Skip to main content

तिला पळताना पाहिलं मी



                                               


तिला पळताना पाहिलं मी

वाकडं तिकडं, सरळ, वाट फुटेल तिकडे

पायाला जिथे जमीन लागतेय,

वर आकाश दिसतंय त्या दिशेनं

बेफाम पळत सुटलेली!

पायाखालून कित्येक तलावं, कित्येक नद्या, डोंगरं, समुद्रं,

महासागरं, पर्वत, गावं, नव्या वाटा, रस्ते मागे पडले

हे सगळं मी लहानपणी पुस्तकांत पाहिलंय म्हणाली.

तेंव्हा खिडकीबाहेर एक हौद दिसायचा.

जग दिसेल याचा प्रश्नच नव्हता.

हौदातलं एवढंस पाणी तिला आठवलं होतं जेव्हां तिने

विमानातून खाली निळाशार भव्य अटलांटिक पाहिला होता.

तेंव्हाच्या चिमुकल्या डोळ्यांना हौद मोठा वाटला होता.

आता नजरेनी अख्खा महासागर प्यायली होती.

स्वतःच्या डोक्यावर थापटत होती.

मधून रडत- हसत होती.

हे राहिलं होतं करायचं हसत म्हणाली.

नदीत स्वतःचा चेहरा बघत बसली होती.

स्वतःच्या थोडी प्रेमात पडली होती.

किती पळशील अजून विचारलं तर म्हणाली,

आता नसते थांबत मी!

पायातली वेडी ताकद थोपून धरली होती एवढे दिवस,

आता सोडले पाय मोकळे

केवढा मोठा प्रवास पडलांय पुढ्यात

आता थांबून चालायचं नाही.

वारं पिल्यागत दौडत गेली.

 

खूप लांब. खूप दूर.

तिला नेहमीच जिकडे जायचं होतं तिकडे…

-प्रज्ञा

Comments

Popular posts from this blog

बातम्यांच्या ढिगाऱ्याखालचं बोथट मरण

रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे. एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली, “सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!”  मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत. वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता.  दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती.  आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं ...

आमच्या मिशलीन भानगडी

आजवर आम्हा दाम्पत्याला दोनदा मिशेलिन स्टार रेस्टोरेंटमध्ये खाण्याचा योग आला. मजा अशी की दरवेळी खाताना किंवा खाऊन झाल्यावर आम्हाला ते रेस्टोरेंट मिशेलिन स्टार प्राप्त आहे हे कळले आहे. पहिला अनुभव इटलीत घेतला आणि दुसरा सॅन फ्रान्सिस्कोत! पहिलं रेस्टॉरेंट इतकं ऑथेंटीक इटालियन होतं की तिथल्या कुणाला इंग्लिशही येत नव्हतं. तो अनुभव नंतर आज हा सॅन फ्रान्सिस्कोमधील! एक तर ह्या शहरात अप्रतिम चवीच्या पदार्थांची रेलचेल आहे. त्यात हे भारतीय पदार्थांचं रेस्टॉरेंट आणि त्याला मिशेलिन स्टार!! किती सुरेख गोष्ट! तर! सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आमच्या हॉटेलजवळ पाचच मिनीटांवर हे रेस्टॉरेंट होतं. तिथे फिल्टर कॉफी मिळते हे कळलं आणि तिकडे निघालो. बाहेरून आतील रेस्टोरेंटचा अंदाज येत नव्हता पण आत गेलो तर एक सुरेख सजवलेली स्पेस होती. तिथे बसून नीट निरखल्यावर कळलं की कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये दक्षिण भारताच्या खुणा सांगणार्‍या वस्तू चित्रे सजवली होती. ते मॉडर्न आणि पारंपरिक मिश्रण इतकं बेमालूम जमलं होतं की ते रेस्टोरेंट नेमकं कुठलं कळत नव्हतं.  आमचा पुढचा दिवस आखलेला होता त्यामुळे जागा नाही तर बार चेअर चालेल म्हणून बार ...

शिवपार्वती पतये

  ज -  माझ्या आवडत्या देवांत महादेव सगळ्यात वर आहेत. प्र -  का रे? ज -  शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. तिला काही झालं तर ब्रम्हांड उलथं पालथं करून टाकतात. वैराग्यवस्था फक्त तिच्यासाठी टाकून गृहस्थ होतात. मला त्यांचं प्रेम माझ्या खूप जवळचं वाटतं. प्र -  तू तसाच आहेस न म्हणून! ज - ओहोहो ! बिग वर्ड मई बिग वर्ड !! प्र -  अरे खरंच की. प्रेम करणं तर झालंच पण व्यक्तिशः पण शिवतत्व जागृत आहे तुझ्यात. जगाच्या टीका वा कौतुकाची पर्वा नसलेला. आपल्या स्पेसमध्ये ध्यानस्थ असल्यासारखा आपलं काम करत राहणारा. ना आपलं कर्तृत्व कुणाला सांगणारा ना कधी कौतुकाची अपेक्षा करणारा, किंचित गर्व नसणारा. अतिशय कंटेंट असलेला माझा शिव! ज -  त्याचं कारण माझ्या आजूबाजूला आहे. माझी शक्ती मला इतकं दणदणीत साजरं करते की मला कधी दुसऱ्याच्या कौतुकाची गरजच पडत नाही. तिने माझा हात पकडला की जगात काहीही करू शकेन एवढा आत्मविश्वास आपोआप येतो. जगाचे लाख शब्द आणि मईचा एक शब्द असा रेशो आहे. त्यामुळे मी शांत, समाधानी, कंटेंट राहणं साहजिक आहे. देवीतत्वासोबत राहतो मी, कुणाच्या टीकेची काय पर्वा मला! परत सांगतो...