Skip to main content

Posts

लक्ष्मी_येते_तेंव्हा

  #लक्ष्मी_येते_तेंव्हा तुम्ही कोणत्या वेळी कुठे आणि का असता याची उत्तरं देवाच्या वहीत आधीच लिहीलेली असतात. एका अनोळखी जोडप्याशी आमचा रस्ता क्रॉस होतो. त्यांची मनुष्यबळाची निकड कळते आणि पुर्वबंध असल्याप्रमाणे आम्ही त्या परिवाराचा भाग होतो. पूर्वओळख काहीही नाही, एकदाच झालेली भेट आणि त्यांच्या मुलीच्या “जन्माच्या” सोहळ्याचे आम्ही साक्षीदार होतो. रात्र भीतीत सरते, बाळ वेळेआधी जगात येऊ पाहातं, जीव घाबरा होतो पण देवाचं सगळं आधीच ठरलेलं असतं त्याप्रमाणे रामनवमीच्या दूसऱ्या दिवशी सकाळी ऊबदार दूलईत गोड बाळ हातात येतं. आम्ही बाळाचे नातेवाईक नाही, रक्ताचे नाते नाही. मित्रपरिवारात नाही पण आम्हाला त्याला जन्मतः हातात घ्यायचं पुण्य मिळतं. आमचा स्पर्श त्याला होतो. त्याच्या इथे येऊ न शकलेल्या नातेवाईकांच्या जागी आता आम्ही ऊभे असतो. त्यांचे भारतातले नातेवाईक फोनवर, समोर अजूनही भूलीत असणारी बाळाची आई मदतीसाठी थॅंक्यू थॅंक्यू म्हणत असतात. पण त्यांना हे कसं सांगावं की जन्माचा हा अभूतपूर्व सोहळा पाहायला आम्हाला सामील करून घेतलं त्यासाठी आम्हीच तुमचे आभार मानले पाहिजेत. होणारी मुलगी आहे म्हणून तिला जन्...

जेरॉड्स कॅफे आणि राग यमन

  #जेरॉड्स_कॅफे_आणि_राग_यमन मागच्या महिन्यात मला अमेरिकेत येऊन सहा महिने पूर्ण झाले आणि नवरा म्हणाला लेट्स गो ऑन अ डेट! त्याने मेसा गावातला एक झकास कॅफे शोधून काढला आणि आम्ही निघालो. तिकडे गेल्यावर पाहतो तर एक हिप्पी वाईबचा, जागोजागी कलाकृतींनी भरलेला कॅफे होता. तिथे एक स्टेज सजवलं होतं. समोर काही खुर्च्या वगैरे मांडून ठेवल्या होत्या. आमचं खाऊन झालं आणि कॅफे चालवणारा माणूस आमच्या टेबलवर येऊन म्हणाला की थोड्याच वेळात इथे ओपन माईक होणार आहे तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर बसा. खूप दिवसांनी मोकळं स्टेज आणि माईक बघून मला एक तर मोह आवरत नव्हता. मला स्टेजवर सगळ्यात जास्त बरं वाटतं. लहानपणी वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतल्याचं फळ! (क्रेडीट गोज टू आई ) नवऱ्याला म्हणलं आज सहा महिने पूर्ण झाले म्हणून मी गाणं म्हणणार! नवऱ्याला आधीच स्टेजची भीती! मी स्टेजवर उभारणार म्हणलं तरी त्याची धडधड वाढली! पण तरी बिचारा, या अमेरिकी पब्लिकला रूचेलंसं म्हण काही तरी म्हणाला! मी गाडीत कोक स्टुडीओचं पसूडी गाणं ऐकत आलेले, तेच म्हणू असं ठरवून मी फळ्यावर नाव लिहायला गेले! तोवर फळा भरलेला. पहिलं स्थान मोकळं दिसलं. पट...

