भरून गेलं होतं आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी
खूप दिवसांनी दाटून आलेलं डोळ्यांमधलं पाणी ।
एक देह पडला होता खरा त्या काळ्या ढगांखाली
कित्येक हळहळत होती तर कैक म्हणाली बाई सुटली ।
पार कोलमडून एक मात्र तिथं आकांत करत होती
त्या निपचित देहानं पडली होती तिची ती माय होती ।
पोरीच्या देहावरल्या भाजक्या खुणा बघून ह्रदय तिचं जळत होतं
'चुकून जळाली, त्यानंच जाळली' असं काहीबाही कानावर पडत होतं ।
सवाष्ण गेली म्हणून मळवट गच्च भरलेला तिचा लाल कुंकवानी
कोपऱ्यात एक बसलेला नशेत झिंगलेला त्या कुंकवाचा धनी ।
दरवाज्याआड एक भेदरलेलं पिल्लू घाबरून उभं होत
भीषण जळालेल्या त्या आईनामक देहाकडे त्याला कुणी जाऊ देत न्हवतं ।
सगळे तिला 'उठ की ग' म्हणून रडतायेत हे त्यानं टिपलं होत
तरी ती का उठत नाही ह्याच कोडं त्याला पडलं होतं ।
अचानक काहीतरी सुचलं होत,
रडून लाल झालेल्या चेहऱ्यावर हास्याच चांदणं पसरलं होत ।
कृष्णविवराच रहस्य जणू त्यानं शोधलं होत
आईकडे धावत एक पाऊल पडलं होतं ।
चुटक्या त्यानं वाजवल्या, क्षणभर खुदकन हसला
पटकन पळत जाऊन आजीपाशी बसला ।
आजीला म्हणाला ' मी सांगतो ना ग की तिला चटकन कसं उठवायचं,
तू हलकेच तिच्या कानात मला भूक लागलीये अस म्हणायचं' !
त्याक्षणी ते जळकं ऊर थोडंस धपापल्यासारखं वाटलं होतं
अनंतात विलीन झालेल्या त्या आईच काळीज कुठं तरी धडधडलं होतं....
-प्र. ज्ञा. जोशी
🙌👌
ReplyDelete👏👏
ReplyDeleteI cried!!
ReplyDelete❤️
Delete