सेंट्रल पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलो आणि रस्तात एका मॅनहोलवर “ मेड इन इंडिया ” असं दिसलं आणि पावले आपोआप थबकली. माझ्या भारतात बनलेली वस्तू! तसं आता अमेरिकेत भारतीय वस्तू किंवा माणसं नवीन राहिली नाहीत. सगळीकडे तुम्हाला ती दिसतात. पण माझ्यासारख्या नव्याने परदेशी आलेल्या माणसाला अजूनही कुठे भारतीय काही दिसलं तरी भरून यायला होतं. आपली भारतीय संस्कृती, समाज व्यवस्था, एकात्मता, मुल्ये ही इतकी दणकट आहेत की आपण भारत सोडून कुठेही गेलो आणि कितीही वर्षे राहिलो तरी आपल्यातलं भारतीयत्व सतत उफाळून येतच राहतं. मला इथे बरेच अमेरिकन लोक विचारतात, “ मग आता तुला भारत आवडतो की अमेरिका? ” मला एक तर कुठल्याही दोन देशांची तुलना कशी होऊ शकते हे समजत नाही कारण दोन्ही देशांची भौगोलिक स्थाने वेगळी, हवामान वेगळं, इतिहास वेगळा, आर्थिक गणिते वा व्यापार वेगळा, सीमा प्रश्न वेगळे, धार्मिकतेचे रंग वेगळे, मग कुठला देश चांगला हे कोण आणि कसं ठरवणार? आणि माझ्या भारतासोबत कुठल्याही देशाची तुलना असेल, देशच काय स्वर्गासोबत जरी स्पर्धा लावली तरी माझं हेच उत्तर असेल, “ जननी ...