Skip to main content

जिया रा धाकधुक होये

 जिया रा धाकधुक होये



रमाताई विमानात बसल्या आणि कानात हेडफोन्स घातले तर इंग्लीश विंग्लिशमधलं गाणं वाजलं.

त्यातल्या काही ओळी ऐकून खरं तर त्यांचे डोळेच भरून आले.

“पियाबीन दिल लगे ना मन मा लागे चैन, कैसे जाऊ मै पराये देस”


अगदी त्यांच्या आयुष्यावरच बेतलेल्या ओळी वाटतं होत्या. 

दिनेशराव गेले त्यालाही आता बरीच वर्षे उलटली होती. अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार! 

एकुलता एक आणि हुशार मुलगा पदरात टाकून ते अनंताच्या प्रवासास निघून गेले आणि खरंच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली.

स्वभावाने त्यांच्यासारख्याच असणार्‍या आणि कुशाग्र बुध्दीच्या त्यांच्या मुलाने, सत्याने

वडीलांसारखा हुशार इंजिनियर होऊन आणि त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले. 

आयटीची पंढरी मानल्या गेलेल्या अमेरिकेत जाऊन उच्चपदस्थ नोकरी मिळवली आणि रमाताईंनी

सत्यजितला वाढवताना केलेल्या कष्टाचे चीज झाले. मागच्याच वर्षी त्याच्यासारखीच गोड, गुणी,

हसरी मुलगी त्यांच्या घरी सून म्हणून आली आणि घर पुन्हा हसू खेळू लागलं.


अमेरिकेला जाताच सुनेने रमाताईंचा विजा काढायला घेतला आणि,

“आई आता वर्षाचे सहा महिने इकडे यायचं. पुढल्या सहा महिन्यात एकदा आम्ही भारताची वारी

करू” असं हट्टाने बजावलं. रमाताई मुलगी असण्याचं सुख पहिल्यांदा अनुभवून हुरळूनच गेल्या.

त्यांनीही सगळी प्रक्रिया मनापासून पूर्ण केली आणि आयुष्यातल्या पहिल्या विमानप्रवासास आणि

परदेशवारीस त्या निघाल्या.

कोथरुडमधल्या भजनी मंडळाने, नाटकाच्या ग्रुपने, भिशीच्या बायकांनी, वाचनालयातल्या स्नेहींनी,

‘रूपाली ज्येष्ठ नागरिक कट्टा’ अश्या सगळ्या समूहांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

रमाताई एक रसिक व्यक्ती होत्या, प्रचंड वाचन, वेगवेगळी प्रायोगिक- व्यावसायिक नाटके पाहणे,

सिनेमाच काय नव्या पिढीच्या वेब सिरीजेस पाहणे हे त्यांचे छंद होते. रसायनशास्त्रात पदवीधर

असल्याने त्यांचे इंग्रजी उत्तम होते. त्यामुळे इंग्रजी चित्रपट हाही त्यांच्या आवडीचा प्रांत होता.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी त्यांचे जमे. 

मुलगा बरीच वर्षे अमेरिकेत असल्याने त्यांना अमेरिकेचीही बरीच माहिती होती. पण आता यावेळी ती प्रत्यक्ष अनुभवताना त्यांना

वेगळीच मजा येणार होती.

बाजूच्या माने वहिनींनी निरोप घेताना मिठी मारली आणि म्हटलं,

“ नाही मन लागलं तर या बरं का काकू परत!! तुम्हाला आम्ही आहोत. 

पोरं-सुना काय हो नोकरीला जायची, तुम्ही घरात एकट्याच! त्या अमेरिकेत म्हणे म्हातार्‍या लोकांना सांभाळायची

पद्धत नाही. मुलं तरुण झाली की जातात घर सोडून. तुम्ही बाई उगा मन मारुन राहू नका,वाट्टेल तेंव्हा या परत!”

रमाताई म्हणाल्या,

“ नाही हो! मी एकटी पडेन अशी वेळच मुलगा आणि सून येऊ देणार नाहीत. आणि आलीच तशी

वेळ तरी माझी मी फिरेन की छान, मुलांना करू दे की काम, आपलं मनोरंजन ही आपली

जबाबदारी असते नाही का वहिनी”

त्यावर फक्त “हम्म!!” इतका मनाविरूद्ध हुंकार काढून माने वहिनींनी निरोप घेतला आणि

रमाताई निघाल्या.

