#थाप_प्रज्ञे_थाप
हार्डकोअर भाकरी प्रेमी असल्याने आपल्याला उत्तम भाकरी जमावी असा प्रयास बरेच दिवस चालू होता.
आमच्या म्हणजे माझ्या आणि जयच्या घरात जेंडर बायस्ड रोल्स नाहीत. आम्हाला दोघांनाही उत्तम साग्रसंगीत स्वयंपाक जमतो. एकमेकांना आयतं बसून खाऊ घालण्यात आम्हा दोघांनाही परमानंद होतो.
पण खाण्याची मजा आणि रांधायची जादू प्राप्त झालेली असली की पावलं स्वयंपाकघरांत रेंगाळतात हेही तेवढंच खरं!
स्वयंपाकाकडे आम्ही आरोग्य, जिभेचे चोचले आणि मेडिटेशन म्हणून बघतो. पदार्थ नीट साधावा म्हणून आपण त्यात इतके गुंततो की तेवढा वेळ मनातल्या इतर विचारांना सुट्टी!
तर!
भाकरी मात्र मला हुलकावण्या देत होती.
जयनी प्रयत्नच सोडले पण मला ते सोडवेनात.
मी आपली तिच्यामागे अन् ती मात्र तुटायच्या, कडक व्हायच्या, चिकटायच्या मुडमध्ये!
बाकी सगळे पदार्थ पहिल्या फटक्यात जमणाऱ्या मला भाकरीचा अपमानच सहन होईना. त्यात आपल्या लाडक्याने केलेला अपमान जिव्हारीच लागतो गड्या!
यूट्यूबचे व्हिडीओजही भाकरीसमोर फेल जातात.
ती यायची ती अगदी मानानं, रांधायच्या अनुभवांची
सगळी फिज भरल्यावर!
वाटेतल्या सगळ्या चुका आपल्या तोंडावर कडक भाकरीसारख्या मारून मग ती येणार!
पण आली की कशी थपथप तालांत नाचत, वर लावलेल्या पाण्याचा काळजांत चुर्रर्र् बॅकग्राऊंड स्कोअर करत अगदी चंद्रासारखी यायची!
आकारानं गोलगरगरीत अन् दिसायला शुभ्र!
चवीला गोडम् गोड!
मग तिचा मोह कसा बरं सुटावा!
अन्नपूर्णेला नमन करून थापायला घेतलं.
मग शेवटी आजचा सोन्यासारखा सूर्य उगवला अन् चंद्रासारखी सुरेख भाकरी तव्यावरून ताटात घेऊन आला!!!!
अथक चुकांनंतर, आज त्या सगळ्या टाळून कडेकडेने आपली वाट आपणच थापत जात शेवटी मी भाकरीत चंद्रदर्शन केलंच!
टम्म फुगलेली भाकरी बघून धीर काही निघेना.
ताटात घेतली आणि मधली वाफ अनुभवायला भस्सकन फोडलीच!
भर्रकन तुपाच्या धारेचा अभिषेक केला अन् तोंडात घास घेत स्वाहा म्हटलं.
आई गं!
तीच चव! आई-आजीच्या हातची….
भारतातून इकडे माझ्यासोबत पळवून आणलेली!
हाताला कपडा बांधून बसून भाकऱ्या करणारी आजी अन् दूधात कुस्करून
“आता तुझी भाकरी गोड कशी होते याची गंमत बघ”
म्हणत घास भरवणारी आई ह्या सगळ्यांच्या रूचकर आठवणी भाकरीच्या चवीतून पोटात गेल्या.
आता किचनच्या कट्ट्यावर “बल्लवाचार्य प्रज्ञा” म्हणून बोर्डच लावते कसा! असा मोह झाला पण बल्लवाचार्य म्हणजे काय हे इथल्या लोकांना सांगण्यात जन्म जायचा बाई म्हणून जाऊदे म्हटलं.
नवऱ्याने भाकरी खाल्ली , क्षणभर डोळे मिटून माझ्या हातातलं ताट घेऊन खात टेबलवर गेला. भाकरीवर तुटून पडला!
शब्द लांब गेलेत आठवले की सांगतो गं म्हणाला.
केवढं बाई कौतुक करून गेला!
मी मात्र टम्म भाकरीच्या वाफेवर तरंगत, उडत, फिरत, हसत, नाचत, गात!
बाकी जगाचे फोटो काढणारी मी आज अथक प्रयत्नांनी सेलिब्रेटीसारख्या घरी आलेल्या भाकरीवर अधाशासारखी तुटून पडले आणि फोटो टिपायचा राहिला.
पण अन्नपूर्णादेवीनं सांगितलंय आता तुझ्या किचनमध्ये रोज पौर्णिमेचा चंद्र उगवणार!
त्यामुळे फोटोसेशन वगैरे काय होत राहील!
- अमेरिकेत भाकऱ्या थापणारी बल्लवाचार्य प्रज्ञा
Comments
Post a Comment