Skip to main content

ताज टी हाऊस आणि आम्ही

 


काल एका वेबसिरीजमध्ये या माझ्या लाडक्या जागेचं दर्शन झालं आणि आम्ही यावर्षीच्या भारतभेटीत इथे जाऊन आल्याची आठवण जागी झाली.


मुंबई शहराची माझ्यावर विशेष माया आहे असं मला वाटतं. अमेरिकेत येण्याआधी मी दोन कंपन्यांमध्ये काम केलं. दोन्ही कंपन्यांनी ट्रेनिंगसाठी मुंबईला बोलावलेलं. जवळपास सहा-सात महिने मी मुंबईत होते. माझ्यावर विलक्षण गारूड असणाऱ्या शहरांपैकी एक शहर ही मायानगरी आहे. मी पुस्तकांतून या शहराबद्दल भरभरून वाचलेलं! इथे राहणाऱ्या प्रत्येक वर्गाच्या आयुष्याबद्दल माझा थोडा अभ्यास होता. त्यामुळे मी मुंबईत राहायला आले तेंव्हा विस्फारलेल्या डोळ्यांमध्ये मुंबई भरभरून साठवत होते.

कुठल्याश्या पुस्तकात मी ताज टी हाऊसबद्दल वाचलं होतं. शनिवारी किंवा रविवारी बांद्र्यात चालत चालत भटकणे हे माझं रूटीन होतं. त्यामुळे तिथल्या कित्येक अफलातून जागा मला माहित आहेत. ताज टी हाऊसला मी पहिल्यांदा गेले तेंव्हा आत शिरायच्या आधीच त्या जुन्या पारशी घरात वसलेल्या या टीहाऊसच्या प्रेमात पडले होते. आत गेल्यावर प्रत्येक कोपऱ्यात पसरलेलं शास्त्रीय संगीत पाहून आपण चुकीच्या गोष्टींच्या प्रेमात पडत नाही याची खात्री पटली!

एका फ्रेंच शेफने आपल्या भारतीय पदार्थांना दिलेलं फ्रेंच रूपडं हाय टी प्लॅटरवर वाढलं होतं. जोडीला चहाप्रेमी माणसाचा आत्मा सुखावेल अश्या चवीचा केटलमधला वाफाळता चहा! मला आवडणाऱ्या विंटेज आर्किटेक्चर, चहा, खाणं-गाणं या सगळ्याच गोष्टी असलेली जागा मला न आवडती तरच नवल! तिथले पारसी मिंट आणि काश्मिरी सॅफ्रॉन हे आमचे चहाचे आवडते फ्लेवर्स आहेत. चहाची पावडर विकत घेणं ओघाने आलंच.

माझ्या मास्टर्सच्या डिग्री समारंभाला मी आईपपांना इथे घेऊन गेलेले. तिथल्या चहाची आठवण माझे वडील अजूनही काढतात. मी जेंव्हा जेंव्हा मुंबईला जाते, या जागी जरूर जाऊन येते. पहिला पगार झाल्यावरची मी, मास्टर्स झालेली मी, लग्नाआधीची व लग्न झालेली मी अशी माझी वेगवेगळ्या टप्प्यावरची रूपं मला तिथे एकत्र भेटतात.

तिथे शास्त्रीय संगीताच्या मैफिली होतात. झाकीरजींचा तबलाही तिथे विराजमान आहे. तो पाहिला की कानात उस्तादजींचे “वाह् ताज!” शब्द घुमतातच.

जयला मुंबई मी फिरवली आहे, त्यामुळे आजही आम्ही मुंबईत गेलो की तो बॅकसीटवर असतो आणि मी फ्रंटसीटवर मुंबईला फ्लाईंग किसेस देत त्याला मुंबई दाखवत असते.

