भरून यायला होतं. आपली भारतीय संस्कृती, समाज व्यवस्था, एकात्मता, मुल्ये ही इतकी दणकट आहेत की आपण भारत सोडून कुठेही गेलो आणि कितीही वर्षे राहिलो तरी आपल्यातलं भारतीयत्व सतत उफाळून येतच राहतं.

मला इथे बरेच अमेरिकन लोक विचारतात, 

मग आता तुला भारत आवडतो की अमेरिका?” 

मला एक तर कुठल्याही दोन देशांची तुलना कशी होऊ शकते हे समजत नाही कारण दोन्ही देशांची भौगोलिक स्थाने वेगळी, हवामान वेगळं, इतिहास वेगळा, आर्थिक गणिते वा व्यापार वेगळा, सीमा प्रश्न वेगळे, धार्मिकतेचे रंग वेगळे, मग कुठला देश चांगला हे कोण आणि कसं ठरवणार? 

 

आणि माझ्या भारतासोबत कुठल्याही देशाची तुलना असेल, देशच काय स्वर्गासोबत जरी स्पर्धा लावली तरी माझं हेच उत्तर असेल,

 
“ जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ” 

हे म्हणताना कुठल्याच देशाचा अपमान करायचा नाही किंवा कमीपणा द्यायचा नाही, जगातल्या कुठल्याही व्यक्तिने हव्या त्या देशात जाऊन रहायचे त्याला स्वातंत्र्य आहेच पण कोणत्याही व्यक्तीसाठी जन्मभूमी ही सर्वोच्चच असली पाहिजे असं मात्र ठाम वाटतं.


आणि मला आणखी एक गोष्ट आपल्या भारताबद्दल वाटते, त्याच लोकांनी भारताबाहेर जावं किंवा भारताला जगासमोर त्याच लोकांनी मांडावं ज्यांचं भारतावर नितांत प्रेम आहे!
ज्यांना आपलाच देश कळला नाही ते दुसर्‍या देशासमोर भारतीय नागरिक म्हणून काय जबाबदारीने वागणार?
जग ग्लोबल होत चाललंय. अमेरिका तर जगातल्या सगळ्याच देशांच्या लोकांनी भरलेली आहे, इथे भारतीय म्हणून वावरताना भारतात होत नसतील तेवढे खांदे जड असतात.

 

Because whatever you are doing here, you are directly making a statement as an Indian and defining what our country is like in front of the whole world!

तर!
त्या मॅनहोलच्या अगदी बाजूबाजूने त्यावर पाय न ठेवता कौतुकाने त्याकडे बघत आम्ही सेंट्रल पार्कमध्ये शिरलो. 

 

पार्क लागायच्या आधीच आपल्याकडे जत्रेत भरतात तशी सगळीकडे दुकाने लागलेली. सगळीकडे जणू एखादी परिकथाच चालू आहे! हॉट चॉकलेट, केक ,गोड पदार्थांची दुकाने, चॉकलेट्स, वेगवेगळे कपडे आणि ज्वेलरी मांडून ठेवलेली. सगळं अगदी आकर्षक पद्धतीने मांडून विकणं चालू! 

 

आणि काय गंमत!! मला आपले गणपती बाप्पा एका दुकानात भेटले!
तिथून मग आत शिरलो!

सेंट्रल पार्क म्हणजे एक जादुई दुनिया! ८४३ एकरात पसरलेली एक अख्खी वेगळी दुनिया! पार्कसाठी एवढी जागा तयार करणाऱ्या लोकांचे कौतुक वाटते.

 

 आत काय काय गंमती दिसतील याचा अंदाज बाहेर यायचा नाही, सबंध एक पार्कच असलं तरी वेगवेगळे कोपरे पूर्ण वेगवेगळे सजवलेले. 

