#लक्ष्मी_येते_तेंव्हा
तुम्ही कोणत्या वेळी कुठे आणि का असता याची उत्तरं देवाच्या वहीत आधीच लिहीलेली असतात.
एका अनोळखी जोडप्याशी आमचा रस्ता क्रॉस होतो. त्यांची मनुष्यबळाची निकड कळते आणि पुर्वबंध असल्याप्रमाणे आम्ही त्या परिवाराचा भाग होतो.
रात्र भीतीत सरते, बाळ वेळेआधी जगात येऊ पाहातं,
जीव घाबरा होतो पण देवाचं सगळं आधीच ठरलेलं असतं त्याप्रमाणे रामनवमीच्या दूसऱ्या दिवशी सकाळी ऊबदार दूलईत गोड बाळ हातात येतं.
आम्ही बाळाचे नातेवाईक नाही, रक्ताचे नाते नाही. मित्रपरिवारात नाही पण आम्हाला त्याला जन्मतः हातात घ्यायचं पुण्य मिळतं. आमचा स्पर्श त्याला होतो.
त्याच्या इथे येऊ न शकलेल्या नातेवाईकांच्या जागी आता आम्ही ऊभे असतो.
त्यांचे भारतातले नातेवाईक फोनवर, समोर अजूनही भूलीत असणारी बाळाची आई मदतीसाठी थॅंक्यू थॅंक्यू म्हणत असतात.
पण त्यांना हे कसं सांगावं की जन्माचा हा अभूतपूर्व सोहळा पाहायला आम्हाला सामील करून घेतलं त्यासाठी आम्हीच तुमचे आभार मानले पाहिजेत.
होणारी मुलगी आहे म्हणून तिला जन्माआधी लाडाने ठेवलेलं नाव लक्ष्मी असतं.
तिचा छोटासा भाऊ जो रात्रभर आई लेबरमधून जाताना मायेनं आमच्या कुशीत विसावलेला असतो तो आतुरतेने लक्ष्मीची वाट पाहात असतो.
आणि लक्ष्मी नावाच्याच डॉक्टर डिलीवरी करायला हजर होतात. एक लक्ष्मी दूसऱ्या लक्ष्मीला जगात घेऊन येते.
काय योगायोग!
माझ्या आईच्या वाढदिवशी मी एका दूसऱ्या आईचा जन्म अनुभवते अन् अंग काट्यांनी शहारून उठतं….
बाळ इवलेसे दोन दात घेऊन जन्मतं आणि सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय बनतं.
अमेरिकेत आईसोबत बाबाही ऑपरेशन थियेटरमध्ये असतो. लक्ष्मीचे बाबा बाईची प्रसवकविता पहिल्यांदा पाहून आदराने आईसमोर उभे असतात.
एका “मुलीच्या बापाचा” जन्म झालेला असतो.
काय घडत असतं हे नेमकं कळतच नसतं फक्त डोळ्यातून पाणी वाहत असतं. प्रत्येक माणसाचं दूसऱ्या माणसाशी लाल रंगाच्या रक्ताचं नातं असतं एवढं पक्क समजलेलं असतं.
बाळ लगेच आपलं होतं. आता तिला सोडून घरी जावंसं वाटत नसतं..
माझ्या नवऱ्याचा जन्म असाच अचानक अनोळखी गावी झलेला असतो. कुणीच ओळखीचं नसताना एक भला नातेवाईक रात्रीतून सासूसासऱ्यांच्या मदतीस धावलेला असतो. तिथेही छोटा मुलगा ( दिर) असांच बसून असतो.
जयवर आणि माझ्यावर ह्या ऋणाचा डोंगर असतो.
आज ह्या ऋणाचा एक छोटासा कण दूसरीकडे रूजवलेला असतो.
तशीच घटना, तीच परिस्थिती जवळपास तीन दशकांनंतर आम्ही जगाच्या दूसऱ्या टोकावर अनुभवत असतो.
Deja Vu!
हे ऋणबीज आता वाढत जाणार, बहरत जाणार असतं.
लक्ष्मी खूप मोठी झाली की तिला पुन्हा भेटून आम्ही आमचा ऋणानुबंध जपणार असतो.
जवळ कोणी नाही म्हणून लेकराची हौस नको राहायला म्हणून मन आता वेगात पुढची तयारी करू लागतं.
एक विलक्षण रात्र सरलेली असते.
आपण माणूस म्हणून आणि बाई म्हणून आतून बाहेरून बदललेलो असतो.
सकाळी दोन आयुष्य चालू होतात.
एक तिचं नवीन
एक आमचं बदललेलं….
Happy birthday dear Laxmi
Life is a beautiful thing.
You will lead a great one
-प्रज्ञा जय
Comments
Post a Comment