विमानात बसल्यावर मात्र त्यांना दिनेशरावांची आठवण आली. आज ते असते तर अभिमानानी

फुलून गेले असते.

“ आई तुझ्या डोळ्यांनीच बाबा माझं यश पाहतात”

असं सत्या नेहमी म्हणतो. त्याच्यासाठी आपण अश्रू पुसायचे असं त्यांनी ठरवलं. तीन विमानं

बदलत त्या फिनिक्सला पोहोचल्या. विमान, विमानातली सेवा, विमानतळ आणि आता भली

मोठी कार घेऊन स्वागताला एयरपोर्टवर उभे असलेले मुलगा आणि सून बघून त्यांना काय करू

अन् काय नको असं झालं.

फुलांचा गुच्छ सुनेच्या हातून स्वीकारत त्या गाडीत बसल्या आणि प्रवासातल्या गमती जमाती

सांगू लागल्या. दुपारचे दोन वाजले होते पण त्यांच्या डोळ्यावर झोप अगदी पांघरूण घेऊन तयार

बसली होती. 

सत्या म्हणाला,

“आई आता घरी गेलीस की फ्रेश हो आणि छान झोपच काढ, काही दिवस तुला झोपेशी लपंडाव

खेळावा लागेल पण नंतर रूळशील अगदी!”

इतक्या झोपेतही रमाताईंना खिडकीतून दिसणारे अमेरिका दर्शन भुलवत होते. अधुन मधून

सुनबाईही,

“ आई हे पाहा वॉलमार्ट, आपल्या डिमार्टचा अमेरिकन मोठा भाऊ, हे होम डेपो, इधर सब फर्निचर

मिलेगा, हे कॉस्को, होलसेल मालाचं मोठं दुकानच जणू!!”

असं कौतुकाने सांगत होती आणि रमाताईही डोळ्यातली झोप दूर सारत पाहात होत्या.

घरी पोहोचले तसे घराच्या आसपासचा परिसर बघून त्यांचं मन अगदी प्रसन्न झालं. प्रशस्त दोन

मजली बंगला, समोर बाग, बॅकयार्डमध्ये स्वीमिंग पूल, रोस्टिंगसाठी लावलेले ग्रिल्स, भलं मोठं

पार्किंग!!!

किती कौतुक करू नी किती नको असं त्यांना झालं. शरद वर्दे त्यांच्या पुस्तकात म्हणतात,

“मुलाला भेटायला गेलेल्या आयांना अमेरिकेची झुळूक बरोबर लागते.”

हे असं वैभव पाहिल्यावर झुळूक नाही चांगलं वारं लागायला हवंय, त्यांच्या मनात आलं आणि

त्या स्वतःशीच हसल्या.

सत्या सामान काढत होता आणि त्या आजूबाजूचा परिसर न्याहाळत होत्या. समोरच्या घरावर

त्यांची रसिक नजर चांगलीच खिळली. युरोपियन पद्धतीचं ते घर, त्याची विंटेज वाटावी अशी

रचना, आजूबाजूची झाडं, खूप दिवसांत साफसफाई केली नाही असं वाटतं होतं पण त्याने त्याचं

विंटेज असणं आणखी अधोरेखित होत होतं.

रमाताई – “सत्या, अरे काय सुंदर घर आहे हे! अगदी कुठल्या तरी कथेतून उतरल्यासारखं वाटतंय.

किंवा एखाद्या सिनेमाचा सेटच जणू!”

सत्या – “आई अगदी कमाल करतेस! आत्ता तर म्हणालीस की माझ्या सत्याच्या घराहून सुंदर

काही असूच शकत नाही. आता लगेच पार्टीच बदललीस की! हाहाहा!”

रमाताई – “नाही रे! तुझ्या कष्टाने उभारलेलं घर माझ्यासाठी स्वर्गाहून अधिक सुंदर आहे. ह्या

घराच्या वेगळ्या रचनेनं माझं लक्ष वेधून घेतलं हे मात्र नक्की! कोण राहतं रे इथे?”

सत्या- “काही कल्पना नाही गं! आम्हीही इथे नव्यानेच आलोय. त्यामुळे सगळा शेजार काही

महितीचा झाला नाहीये. आणि तसंही इथे आपल्या भारतासारखे शेजारी नसतात. प्रत्येकाला

ज्याचं त्याचं आयुष्य जगायचं पडलेलं असतं. अरे हो! पण त्यामुळे तुला माने काकूंची आठवण

येऊ शकते बरं का!”