कुठे एखादा पोस्टर मधून उतरल्यासारखा वाटावं असा सुंदर ब्रीजच, तर कुठे एखादे फेरीतले सारखे कॅसल , कुठे शेक्सपियरच्या नावाने सुंदर फुलांनी सजवलेले गार्डन तर कुठे तळी, बसायची सोय म्हणून वेगवेगळ्या डिझाइन्सची जागोजागी ठेवलेली बाकडी, सुंदर गवताने आच्छादलेल्या जागा, त्या बघून त्यावर लोळायचा मोह व्हावा!!

कुणी सायकलिंग करतंय, कुणी व्यायाम करतंय, कुणी घोडगाडीतून सफर करतंय, कुणी खेळतंय, कुणी कुत्री फिरवायला आलेलंय , कुणी जॉगिंग करतंय, कुणी नुसतंच पहुडलं आहे, कुणी गप्पा मारत बसलंय, कुणी गातंय, वाद्य वाजवते आहे, कुणी चित्रिकरण करतंय, कुणी चक्क लग्नही करतंय........किती मोठी यादी आहे ना!

म्हणूनच म्हणलं, एक जादुई दुनिया! 

बाहेरच्या धावपळीत अडकलेल्या, गोंगाटात वसलेल्या त्या शहराचा हक्काचा शांत, निसर्गरम्य मनोहारी कोपरा म्हणजे सेंट्रल पार्क!
जगातल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी, पर्यटकांकडून दरवर्षी सर्वाधिक भेट दिली जाणारी ही जागा!
आणि अर्थात भेट द्यायलाच हवी अशी जागा! दरवर्षी सव्वाचार करोड लोक सेंट्रल पार्कच्या दर्शनाला येतात. 

ख्रिसमससाठी म्हणून मध्यात आईस स्केटिंग पार्क तयार केलं होतं. पार्कमध्ये खूप सायकलस्वरांच्या बग्ग्या फिरताना दिसतात. पार्क अतिशय मोठे असल्याने तुम्हाला पार्क फिरवायचं काम ह्या बग्गी करतात. तासांप्रमाणे त्याचे दर! पण आम्हाला निवांत वेळ घालवत रेंगाळत पार्क बघायचे असल्याने आम्ही चालत फिरायचं ठरवलं. 

इथे बऱ्याच इंग्रजी सिनेमांचं आणि काही आपल्या बॉलिवूडच्या गाण्याचं शूटींग झालेलं असल्याने बरेचसे भाग उगाच पाहिल्या पाहिल्यासारखेही वाटतात.
मला सगळ्यात जास्त आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं होतं की हा सगळा परिसर माणसाने तयार केलेला आहे, इथला सगळा निसर्ग माणसाने वसवलेला आहे. 

 

होय! 

अमेरिकेत पूर्वेकडील देशातून येण्याऱ्या स्थलांतरासाठी न्यूयॉर्क एक महत्वाचं शहर होतं. अमेरिकेत येऊन मिळेल ते काम करुन ही मंडळी इथे स्थायिक होत होती. अर्थात नव्याने वसलेल्या शहरांसाठी अमेरिकेलाही मनुष्यबळ आवश्यकच होते. इथे बऱ्याच देशाच्या बऱ्याच सत्तांनी राज्य केलं असल्याने त्या त्या वेळी झालेल्या आक्रमणांमध्ये सत्तेसोबत येऊन इथेच कायम वास्तव्याला राहिलेलीही बरीच मंडळी होती. न्यूयॉर्कवर परकीय राजसत्तांचं एवढं आक्रमण झालंय की ह्या शहराने त्या सगळ्यांचे सगळे रंग आत्मसात केलेत.  

