माणूस ज्या वातावरणातून आलेला असतो त्या वातावरणाचा त्याच्यावर तगडा प्रभाव असतो. जरी पुढे आयुष्य वेगवेगळ्या वळणातून जात राहीलं तरी आपला एक ठाम ढाचा तयार झालेला असतो त्याच्या मूळ रुपात फारसा फरक पडत नाही असं मला वाटतं. मी ज्या वातावरणातून आले ते आणि आत्ता आहे ते वातावरण एकदम टोकाचं विरुद्ध! म्हणजे भौगोलिक रित्या तर आहेच पण सगळ्याच अर्थाने खूप फरक आहे. पण मी म्हणाले तसं की आपल्या स्वभावाचा मूळ ढाचा बदलत नसतो.
माझा जन्म एका माणसांनी भरलेल्या वाड्यात झाला. हेही थोडके म्हणून आजोबांचा आणि वडीलांचा व्यवसाय असा की ज्यात घरी रोज खूप माणसे यायची. ज्या भागात राहायचो तिथे सगळे जवळचे दूरचे पण नात्यातलेच लोक, त्यामुळे घराची व्याख्या आणि त्याचा आवाका मोठा. घरच्या बायका म्हणजे आई आणि आजी इतक्या प्रसन्न आणि हसऱ्या होस्ट की घरी नातेवाईकांचाही सतत राबता असे.
माझ्या वैयक्तिक आयुष्यात ही सगळी मंडळी, शाळेतले कॉलेजातले दोस्त, वक्तृत्वाशी संबंधित लोक, नाटकाशी संबंधित लोक, गाण्याशी संबंधित लोक, साहित्याशी संबंधित लोक, इंजीनियरिंगशी संबंधित नंतर कंपनीशी आणि असा आवाका आयुष्यात फक्त वाढतच गेला. तो ओसरला कधीच नाही.
पुण्यात आल्यावरही तिथलं माझं असं एक मोठं कुटुंब जोडलं गेलं. माझी आई माझ्याकडे पुण्याला आल्यावर थक्क झाली होती. तू इतकी माणसं कमवली आहेस याचा अंदाज नव्हता म्हणाली. घरच्यांसाठी माणसं ही कमवायची आणि जपायची गोष्ट, त्याचे फायदे तोटे दोन्ही असतात.
फायदा असा की मला वेगवेगळ्या वयाच्या, प्रकारच्या आणि स्वभावाच्या लोकांशी कसं डील करावं याचं तगडं प्रशिक्षण घरीच मिळालं आहे. याचा व्यावसायिक आयुष्यात शंभर टक्के उपयोग होतो. प्रत्येकाच्या मनाचा विचार करावा हा माझ्या घरच्या संस्कार, विशेषत: आईचा, त्यामुळे मला दुसर्याच्या खुर्चीत बसून विचार करता येतो. तोच लिखाण करायला उपयुक्त ठरतो असं मला वाटतं. वेगवेगळी माणसं एखाद्या गोष्टीचा किती वेगवेगळा विचार करतात हे मी जवळून पाहिलं आहे.
पण तोटा असा की तुम्ही माणसं चांगली जाणून असल्याने गर्दी असली तरी सगळ्या लोकांना तितकेसे जवळ करू शकत नाही. प्रत्येक प्रकारचा अनुभव गाठीशी असलेल्या माणसाला प्रत्येक गोष्ट त्या अनुभवाच्या चष्म्यातून बघायची सवय आपसूक लागते.
लग्न झाल्या झाल्या एकाच आठवड्यात मी अमेरिकेला आले. मी लहानपणापासून पाहिलेल्या माझ्या घरी येणार्या सुनांचे लग्नाचे किंवा सासरचे आयुष्य आणि माझे आयुष्य यात फार मोठा फरक पडला. अर्थात जोडीला माझा जीवाभावाचा खास मित्र नवरा म्हणून असल्याने आनंद ओसंडून वाहत होता ही गोष्ट निराळी.
इथे आल्या आल्या एका गोड कुटुंबाने माझं स्वागत केलं होतं. त्या दिवशी ही आपल्या अमेरिकेच्या आयुष्याची नांदी आहे याचा मात्र अंदाज आला नव्हता. घर पूर्ण लागल्यावर आणि बाहेर पडायला लागले तसे पुन्हा लोक भेटत गेले, जोडत गेले.
माझ्या नशीबाने मला दोन प्रकारची माणसं भेटतात. एक, माझ्यावर अतिशय नितांत प्रेम करणारी, माझं कौतुक वाटणारी वा काही ठिकाणी आदरच! आणि दुसरी, माझं बोलणं, मतं किंवा एकंदरातच व्यक्तिमत्व सहन न होणारी, पहिल्या गटातील लोक ९० टक्के आहेत. दुसर्या गटात १० टक्के लोक आहेत. मी या १० टक्के लोकांचा मागे एकदा विचार आणि अभ्यास केला आणि मला कळलं, ही दुसऱ्याचं काहीही न बघवणारी, फक्त स्वस्तुतीत रमणारी आणि दुसर्याचा द्वेष करणारी माणसं होती. त्यांना कुणीच प्रिय नव्हतं. त्यांना मीच काय कुणीच सहन होत नाही हे कळलं आणि उरलेल्या ९० टक्के लोकांनी आयुष्य किती सुंदर केलंय याची अजूनच प्रचिती यायला लागली.