दोघेही खळखळून हसले आणि घरात गेले. सुनेच्या हातचा सुग्रास स्वयंपाक खाल्ल्यावर मात्र

रमाताईंनी निद्रादेवीला पाचारण केलं. इतकी गाढ झोप त्यांना यापूर्वी कधी लागली नसेल.

प्रवासाची दमणुक, मुलाच्या संसाराचं समाधान आणि जेटलॅग सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांचा ताबा

घेतला.


अमेरिकन ड्रीम्स नावाप्रमाणे स्वप्नवत चालले होते. एकदा मुलांचं रूटीन चालू झालं आणि

रमाताईंना मोकळा वेळ मिळू लागला. एके दिवशी पाय मोकळे करुन येते म्हणून त्या चालायला

बाहेर पडल्या. मुलाने आई अनोळखी लोकांशी जास्त बोलू नकोस आणि घराच्या आजूबाजूच्या

परिसरातच रहा अशी सूचना केली. ती सूचना मान्य करुन त्या घराबाहेर पडल्या.


पुन्हा एकदा समोरचं घर लागलं आणि त्या घरासमोर जरा अंमळ थांबल्याच. बागेत कुणी तरी

काम करतंय असं वाटलं आणि त्यांनी डोकावून पाहिलं तर एक गुबगुबीत, सोनेरी रंगाचे केस

असणारी वयस्कर स्त्री बागकाम करताना दिसली. तिनेही वळून पाहिलं आणि त्यांना हात उंचावून

हाय केलं. आपल्याच वयाची बाई पाहून त्यांनाही जरा बरं वाटलं. त्या जरा पुढे जाऊन तिला

म्हणाल्या,

“तुमच्या घराच्या प्रेमात पडले आहे मी”

अमेरिकन स्त्री – “ओह!! खूप धन्यवाद! माझं नाव कॅरन . हे कौतुक ऐकायला जॅक हवा होता.

त्याने तुम्हाला बसवून हे घर बांधण्यामागची सगळी कथा ऐकवली असती. हे घर म्हणजे माझ्या

नवऱ्याचं स्वप्न आहे.”

रमाताई – “अरे वाह! मला नक्की आवडेल त्यांच्याकडून ऐकायला”

कॅरन – “ओह डियर! आय विश तो इथे असता...मागच्या वर्षी मी त्याला गमावलं. आता मी इथे

एकटीच राहते. असो! तुमचा दिवस छान जाओ. कौतुकाबद्दल थैंक यू!!”


तिचा निरोप घेऊन रमाताई पुन्हा चालू लागल्या. एवढ्या सुंदर घरात ती वयस्कर स्त्री एकटीच

राहते हे ऐकून त्यानं वाईट वाटतं होतं. माने वहिनी म्हणाल्या तसं खरंच का असेल

हिच्याबाबतही? की मुलच नसेल हिला? खूप प्रश्न भेडसावत होते. पण संध्याकाळ झाली आणि

त्या घरी परतल्या.


दुसर्‍या दिवशी त्या पुन्हा वॉकला बाहेर पडल्या आणि कॅरन समोर आली. ह्यावेळी ती अगदी

निवांत वाटतं होती. तिनेच हसून रमाताईंना हाय म्हटलं. त्या इथे आत्ताच आल्या होत्या आणि

मुलाकडे राहतात हे कळल्यावर, “मग तुम्ही माझ्या घरीही वेळ घालवायला येऊ शकता, तसंही

तुम्हाला घर दाखवणं राहिलंय”, असं ती म्हणाली आणि रमाताई खूश झाल्या. “मी नक्की येईन”

असं म्हणून त्यांनी निरोप घेतला.


एके दिवशी वॉक करताना कॅरन दिसली नाही म्हणून त्यांनी स्वत:च जाऊन तिच्या घराची बेल

वाजवली. तर आत एप्रन घालून असलेल्या तिने दरवाजा उघडला.

“ओह नाईस! रामा तू”

असं त्यांचं नाव अमेरिकन धाटणीत उच्चारत तिने त्यांना आत घेतलं. 

“मी टि-केक बेक करत होते, आता तूच टेस्ट कर” असं म्हणून तिने रमाताईंना किचनमध्ये नेलं.