 

एकोणिसाव्या शतकांत ह्या शहरात स्थलांतरीत मजूर वर्गाची संख्या फुगली. जागा थोडकी आणि माणसे जास्त अशी परिस्थिती त्यामुळे घराघरात माणसे कोंबली जात होती. लहान मुलांना खेळायला शहरात जागा उरली नव्हती. 
इथले जे धनाढ्य युरोपातल्या सुंदर वन वाटिका बघून मोहित झाले होते त्यांना तसंच इथेही काही तरी करावं अशी इच्छा होती. शहरांत गर्भश्रीमंत आणि अतिशय गरीब असे दोन वर्ग पडलेच होते. त्यांच्यातली विषमता मिटावी, सगळ्यांनी मिळून एकाच जागेवर आनंद घ्यावा, लहान मुलांना खेळायला जागा मिळावी आणि देशाच्या सौंदर्य वैभवात भर घालावी या सगळ्या उद्देशांनी सेंट्रल पार्क निर्मितीची संकल्पना उदयास आली. 

 

इथे पार्कच्या जागेत वस्त्या होत्या. तिथल्या लोकांना जागा रिकामी करुन दुसरीकडे स्थलांतरीत होता यावे यासाठी मालमत्तेची भरपाई म्हणून नगरपालिकेने ७५ लाख डॉलर्स दिले! हा आकडा त्या काळाच्या मानानेही अवाढव्यच होता. 

पार्कच्या निर्मितीची योजना आखायचे काम ज्याला दिले होते ते ऐकून मी भलतीच खूश आणि थक्क झाले. हे काम दिलं होतं चक्क एका लेखकाला!
त्याच्या कल्पना शक्तीच्या प्रतिभेचा अत्यूच्च आविष्कार करत त्यानेही ही जबाबदारी अफलातून पार पाडली.  

त्याचं नाव, फ्रेडरिक लॉ आल्मस्टेड! त्याने काल्हवर्ट व्हाउक्स नावाच्या वस्तुतज्ञाची मदत घेऊन मॅनहटनच्या मध्यात सरकारने कोट्यावधी डॉलर्स खर्चून उभ्या करत असलेल्या ह्या जागेचं रूपच बदलून टाकलं. 

 

१८५८ ला हे काम चालू झालं. हजारो मजूर हाताशी घेत, लाखोंनी झाडे लावली, तळी खोदली, रस्ते बनवले, कारंजे उभी केली, पूलं बांधात १८६३ मध्ये ह्या उद्यानाची रूपरेषा पुर्ण झाली. उद्यानाचे मुख्य भाग आखताना हिरव्या कुरणाचा पॅस्टोरोल, शास्त्रोक्त संगीतासाठी मॉल आणि निसर्गाच्या आविष्कारासाठी नैचरल अश्या तीन विभागांचा विचार फ्रेडरिकसमोर होता. 

त्यात वेळोवेळी कालानुरूप बदल केले जातात त्यामुळे आपण पाहतोय ती जागा इतक्या जुन्या काळातून आली आहे असही वाटत नाही.

आधी फक्त एकच काल्पनिक पुतळा असलेल्या ह्या उद्यानात जागोजागीच्या लोकांनी आपापल्या देशातल्या महान लोकांचे पुतळे इथे उभे केले. आपले गांधीजीही ह्या उद्यानात भेटतात. आम्ही एवढं चालत होतो परंतु आजूबाजूचं सौंदर्य थकू अजिबात देत नव्हत.

 

थंडीमुळे अंधारही लवकर पडला होता पण अंधारातही पार्कचं सौंदर्य लपत नव्हतं. वेगवेगळया वास्तुशास्त्राचे नमुने आजुबाहूस पूलं, कमानी, कारंजे, बोगदे, पायऱ्या इत्यादीतून झळकत होते. एका सुंदर टाइल्सनी भरलेल्या बोगद्यातून (जो अनेक अनेक सिनेमांमध्ये दाखवला गेला आहे) तिथून जाताना एक मुलगी गाणे गात उभी होती. बोगदाभर आवाज घुमत होता. गाणे माझ्या आणि जयच्या अतिशय आवडीचे, 

cant help falling in love with you” 

 

प्रचंड रोमँटिक वातावरण होतं. आजूबाजूआस पिवळे लाईटस् लागलेले, बोगद्याबाहेर उडणारे कारंजे, जोडपी एकमेकांना बिलगून डोलत तिच्याभोवती गाणे ऐकत शांततेत उभी होती. 

