एका हृदयात किती शहरं मुक्काम करत असतील?
होय हृदयात!
आपण एखाद्या गावी वा शहरी वास्तव्याला जातो तसंच शहरंही राहतातच की आपल्या मनात मुक्कामी!
कधी तिथल्या आठवणींच्या रूपात,
कधी तिथे जाण्याच्या स्वप्नांच्या रूपात,
तर कधी अनुभव/ पैसा/प्रेम इत्यादीचं घबाड हाती लागल्याच्या रूपात…
प्रत्येकाला कुठे ना कुठे जायचं असतं.
म्हणजे जागेच्या संदर्भातच नव्हे.
अगदी काळाच्याही बाबतीत!
कुणाला सतत भूतकाळात जायला आवडतं,
तर कुणाला भविष्याची आस असते.
कुणाला करीयर वा आर्थिकदृष्ट्या वरच्या पोझीशनवर जायचं असतं,
कुणाला शेजारच्याहून पुढे जायचं असतं,
कुणाला घरापासून दूर जायचं असतं,
कुणाला घरी जायचं असतं.
तर कुणाला सगळ्यांपासून लांब कुठे तरी पळून जायचं असतं. पण प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी जायचं जरूर असतं.
आहे त्या क्षणात ,आहे तिथे, आहे तसं जगणारे अगदी दुर्मिळ!
गावं किंवा शहरही कुठे कुठे जात असतात बरं!
कधी जगाच्या नकाशावर,
कधी कुणा दूसऱ्या देशाच्या इतिहासात हिरो म्हणून किंवा व्हिलन म्हणूनही!
कधी एखाद्या पुस्तकात, कधी कुणाच्या छायाचित्रात,
कधी कुणाच्या यशाच्या पायऱ्यांवर वा कधी एखाद्याच्या अपयशाच्या घसरगुंडीवर!
कधी एखाद्या सिनेमात तर कधी एखाद्याच्या बकेट लिस्टमध्ये!
अशी ही गावं कधी कधी मनात राहतात, रेंगाळतात आणि आपलीच होऊन जातात.
माझ्याबाबतीत हे नेहमी होतं.
मला शहरं माणसांसारखी वाटतात.
प्रत्येक शहराला इतिहास, भुगोल, हवा, आकार, गती, वृत्ती, राजनीती, प्रगती, संस्कृती असते.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर बसावं तसं माझं प्रेम शहरावर बसतं.
शहर म्हणजे तिथला सत्तारूढ पक्ष का?
नाही.
शहर म्हणजे इतिहासाच्या खुणा मिरवत भविष्याकडे धावणारी कविता!
या कवितेचे नायक- खलनायक बरेच,
श्रोते वा प्रेक्षकही बरेच पण यमक जुळवणारा कवी एकच -
खुद्द शहर!
या शहरांच काव्य ऐकू आलं की मग आपसूक प्रेमात पडतो आपण!
प्रत्यक्षात कधी न गेलेल्या शहरांनी पण मुक्काम केलाय मनात!
त्यांना प्रत्यक्ष भेट देईन तेंव्हा आधी मिठीच मारेन मी घट्ट!
मग त्यांचं काव्य त्यांच्या तोंडून ऐकेन आणि त्याला माझी माझी एक चाल लावून आमचं एक गाणं करीन.
या गाण्याचा प्रत्येकाचा भाव वेगळा!
गाणं आठवलं की हा भाव आठवेल.
भाव कुठून येईल तर तिथे आलेल्या अनुभवांवरून!
जसं की
माझं आणि सोलापूरचं गाणं म्हणजे एक गोड अंगाई गीत आहे.
माझं आणि पुण्याचं गाणं म्हणजे कधी संपूच नये वाटणारी एक नाटकाची नांदी आहे.
माझं आणि मुंबईचं गाणं म्हणजे एक माऊथ ऑर्गनवर वाजणारं स्वप्नाळू स्फुरणगीत आहे.
माझं आणि मी आत्ता राहते त्या फिनीक्सचं गाणं म्हणजे मला परिचीत नसलेलं पण आवडलेलं अन् मी ठेका धरलेलं मेक्सिकन जॅझ म्युझिक आहे.
आणि मी आता नाताळ साजरा करायला जिथे चाललेय त्या शहराने मनात आधीच घर तर केलंयच पण फ्रॅंक सिनात्राच्या आवाजात गातंय हे शहर त्याची धून माझ्या कानात!
जगभरातून ! होय जगभरातून लोक येतात त्याने साजरा केलेला नाताळ पाहायला.
मला ह्या माणसांना पाहायचं कारण जगभरातून आलेल्या ह्या लोकांना पाहणं म्हणजे एका क्षणासाठी एकाच फ्रेममध्ये जग पाहिल्यासारखं आहे.
आणि ह्या माणसांच्या गर्दीत शहराच्या खुणा शोधायच्या आहेत.
या शहराचा इतिहास वाचून मग चाललेय त्याला भेटायला कारण पुढच्या वर्षी त्याचा ४००वा वाढदिवस आहे आणि एवढ्याच वर्षात जगाच्या छातीवर आर्थिक राजधानी म्हणून गॉगल घालून कडक फॅशनमध्ये बसलेलं हे शहर माझं कुतूहल जागं न करतं तरच नवल!
खूप सत्तांनी त्याच्यावर राज्य केलं पण सगळ्या शृंखला झुगारून ,स्वातंत्र्यदेवीची पूजा मांडून, आकाशाला भिडणाऱ्या त्याच्या कर्तृत्वाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या तळपत्या इमारतींनी जणू त्यानं जगाचे डोळेच दिपवले!
त्याच्या कवितेत जगातल्या सगळ्या भाषा आहेत.
स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना जणू ते शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला,
“ तु तुला पाहिजे तसं जग!
इथं तुला कुणी काही बोलणार नाही”
असं सांगतं त्यामुळे बऱ्याच अतरंगी लोकांना पाहण्याची नामी संधी आहे!
त्याच्या या स्वभावामुळेच जगातल्या लोकांना त्याच्याकडे यावं वाटतं त्यात नवल काय!
बिलेनियर्सपासून ते अगदी बेघर लोकांपर्यंत सगळ्यांना त्याच्या दारात जागा!
माझं आणि जयचं हे वर्ष इतकं धामधूमीत आणि धूमधडाक्यात गेलंय की त्याचा शेवट गोड करायला ह्या मोठ्या सफरचंदाचा घास घ्यायचा मोह होणं स्वाभाविक होतं.
माझ्यासोबत या प्रवासात तुम्हालाही घेऊन जायच्या विचारांत आहे. पेन, मॅकबुक आणि कॅमेरा तिघांनीही तयारी दाखवली आहे.
फक्त माझ्यातला आळस ख्रिसमसच्या सुट्टीवर गेला की झालं मग!
भेटूयात!
तोवर नाताळच्या रोशनाईसारखं आयुष्य झगमगूदे
- नव्या शहराच्या प्रेमात पडलेली प्रज्ञा
Comments
Post a Comment