Skip to main content

मैफिल

                             

त्या असंख्य अखंडित स्वरांची बरसात माझ्या रोमारोमावर व्हावी ।

तार तिथे छेडली जावी अन कंपनांनी लय माझ्या गात्रागात्रावर धरावी ।

तबल्याच्या प्रत्येक थापेसम माझ्या दुःखावरली खपली निघावी ।

तारेतल्या झरझर चढणाऱ्या तानेप्रमाणे माझी जखम भळभळावी ।

अन मग प्रत्येक सुखदायी आलापासह माझ्या नेत्रांवर झडप बसावी ।

खर्जातून तारेत जाणाऱ्या त्या स्वरासम माझी अवस्था व्हावी ।

दुःखाच्या काळोखात बुडता बुडता सुखाची परमोच्च परमावधी गाठावी ।

शब्दांना स्वरांची, स्वरांना लयेची, लयेला तालाची अन त्या सगळ्यांना माझी भाषा समजावी ।

दुःख, आनंद , विरह, समाधानाने मिश्रित ती मैफिल सजावी ।

माझ्या आकारविकारांची समाधी लागवयास अवकाश की,

मैफिलीतली भैरवीसाठी शेवटची टाळी वाजावी ।

आणि अर्धवट नशेत झिंगलेल्या मला पुढच्या मैफिलीची

अन तुम्हाला प्रज्ञेचा पुढच्या लेखाची हुरहूर लागावी ।
- प्रज्ञा जोशी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पहिलं घर

घर कशाला म्हणायचा हा प्रश्न मला माझं सोलापूरचं घर सोडल्यापासून सतत पडत आलाय. नोकरीनिमित्त मी ज्या ज्या ठिकाणी गेले आहे आणि राहिले आहे ते प्रत्येक घर मला माझं आणि आपलं वाटलं आहे. त्या प्रत्येक घराने मला भरभरून प्रेम आणि यश दिलं आहे. आयुष्य झपाट्याने बदलत गेलं आणि आम्ही एका अश्या देशात आलो, ज्याला आपलं म्हणताना किंवा त्या देशाने आम्हाला आपलं म्हणत असतानाच आम्ही एक मोठा निर्णय घेतला आणि ह्या देशात आमच्या नावाचं एक घर उभं राहीलं.  पहिलं घर घेणं हा एवढा भावनिक निर्णय का असतो? विचार करत गेलं की समजतं, ही गोष्ट फक्त एका कागदावर सही करणं असतं का? पैसे देऊन तर आपण भाड्याच्या घरात पण राहतो मग स्वत:च्या नावावर असलेल्या घराची ही ओढ कसली? पृथ्वीवर माणूस उपराच म्हणतात, त्याच पृथ्वीच्या अवाढव्य गोलावर एक ठिपका माझा! मी इथे जगून गेलो, कष्ट करून गेलो, काही कमावून गेलो त्याचं हे प्रतिकात्मक रूप, असा विचार माणसं करत असतील का? की माझं म्हणजे जिथे मला काहीही करण्याचं स्वातंत्र्य! ह्या स्वातंत्र्याची ओढ त्यात असावी. कारण काहीही असलं तरी हा निर्णय भावनेने भरलेले असतो हे मात्र नक्की.  मध्यंतरी कुठे त...

बातम्यांच्या ढिगाऱ्याखालचं बोथट मरण

रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे. एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली, “सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!”  मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत. वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता.  दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती.  आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं ...

रिकामं घर आणि लेखकांची मैफिल

आमचं घर शिफ्टिंगचं काम संथ गतीने चालू आहे. मागच्या काही महिन्यात आम्ही इतकी धावपळ करतोय की आता शिफ्टिंगचं काम आरामात हळूहळू करतोय. तर सगळ्यात आधी प्रथेप्रमाणे नवीन घरी पुस्तकं गेली. आज पुस्तकांचा शेवटचा लॉट तिकडे नेल्यावर रिकाम्या हॉलमध्ये दोघे बसलो होतो.   पुस्तकांकडे प्रेमाने नजर फिरवताना, मला लक्षात आलं की ही पुस्तकं मी वेगवेगळ्या देशात, राज्यात, गावात खरेदी केलेली आहेत. मग त्यातले लेखक कवी पाहताना त्यांच्यात असलेलं साधर्म्य आणि फरक दिसू लागले. वैचारिक, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक, राजकीय सगळ्याच बाबतीत वेगवेगळी मते असलेली ही बुद्धिवान माणसं!   काही पुस्तकं मला इथल्या मित्रमंडळींनी भेट दिलेली आहेत तर काही अनोळखी पुस्तकप्रेमी लोकांनी दिलेली आहेत. सगळ्याच विषयांवरची पुस्तकं आहेत. काही लेखक कवी हयात आहेत तर बरेचसे या जगात आता नाहीत.    हा विचार डोक्यात घोळत असतानाच जय निघूयात म्हणाला आणि आम्ही दरवाजा बंद करून निघू लागलो. बागेकडे असलेल्या खिडकीतून उन्हाची तिरीप पुस्तकांच्या गठ्ठ्यांवर पडली होती. ते चित्र विहंगम दिसत होतं म्हणून का काय माहिती नाही, पण मला वाटलं, आम्ही इथू...