#जेरॉड्स_कॅफे_आणि_राग_यमन
मागच्या महिन्यात मला अमेरिकेत येऊन सहा महिने पूर्ण झाले आणि नवरा म्हणाला लेट्स गो ऑन अ डेट!
त्याने मेसा गावातला एक झकास कॅफे शोधून काढला आणि आम्ही निघालो. तिकडे गेल्यावर पाहतो तर एक हिप्पी वाईबचा, जागोजागी कलाकृतींनी भरलेला कॅफे होता. तिथे एक स्टेज सजवलं होतं. समोर काही खुर्च्या वगैरे मांडून ठेवल्या होत्या.
खूप दिवसांनी मोकळं स्टेज आणि माईक बघून मला एक तर मोह आवरत नव्हता. मला स्टेजवर सगळ्यात जास्त बरं वाटतं. लहानपणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचं फळ!
(क्रेडीट गोज टू आई
)

नवऱ्याला म्हणलं आज सहा महिने पूर्ण झाले म्हणून मी गाणं म्हणणार! नवऱ्याला आधीच स्टेजची भीती! मी स्टेजवर उभारणार म्हणलं तरी त्याची धडधड वाढली! पण तरी बिचारा, या अमेरिकी पब्लिकला रूचेलंसं म्हण काही तरी म्हणाला!
मी गाडीत कोक स्टुडीओचं पसूडी गाणं ऐकत आलेले, तेच म्हणू असं ठरवून मी फळ्यावर नाव लिहायला गेले! तोवर फळा भरलेला. पहिलं स्थान मोकळं दिसलं. पटकन गाणं म्हणून निघावं म्हणून मी तिथे नाव लिहीलं तर एक अमेरिकन माणूस,
“You have guts Woman!”
असं मागून म्हणाला. मी विचारलं, का रे असं का म्हणतो आहेस. तर म्हणाला, “मी इथे नेहमी येतो. पहिल्यांदा सादरीकरणाला कुणी तयार होत नाही. कॅफेचा क्राऊड कसा असेल कळत नाही मग रिस्पॉन्सची भीती वाटते.”
मी त्याला म्हणलं, मला स्टेजची खूप आठवण येत आहे म्हणून मी गाणं म्हणतेय. मला रिस्पॉन्सची भीती वाटत नाही” तर त्यावर गोड हसून आता मला तुझं गाणं ऐकायचंय म्हणाला.
पाच मिनीटांत डोकभर लांब वेण्या घातलेला आणि त्या झोकात उडवणारा आमचा होस्ट आला. कॅफेचे लाईट्स बदललेले. खुर्च्या भरल्या. फळाही भरला.
त्याने थोडं चीयरींग करत सुरूवात केली आणि माझं नाव घेतलं. मी स्टेजवर गेले आणि उफ्फ्फ!!! काय भारी वाटलं!! माईक हातात घेतल्यावर तर बाहू बळकट झाल्यासारखे वाटले. तोच फिल! तीच नशा फक्त यावेळी प्रेक्षक वर्ग एकदम अनोळखी!
मी गाण्याची थोडी माहिती देऊन गाणं सुरू केलं आणि बघते तर काय! सगळे माना डोलवत ते गाणं एन्जॉय करत होते. त्यात एक आलापवजा जागा होती. ती म्हणल्यावर तर त्यांनी वोह्ह्ह म्हणत जोरात रिस्पॉन्स दिला!
गाणं संपलं आणि जोरात टाळ्या वाजायला लागल्या. आमचा होस्ट उडया मारत स्टेजवर आला आणि त्याने तु असं काही तरी प्रो गाशील असं वाटलंच नव्हतं म्हणत खूप कौतुक केलं. मग म्हणाला तुझी एक छोटी मुलाखत घेऊ.
मी कुठून आले आहे, काय करते वगैरे विचारलं. मी आत्ताच अमेरिकेत आली आहे म्हणल्यावर सगळ्या क्राऊडने “Welcome to States” म्हणून जोरात ओरडत चीयर केलं.
माझा नवरा माझ्या गाण्यानी, स्टेजवर निवांत वावरण्याने, त्या लोकांनी केलेल्या कौतुकाने पार भारावून गेला होता.
होस्टने मला तुला एवढं चांगलं गाणं कसं येतं विचारलं. त्यावर मी काही वर्ष हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत शिकले आहे म्हणल्यावर ते नेमकं कसं असतं आणि काय वेगळं असतं विचारलं. मी आपल्या स्वरपद्धतीची, रागमालेची थोडी माहिती दिली तर इंटरेस्टींग!!! तु आम्हाला थोडं शिकव ना म्हणाला.
एक तर मी एका अनोळखी जागी, परक्या देशी आपल्या शास्त्रीय संगीताबद्दल बोलतेय याचाच अभिमान वाटत होता. त्यात ते गायचं म्हणल्यावर कोण आनंद झाला!
मला यमन आठवला! यमन प्रियच आहे.
मी त्याला म्हणलं चल, मी काही स्वरसमूह म्हणते, तू मला फॉलो कर. आणि पहिला आलाप म्हटला,
नि रे ग मं ध नी ध नी सां….
आणि सगळेच माझ्या मागे र, ध चा अमेरिकन उच्चार करत जोरात आलाप म्हणायला लागले! मी आणखी दोन तीन आलाप म्हणले तर तेही उत्साहाने रिपीट करायला लागले. त्यांना मजा यायला लागली होती. मी फिरकी घ्यावी म्हणून,
नि रे नि रे ग रे सा नी ध नी ध नी रे सा नी ध मं ध मं ध नि ध प मं ग मं प मं ग रे सा। नि रे ग मं ध नी सां॥
ही तान तानेच्या लयीतं अख्खी म्हटली आणि त्यांची भंबेरी उडाली. सगळे हसायला लागले आणि टाळ्या वाजायला लागले. होस्टच्या शुभेच्छा स्वीकारत मी खाली उतरले. पुढचा स्टॅंडअप कॉमेडियन आला आणि म्हणाला, “तिने एवढी जबरदस्त सुरूवात केली आहे की आता मी काहीही म्हणलो तरी तुम्हाला ते चीपच वाटेल!”
खाली उतरल्यावर सगळे भेटून भेटून गाणं छान झालं म्हणून सांगू लागले. घर लांब आहे, पोहोचायला उशीर होईल म्हणून निघालो तर सुरूवातीला फळ्यापाशी भेटलेला कलाकार मला शोधत आला आणि म्हणाला,
“ डियर तुला एक सांगू, तू नेहमी पहिल्याच स्थानावर नाव लिहीत जा! आणि प्लीज पुन्हा ये. आम्ही वाट पाहू तुझी”
म्हणत निरोप घेऊन गेला. मला प्रतिसादापेक्षा स्टेजवर खूप दिवसांनी गेलो म्हणून जास्त आनंद होत होता. तर नवरा अतीव कौतुकाने बघत होता. त्या क्षणाचं शूटींग करावं हेही त्याला सुचलं नाही! त्याला काही सुधरत नव्हतं. त्याच्या डोळ्यातलं मोलाचं कौतुक मी कधी विसरूच शकत नाही.
यमन गाताना माझ्या गुरू वृंदाताई सरवडीकर यांची प्रचंड आठवण आली. हे क्षण त्यांच्यामुळे पाहायला मिळाले. त्यामुळे ह्या कौतुकावर सगळा हक्क माझ्या गुरूंचा

बाकी डेट मात्र अशी अविस्मरणीय झाली!
- इंग्लिश कॅफेत यमन गाणारी प्रज्ञा
Comments
Post a Comment