त्या असंख्य अखंडित स्वरांची बरसात माझ्या रोमारोमावर व्हावी ।
तार तिथे छेडली जावी अन कंपनांनी लय माझ्या गात्रागात्रावर धरावी ।
तबल्याच्या प्रत्येक थापेसम माझ्या दुःखावरली खपली निघावी ।
तारेतल्या झरझर चढणाऱ्या तानेप्रमाणे माझी जखम भळभळावी ।
अन मग प्रत्येक सुखदायी आलापासह माझ्या नेत्रांवर झडप बसावी ।
खर्जातून तारेत जाणाऱ्या त्या स्वरासम माझी अवस्था व्हावी ।
दुःखाच्या काळोखात बुडता बुडता सुखाची परमोच्च परमावधी गाठावी ।
शब्दांना स्वरांची, स्वरांना लयेची, लयेला तालाची अन त्या सगळ्यांना माझी भाषा समजावी ।
दुःख, आनंद , विरह, समाधानाने मिश्रित ती मैफिल सजावी ।
माझ्या आकारविकारांची समाधी लागवयास अवकाश की,
मैफिलीतली भैरवीसाठी शेवटची टाळी वाजावी ।
आणि अर्धवट नशेत झिंगलेल्या मला पुढच्या मैफिलीची
अन तुम्हाला प्रज्ञेचा पुढच्या लेखाची हुरहूर लागावी ।
- प्रज्ञा जोशी
खूप अप्रतिम.. 👍👍👍
ReplyDeleteThank you dear!
Delete