मला लोकांचं प्रेम आणि कौतुक फार मिळालं आहे. लहानपणापासूनच या दोन्हीचा वर्षाव मी अनुभवलाय. आईने ते कधी डोक्यात जाऊ न दिल्याने त्याचा काही फरक पडला नाही उलट कृतज्ञता वाटतं राहिली. माझ्या नवऱ्याला मात्र, तू तशी आहेस, म्हणून लोक तुझ्यावर प्रेम करतात असं वाटतं. हे त्याचं माझ्यावरचं प्रेम आहे. कारण काहीही असो पण मला खूप लोक भेटतात. चांगले लोक भेटतात. ते माझ्या आयुष्यात काही तरी वाढीस ठेवून जातात.
माझ्या अमेरिकेतल्या घरात माणूस खंडत नाही. आमच्याकडे कुणी तरी येतं किंवा आम्हाला प्रत्येक वीकेंडला कुठून तरी आमंत्रण असतं. फक्त भारतीयच नाही तर जगातले लोक आम्हाला जोडलेले आहेत. जगाच्या दुसर्या टोकावर येऊनही माणसांच्या उबदार गराड्यात राहायला मिळणं किती भाग्याचं आहे याची जाणीव पदोपदी होत राहते.
इथल्या लोकांना माझ्या पूर्व-आयुष्याबद्दल माहिती नाही. माझं कुळमुळ माहिती नाही, माझे कला गुण किंवा माझं यश अपयश माहिती नाही. त्यांना मी आजची आत्ताची प्रज्ञा माहिती आहे. त्यांना ती तिच्या स्वभावासाठी आवडते. “आपल्यात काय विशेष आहे असं” हा विचार डोक्यात पिंगा घालतो. आपण ह्या एवढ्या प्रेमाचे धनी का होतो? याचा विचार खेळत राहतो. त्याचं लोकांनी बरोबर उत्तर दिलं तरी ते स्वीकारायला मन धजत नाही. हे सगळं ओटीत पडलंय पण हे मी कधी मागितलेलं नाहीये याची जाणीव तीव्र आहे. पण म्हणून ह्या भरलेल्या ओटीबद्दल जी प्रचंड कृतज्ञता वाटते ते तसुभरही कमी होत नाही.
मी ज्या कलाक्षेत्रात रमते ते लोकांच्या बाबतीत दोन टोकांचं आहे. रियाज एकट्यात पण मैफल लोकांत, लिखाण एकट्यात पण वाचायला सगळं जग, विचार एकांतात पण मांडला जातो सगळ्यांसमोर. सतत एकांत आणि गर्दीचा ऊन-सावलीसारखा खेळ खेळायला लावणाऱ्या ह्या कला. माझ्यावर ज्या गुरूंचा संस्कार आहे, त्यांनी कला आधी शिकण्यासाठी आणि निर्मितीसाठी आहे मग विचार पक्का झाल्यावर ती सादरीकरणासाठी तयार होईल हा विचार इतका पक्का बिंबवला आहे की मला हा एकांत लागतोच.
त्यामुळे जर कुणी मला हा प्रश्न विचारला की “लोकं की एकांत” तर माझं उत्तर दोन्ही असं येईल. इकडे येताना आपल्याला एकांताचं घबाड हाती लागणार आहे ह्याची मला जाणीव होती. माझ्यातला कलाकार प्रचंड सुखावला होता. त्याला विचार करायला, निर्मितीला आणि मांडणी करायला जबरदस्त स्पेस मिळणार होती.
तसा तो मला मिळालाही पण फार चटकन मी पुन्हा लोकांच्या गर्दीत मिसळले. मी मिसळले की गर्दी जमा झाली मला माहिती नाही. माझा नवरा मला चिडवतो की मी इथे मागचे दोन वर्ष होतो आणि एकही व्यक्ती संपर्कात नव्हती पण माझी बायको आली तीच मुळी तिचं “खानदानी माणसांचं मॅगनेट” घेऊन!
मग काय बघता? आमच्या चार भिंतीचं घर झालं!”
तो हे लोकांना कौतुकाने सांगतो तेंव्हा मला खरं तर मनातून खूप बरं वाटतं. एका न्यूट्रल कुटुंबातून आलेल्या त्याला ह्या सगळ्याचं फार कुतुहल आणि कौतुक आहे हे माझ्यासाठी सुखावणारं आहे. आमची पिढी आणखी ३०- ४० वर्षांनी एक कोरडा तंत्रज्ञानी काळ पाहणार आहे जिथे लोक असे कितीसे एकमेकांना आवर्जून भेटत राहतील अशी एक भीती मला वाटतं राहते.