 

मी हळूहळू गुणगुणत होते. ते तिला ऐकू आलं बहुतेक तिने खुणेने हात केला, मी सहज जाऊन तिला जॉइन झाले आणि आम्ही दोघींनी गाणं म्हणलं, म्हणल्यावर मी जयकडे बघून 

“दिस वन इज़ फॉर यू!” म्हणल्यावर आजूबाजूचे चेहरे 
awwपूर्ण झाले. जय लाजून लाल झाला  ती गोष्ट वेगळी!


जगाच्या दोन टोकावरच्या आम्ही दोघी, पण सुरांनी जोडल्या गेलेल्या, काव्याने बांधल्या गेलेल्या, संगीताला भाषा नसते हेही खरंच! आम्ही निघताना तिने मला, “तू सुंदर गातेस गं” म्हणून  मिठी मारली. तिची मिठी आणि सुर मी दोन्ही जपून आठवणीच्या कप्प्यात जपून ठेवलेत. 

 

सेंट्रल पार्कबद्दल विस्तारांत लिहायचं ठरवलं तर मला एक सबंध लेखमाला फक्त त्यासाठी लिहावी लागेल त्यामुळे बऱ्याच गोष्टी फक्त थोडक्यात लिहिते आहे. 

 

उरलेलं, सेंट्रल पार्क शेवटच्या दिवशी पाहूया म्हणून आम्ही बाहेर पाडून फिफ्थ अव्हेन्यूला निघालो. धनाढ्यांनी मुक्तहस्ताने पैसा उधळून वसवलेल्या ह्या रस्त्याची श्रीमंती आणि गंमत नाताळच्या रोषणाईत चौपट होते. ती रात्रीच बघायला हवी. सेंट्रल पार्कच्या हिरव्या शांत अनुभवानंतर आता आम्ही निघालो होतो डोळे दिपवून टाकणारी, आयुष्यात पुन्हा कुठल्याच रोषणाईने आम्ही इम्प्रेस नाही याची काळजी घेणारी झगमग बघायला! 



Comments

Popular posts from this blog

जिया रा धाकधुक होये

 जिया रा धाकधुक होये रमाताई विमानात बसल्या आणि कानात हेडफोन्स घातले तर इंग्लीश विंग्लिशमधलं गाणं वाजलं. त्यातल्या काही ओळी ऐकून खरं तर त्यांचे डोळेच भरून आले. “पियाबीन दिल लगे ना मन मा लागे चैन, कैसे जाऊ मै पराये देस” अगदी त्यांच्या आयुष्यावरच बेतलेल्या ओळी वाटतं होत्या.  दिनेशराव गेले त्यालाही आता बरीच वर्षे उलटली होती. अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार!  एकुलता एक आणि हुशार मुलगा पदरात टाकून ते अनंताच्या प्रवासास निघून गेले आणि खरंच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. स्वभावाने त्यांच्यासारख्याच असणार्‍या आणि कुशाग्र बुध्दीच्या त्यांच्या मुलाने, सत्याने वडीलांसारखा हुशार इंजिनियर होऊन आणि त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले.  आयटीची पंढरी मानल्या गेलेल्या अमेरिकेत जाऊन उच्चपदस्थ नोकरी मिळवली आणि रमाताईंनी सत्यजितला वाढवताना केलेल्या कष्टाचे चीज झाले. मागच्याच वर्षी त्याच्यासारखीच गोड, गुणी, हसरी मुलगी त्यांच्या घरी सून म्हणून आली आणि घर पुन्हा हसू खेळू लागलं. अमेरिकेला जाताच सुनेने रमाताईंचा विजा काढायला घेतला आणि, “आई आता वर्षाचे सहा महिने इकडे यायचं. पुढल्या सहा मह...

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...

गुरू ईश्वर तातमाय

  गुरू ईश्वर तातमाय गुरूविण जगी थोर काय त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही. माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही. आजाराने त्रासलेला असल...