केक आणि कॉफीसोबत गप्पा दरवळू लागल्या. रमाताईंचं अस्खलित इंग्रजी ऐकून केरन भलतीच

खूश झाली होती. एकमेकांबद्दल जाणून घेताना दोघींनाही आनंद होत होता. ताईंनी त्यांचं

प्रवासवर्णन, मुलगा, सून, त्यांची उत्तम बडदास्त हे सगळं तिला खूप कौतुकाने सांगितलं. त्यावर

“ ओह डियर! यू आर ब्लेस्ड” असं ती सतत म्हणत होती.


ती एकटी का राहते हे तिला विचारायची रमाताईंची खूप इच्छा होत होती. पण त्या शांत

राहिल्या. काही वेळाने तीच म्हणाली.

“मागच्या वर्षापर्यंत माझंही आयुष्य असंच सुखी होतं. मी आणि जॅक एकमेकांवर खूप प्रेम

करायचो. आम्ही विसाव्या वर्षी लग्न केलं. सगळं जग एकत्र फिरलो. युरोप पाहायला गेलो तिथे

अश्या धाटणीचं घर पाहून जॅक प्रेमात पडला होता. त्याने तिथल्या घरांचे खूप फोटो काढून ठेवले.

आपण कधी तरी असं घर बांधायचं असं नेहमी म्हणायचा. मी चेष्टेवारी घेतलं त्याला प्रत्येक

वेळी, पण तो ठाम होता.

आम्हाला एक मुलगा झाला. त्यालाही आयुष्यात त्याचं प्रेम मिळालं. पण त्याच्या बायकोला

तिच्या गावी राहायचं होतं. त्यामुळे ते दोघेही मिलफर्डमध्ये तिच्या घरी राहतात. मी आणि जॅक

फीनिक्समध्ये आणि ते तिकडे! सुट्टीत त्यांच्याकडे जावसं वाटायचं पण ते मुलांना घेऊन सुटीवर

निघून जायचे. कधी कधी खूप एकटं वाटायचं पण आम्ही एकमेकांची दुनिया होतो.

आयुष्यभर पुंजी साठवत वयाच्या साठाव्या वर्षी त्याने हे घर बांधायला घेतलंच. 

एक एक कोपरा अगदी मन लावून त्याने सजवला. जेंव्हा इथे राहायला आलो त्या दिवशी तर अगदी खाली बसून

त्याने मला पुन्हा एकदा प्रपोज केलं,

“ प्रिय कॅरन, तुझ्या साथीने माझं सगळं आयुष्य सुखी झालंय. मरेपर्यंत मला साथ देशील ना?

आणि मी गेल्यावर ह्या घराचा सांभाळ करशील ना? असं म्हणून त्याने माझ्याकडून वचन

घेतलं. “

मागच्या वर्षी अपघातात तो गेला. मी खरोखर मरणापर्यंत त्याची साथ दिली......

आणि हियर आय एम, लुकिंग आफ्टर हीज ड्रीम होम!”


तिने रमाताईंकडे पाहिलं तर त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. दिनेशरावानंतर त्याही

घरात एकट्याच राहत होत्या. एकटेपण काय असतं ह्याची त्यांना कल्पना होती. त्यांचा मुलगा

आणि सून त्यांना ते जाणवणार नाही ह्याची काळजी घेत होते पण कॅरनच्या नशीबात तेही सुख

नव्हतं.


“ तू तुझ्या मुलाकडे का जात नाही?” त्यांनी विचारलं.

कॅरन म्हणाली,

”काय म्हणून जावं? आम्ही आमच्या आयुष्यात आमची प्रायव्हसी पुरेपुर उपभोगली, आता त्यांची

प्रायव्हसी भंग करायचा मला काय अधिकार?”

“ अगं पण तुला इथे एकटीला काही झालं तर काय करशील?”

“काहीही झालं तरी काय होणार आहे आता? मला आता जॅककडे जायचं आहे. त्याने माझ्याकडून

वचन घेतलं आहे म्हणून सांभाळतेय घर, नाही तर इथून कधीच सुटले असते. तसंही अमेरिकेत

किती तरी लोक माझ्यासारखे आहेत.”


आता हीच अवस्था भारतातल्या वयस्कर लोकांची होतेय, रमाताईंच्या मनात विचार तरळून गेला.

“ मी इथे असेपर्यंत तुला कंपनी द्यायला येत जाईन नक्की!” असं त्यांनी तिला म्हटलं. 