त्यामुळे आज लोक पूर्णत: तांत्रिक वागत नाहीत तोवर मला ही माणुसकीची ओल मनात पूर्ण भिजवून घ्यायची आहे.
आज हे लोकांचं प्रेम फक्त स्वभावामुळे मिळत असेल का तर मला तसं नाही वाटत. ते मुख्य कारण असेलही कदाचित पण त्यामागे त्या लोकांचा स्वभावही कारणीभूत असतो. माझ्या आजी आजोबा आणि आई पपांची इतकी वर्ष कमावलेली जबरदस्त पुण्याई माझ्या मागे उभी आहे. त्यांनी केलेल्या आणि लोकांनी त्यांच्यावर केलेल्या प्रचंड प्रेमाची ही फळं आहेत. त्यांनी फक्त पुण्य कमावलं पण त्याचा वापर केलाच नाही, ही चांगल्या कर्माची गाठोडी आमच्या हाती आयती ठेवली.
आमचं घर इतकं लहान होतं, पण सतत इतकं भरलेलं असायचं की माझी कधी कधी चिडचिड व्हायची. शाळेतून घरी आल्यावर यूनिफॉर्म बदलायला जगा नसायची. अभ्यास करायला कधी वेगळा टेबल किंवा खोली नव्हती. रियाजाला लागणारी शांतता कधीच मिळाली नाही. कविता लिहिली तर कुणी तर बघेल म्हणून ती जिन्यात लिहून तिथेच बोळा करुन बंबात फेकून दिली जायची. आरशासमोर दोन मिनिटे जास्त घोटाळलो की कुणी तरी ओरडायला हजर असायचंच. कपडे ठेवायला जागा नाही म्हणून कपडेच जास्त नव्हते. मला दुपारी झोपायची अजिबात सवय नाही कारण लोकं दुपारभर घरी असायची, झोपायला जगाच नसायची. नंतर मी नववीत होते तेंव्हा समोर एक घर घेतलं पण तोवर गोंगाटाची इतकी सवय झाली होती की त्या शांत घरात मन रमलंच नाही. फक्त रात्री झोपायला जायचं घर एवढीच त्या घराची उपयुक्तता राहिली.
ह्या सगळ्याबद्दल ना तेंव्हा तक्रार वाटली ना आत्ता! कधी कधी वाटतं हे सगळं मिळालं असतं तर आयुष्याचा आयाम वेगळा खचितच असता. पण हे न मिळता जे मिळालं त्याने आयुष्य इतकं समृद्ध केलं की आता तक्रारीला वाव नाही. ते घर लहान होतं पण तिथे राहणार्या लोकांची मने इतकी मोठी होती की त्याने आयुष्याची श्रीमंती कैक पटीनी वाढली. पुन्हा कधीच ना अनुभवलेली लोकांची तुफान गर्दी, त्यांच प्रेम आणि माया मिळाली. कित्येकांचे आशीर्वाद मिळाले. आणि आज जगाच्या दुसर्या टोकांवर मला मिळणारी ही माया हे त्या आशीर्वादाचं फळ आहे.
आज माझ्या अमेरिकेतल्या घरात अत्याधुनिक किचन आहे. माझं गेट रिमोटवर उघडतं. एक मेसेज टाकला की सेवेस लोक हजर होतात. माझ्या कपड्यांसाठी एक स्वतंत्र आणि मोठा वॉर्डरोब आहे. मला तेंव्हा हवीशी वाटलेली प्रत्येक गोष्ट सेवेस आहे आणि मुख्य म्हणजे खूप माणसंही आहेत!
याला पुण्याईचं गाठोडं म्हणावं, नाही का!
पुन्हा ह्या लेखाच्या पहिल्या परिच्छेदावर येते. मी दोन्ही वातावरण पाहिली. अगदी टोकाची विरुध्द परिस्थिती! पण तरीही ह्या माझ्या दोन्ही जगात माणसं मात्र कायम राहिली. कारण माझा ढाचा तसा तयार झालेला आहे. कुठेही गेले तरी मला माणूस लागतो. माणसांना मी लागते. माझा नवरा म्हणतो तसं, माझी बायको शोधायची असेल तर माणसांचा गराडा शोधा, मध्यभागी त्या गर्दीने जी घेरलेली असेल ती माझी बायको! मजेशीर आहे पण खरं आहे. माझ्यातल्या कलाकारानेही याचा आता स्वीकार केला आहे. ह्या आयुष्यातल्या गर्दीचे त्याच्यावरही उपकार आहेत कारण लोकांनी माझ्यातल्या कलेवरही माझ्याएवढंच प्रेम केलंय.
हे माणसांचं मॅगनेट ही मला माझ्या घरून मिळालेली इस्टेट आहे. ती वडिलोपार्जित इस्टेटीसारखी मी जपणार आणि अभिमानाने पुढच्या पिढीस सुपूर्द करणार!
- प्रज्ञा
Sundar blog vachla ani khup relatable vatla🌼❤️
ReplyDeleteThank you Swara!:)
Delete