या जागी मी एकटीने खूपदा गेलेली आहे. गेले की एक कोपरा पकडून तिथे वाजणारी निलाद्रीजींची सतार ऐकत काही तरी लिहायचे. याहीवेळी स्वतःला एक पत्र लिहून आले. आयुष्य असंच बदलत जावं आणि प्रत्येक भेटीत मी स्वतःला नवं पत्रं लिहून यावं ❤️

- प्रज्ञा






















Comments

Popular posts from this blog

पहिलं घर

घर कशाला म्हणायचा हा प्रश्न मला माझं सोलापूरचं घर सोडल्यापासून सतत पडत आलाय. नोकरीनिमित्त मी ज्या ज्या ठिकाणी गेले आहे आणि राहिले आहे ते प्रत्येक घर मला माझं आणि आपलं वाटलं आहे. त्या प्रत्येक घराने मला भरभरून प्रेम आणि यश दिलं आहे. आयुष्य झपाट्याने बदलत गेलं आणि आम्ही एका अश्या देशात आलो, ज्याला आपलं म्हणताना किंवा त्या देशाने आम्हाला आपलं म्हणत असतानाच आम्ही एक मोठा निर्णय घेतला आणि ह्या देशात आमच्या नावाचं एक घर उभं राहीलं.  पहिलं घर घेणं हा एवढा भावनिक निर्णय का असतो? विचार करत गेलं की समजतं, ही गोष्ट फक्त एका कागदावर सही करणं असतं का? पैसे देऊन तर आपण भाड्याच्या घरात पण राहतो मग स्वत:च्या नावावर असलेल्या घराची ही ओढ कसली? पृथ्वीवर माणूस उपराच म्हणतात, त्याच पृथ्वीच्या अवाढव्य गोलावर एक ठिपका माझा! मी इथे जगून गेलो, कष्ट करून गेलो, काही कमावून गेलो त्याचं हे प्रतिकात्मक रूप, असा विचार माणसं करत असतील का? की माझं म्हणजे जिथे मला काहीही करण्याचं स्वातंत्र्य! ह्या स्वातंत्र्याची ओढ त्यात असावी. कारण काहीही असलं तरी हा निर्णय भावनेने भरलेले असतो हे मात्र नक्की.  मध्यंतरी कुठे त...

बातम्यांच्या ढिगाऱ्याखालचं बोथट मरण

रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे. एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली, “सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!”  मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत. वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता.  दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती.  आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं ...

रिकामं घर आणि लेखकांची मैफिल

आमचं घर शिफ्टिंगचं काम संथ गतीने चालू आहे. मागच्या काही महिन्यात आम्ही इतकी धावपळ करतोय की आता शिफ्टिंगचं काम आरामात हळूहळू करतोय. तर सगळ्यात आधी प्रथेप्रमाणे नवीन घरी पुस्तकं गेली. आज पुस्तकांचा शेवटचा लॉट तिकडे नेल्यावर रिकाम्या हॉलमध्ये दोघे बसलो होतो.   पुस्तकांकडे प्रेमाने नजर फिरवताना, मला लक्षात आलं की ही पुस्तकं मी वेगवेगळ्या देशात, राज्यात, गावात खरेदी केलेली आहेत. मग त्यातले लेखक कवी पाहताना त्यांच्यात असलेलं साधर्म्य आणि फरक दिसू लागले. वैचारिक, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक, राजकीय सगळ्याच बाबतीत वेगवेगळी मते असलेली ही बुद्धिवान माणसं!   काही पुस्तकं मला इथल्या मित्रमंडळींनी भेट दिलेली आहेत तर काही अनोळखी पुस्तकप्रेमी लोकांनी दिलेली आहेत. सगळ्याच विषयांवरची पुस्तकं आहेत. काही लेखक कवी हयात आहेत तर बरेचसे या जगात आता नाहीत.    हा विचार डोक्यात घोळत असतानाच जय निघूयात म्हणाला आणि आम्ही दरवाजा बंद करून निघू लागलो. बागेकडे असलेल्या खिडकीतून उन्हाची तिरीप पुस्तकांच्या गठ्ठ्यांवर पडली होती. ते चित्र विहंगम दिसत होतं म्हणून का काय माहिती नाही, पण मला वाटलं, आम्ही इथू...