त्यावर कंबरेवर हात ठेवून,

“होय! मलाही खूप हलकं वाटलं बोलून. किती तरी दिवस वाटत होतं की कुणाला तरी आपण इथे

का असे राहतोय हे सांगावं म्हणून! आता तू माझी मैत्रिण झाली आहेस, तू मला कंपनी दिलीच

पाहिजेस.”

असं मान डोलवून ती म्हणाली आणि त्या दोघी खळखळून हसल्या.


दोघींची चांगली गट्टी जमली होती. जगभराच्या गप्पा, कधी पत्ते, कधी बेकिंग, कधी एकमेकांच्या

दु:खात डोळे पुसणे आता नित्याचे झाले होते. दोघींची आयुष्य दोन वेगळ्या देशात जरा फार

फरकाने एका समान रस्त्यावर चालली होती.


जगात एकटेपणाच्या खूप छटा असतात. कधी ते इच्छा नसताना आलेलं असतं तर कधी ते

स्वत:हून काही जणांनी स्वीकारलेलं असतं. एकाकीपण आणि एकटेपण वेगळं असतं हेच बऱ्याच

जणांना माहिती नसल्याने एकटे राहायला लागल्यावर नेमकं काय करायचं हे कळत नाही. 

आणि मग त्यातून ओढवतं ते एकाकीपण! अतृप्ततेचा प्रवास इथूनच चालू होतो. कॅरनकडे आयुष्य

जगायला जॅकला दिलेलं वचन होतं तर आपल्या पतीच्या अपूर्ण स्वप्नास पूर्ण करावं म्हणून

रमाताईंनी सत्याने अमेरिकेत राहण्याचा निर्णय आनंदाने स्वीकारला होता.


दुसऱ्या दिवशी दुपारी सत्याच्या घरात चविष्ट पदार्थांचा दरवळ सुटला होता. रमाताई खुद्द

रांधायला उभ्या होत्या. त्याला कारणही तसंच होतं. सत्याचा लहानपणीचा मित्र, अमित

जवळच्याच एका परिसरात राहत होता. तो त्याच्या लाडक्या रमा काकूंना भेटायला आणि

जेवायला घरी येणार होता. “जेवण रमा काकूंच्याच हातचं पाहिजे” असं तो फोनवर म्हणाला

आणि रमाताईही कौतुकाने सगळा स्वयंपाक रांधायला उभ्या राहिल्या.

दुपारभर फक्त गप्पा, आठवणी आणि सुग्रास जेवण यांचा चांगला फड जमला होता.

अमित – “घर बाकी तू एक नंबर घेतलस सत्या! काकू तुम्हाला आवडलं असेल नक्कीच घर”

सत्या- अरे तिला समोरचं घर जास्त आवडलंय, हो की नाही आई?”

अमित – अरे हो का! पण त्यांची काही चूक नाही. ते घर सुंदर आहेच. पण काय करणार! कहाणी

वाईट आहे त्या घराची...”

सत्या- “का रे काय झालं? म्हणजे आम्हीही नवीनच आहोत इथे, म्हणून विचारतोय माहिती

असावी म्हणून”

अमित- “ अरे मागच्या वर्षी तिथल्या वयस्कर जोडप्याचा कार अपघातात मृत्यू झाला. मुलगा

बॉडी क्लेम करायलाही आला नाही. काय एकेक तर्‍हा! इथे आपण भारतात आईवडील एकटे

म्हणून सतत अपराधी भावनेत जगतो, पण सगळ्यांची ती केस नाही. मग काय त्या दोघांना

कम्युनिटीने घराच्या मागच्या बागेत पुरलं.”


अमित जसं जसं हे बोलत होता तसं रमाताईंच्या चेहर्‍यावरचे रंग उडून जाऊन चेहरा पांढराफटक

पडला. अंगाला थरथर सुटली, ते बघून सत्या म्हणला,

“आई तुला दगदग झाली आज फार, जा तू विश्रांती घे! आम्ही मागचं आवरतो सगळं”


रमाताई काहीच न बोलता वरच्या खोलीत आल्या आणि घाबरून जाऊन त्यांनी पांघरूण ओढून

डोळे मिटले. काही दिवस त्यांची तब्येत नरमच होती. बोलणंही कमी झालं होतं. ते बघून सत्याने

एक दिवस त्यांना खोदून खोदून विचारलंच. त्यावर त्यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला. आणि

सत्या हसायला लागला.

“ अगं आई तुझा भास झाला असेल, आधी तू वेबसिरीज आणि हॉरर सिनेमे बघणं कमी कर

पाहू!”

पण सुनेला मात्र हे प्रकरण जरा वेगळं वाटलं. कारण रमाताई सगळी गोष्ट नावांसकट सांगत

होत्या. तिने सत्याला गुगल करुन त्या अपघाताबद्दल आणि घराबद्दल सर्च करायला लावलं

आणि ते सगळेच हादरले. कारण त्यांनी सांगितलेली खडा न् खडा माहिती खरी होती.

सत्या म्हणाला, 

“ हे सगळं खरं तर विश्वास ठेवायला मला खूप जड जातं आहे. पण जर खरंच

आत्म्याची वगैरे काही गोष्ट असेल तर तिने तुझं एकटेपण हेरून तुला कनेक्ट केलंय आई!

आजपासून आम्ही सोबत नसू तेंव्हा बाहेर पडू नकोस. आणि काही दिवस मी तुझ्यासोबत

झोपतो, काळजी करू नकोस.”


त्या रात्री सत्या त्यांच्या खोलीत झोपला. मध्यरात्री त्यांना तहान लागली म्हणून त्या उठल्या तर

खोलीची खिडकी जी समोरच्या घराच्या दिशेने होती तिथे धुक्याने पांढरट झालेल्या खिडकीवर

नाक दाबलेला कॅरनचा चेहरा!!!

“ तू माझी मैत्रिण आहेस ना!! तू मला कंपनी दिली पाहिजेस!! असं म्हणत मान डोलत असलेला

चेहरा त्यांना दिसला आणि त्यांनी जोरात “सत्या!!!!” म्हणत किंकाळी फोडली.


“आई! झाली का झोप? सत्या बाहेर गेला आहे.” असं म्हणत सुनबाई खोलीत आली.

रमाताईंचा चेहरा पाहून ती म्हणाली,

“ छान झाली आहे दिसतंय झोप! एयरपोर्टवरून सकाळी घरी आलात आणि दहा तास सलग

झोपलात आई तुम्ही, जेटलॅग कसा लागतो बघा ना!”


“ म्हणजे...हे सगळं...? स्वप्न? आज तारीख? अरेच्चा! मी आजच सकाळी अमेरिकेत आली

आहे?? हे सगळं स्वप्न होतं? बापरे!! इतकं जिवंत स्वप्न? स्वप्नात सत्या म्हणाला तसं भुताचे

सिनेमे बघणं बंद करायला हवं” चेहर्‍यावरचा घाम पुसत आणि हसत त्या पुटपुटल्या.

 

सुनेने “काही म्हणालात का आई?“ म्हणून विचारलं.

त्यावर त्या, “काही नाही गं, जरा विचित्र स्वप्न पडलं. जिया धाकधुक हो गया!!” असं हसत

म्हणत उठल्या.

आता त्यांना खूप रिलॅक्स वाटत होतं. स्वप्नात जेवढा ताण आला होता तो कुठल्या कुठे पळून

गेला. रात्र छान गप्पांमध्ये गेली. उद्या आईला इथले ग्रोसरी स्टोअर्स दाखवूया असा त्यांनी प्लॅन

केला.


त्यानुसार सकाळी ते सगळे निघाले. सत्या पार्किंगमधून गाडी काढत होता तेवढ्यात रमाताईंची

नजर पुन्हा त्या घराकडे गेली. त्यांना हसूच आलं. गाडीत बसल्यावर स्वप्न सत्याला सांगायचं

असं त्यांनी ठरवलं. तो मजा घेणार होता पण त्यांनाही मजाच वाटत होती. 

गाडी काढायला जागा मिळावी म्हणून त्या पुढे सरकत नेमक्या समोरच्या घराच्या खिडकीजवळ चालत गेल्या. 

सहजच त्यांनी जरा आत डोकावून पाहिलं आणि त्या नखशिखांत हादरल्या!!!

त्यांना स्वप्नात दिसलेली कॅरन, तिचा फोटो टेबलावर ठेवलेला आणि...आणि अंधार...


सत्या....आई....ए आई....अहो आई...

चक्कर...कॅरन...जॅक...अमेरिका.......पियाबीन...परदेस....जिया...धाकधूक...धकधक!


- प्रज्ञा जोशी 

Comments

Popular posts from this blog

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...

गुरू ईश्वर तातमाय

  गुरू ईश्वर तातमाय गुरूविण जगी थोर काय त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही. माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही. आजाराने त्रासलेला असल...