माणसांचं_मॅगनेट

 माणूस ज्या वातावरणातून आलेला असतो त्या वातावरणाचा त्याच्यावर तगडा प्रभाव असतो. जरी पुढे आयुष्य वेगवेगळ्या वळणातून जात राहीलं तरी आपला एक ठाम ढाचा तयार झालेला असतो त्याच्या मूळ रुपात फारसा फरक पडत नाही असं मला वाटतं. मी ज्या वातावरणातून आले ते आणि आत्ता आहे ते वातावरण एकदम टोकाचं विरुद्ध! म्हणजे भौगोलिक रित्या तर आहेच पण सगळ्याच अर्थाने खूप फरक आहे. पण मी म्हणाले तसं की आपल्या स्वभावाचा मूळ ढाचा बदलत नसतो.   माझा जन्म एका माणसांनी भरलेल्या वाड्यात झाला. हेही थोडके म्हणून आजोबांचा आणि वडीलांचा व्यवसाय असा की ज्यात घरी रोज खूप माणसे यायची. ज्या भागात राहायचो तिथे सगळे जवळचे दूरचे पण नात्यातलेच लोक, त्यामुळे घराची व्याख्या आणि त्याचा आवाका मोठा. घरच्या बायका म्हणजे आई आणि आजी इतक्या प्रसन्न आणि हसऱ्या होस्ट की घरी नातेवाईकांचाही सतत राबता असे.   माझ्या वैयक्तिक आयुष्यात ही सगळी मंडळी, शाळेतले कॉलेजातले दोस्त, वक्तृत्वाशी संबंधित लोक, नाटकाशी संबंधित लोक, गाण्याशी संबंधित लोक, साहित्याशी संबंधित लोक, इंजीनियरिंगशी संबंधित नंतर कंपनीशी आणि असा आवाका आयुष्यात फक्त वाढतच गेला. त...

न्यूयॉर्कनामा - भाग ४

सेंट्रल पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलो आणि रस्तात एका मॅनहोलवर  “ मेड इन इंडिया ”  असं दिसलं आणि पावले आपोआप थबकली. माझ्या भारतात बनलेली वस्तू! तसं आता अमेरिकेत भारतीय वस्तू किंवा माणसं नवीन राहिली नाहीत. सगळीकडे तुम्हाला ती दिसतात. पण माझ्यासारख्या नव्याने परदेशी आलेल्या माणसाला अजूनही कुठे भारतीय काही दिसलं तरी भरून यायला होतं. आपली भारतीय संस्कृती, समाज व्यवस्था, एकात्मता, मुल्ये ही इतकी दणकट आहेत की आपण भारत सोडून कुठेही गेलो आणि कितीही वर्षे राहिलो तरी आपल्यातलं भारतीयत्व सतत उफाळून येतच राहतं. मला इथे बरेच अमेरिकन लोक विचारतात,  “ मग आता तुला भारत आवडतो की अमेरिका? ”  मला एक तर कुठल्याही दोन देशांची तुलना कशी होऊ शकते हे समजत नाही कारण दोन्ही देशांची भौगोलिक स्थाने वेगळी, हवामान वेगळं, इतिहास वेगळा, आर्थिक गणिते वा व्यापार वेगळा, सीमा प्रश्न वेगळे, धार्मिकतेचे रंग वेगळे, मग कुठला देश चांगला हे कोण आणि कसं ठरवणार?    आणि माझ्या भारतासोबत कुठल्याही देशाची तुलना असेल, देशच काय स्वर्गासोबत जरी स्पर्धा लावली तरी माझं हेच उत्तर असेल,   “  जननी ...

न्यूयॉर्कनामा - भाग ३

 #न्यूयॉर्कनामा #भाग_३ हॉटेलमध्ये अंगावर चढवलेल्या तीन शर्ट्स, तीन पँट्स, हातमोजे, पायमोजे, कानटोपी यांची दणकट मदत झाली होती. बाहेरची थंडी जाणवत असली तरी झोंबत नव्हती.  आम्ही एका कॉफी शॉप मधून कॉफी पिक करुन चालत चालत पिझ्झेरिया शोधत निघालो. आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात चहाच्या टपऱ्या दिसतील तेवढ्या प्रमाणात इकडे कॉफी शॉप आणि पिझ्झेरिया दिसतात. लोकांना तिथेही ते बसून खायला वेळ नसल्याने हातात कॉफी कप्स घेऊन ते झपाझप चालताना दिसतात.  न्यूयॉर्कचा पिझ्झा जगत् फेमस आहे. मी आणि जय दोघीही पिझ्झाप्रेमी आहोत. आम्हाला आपलं सात्विक मराठी जेवण सगळ्यात प्रिय असलं तरी जगातल्या सगळ्या चवी ट्राय केल्या पाहिजेत या मताचे आम्ही असल्याने बाहेर असलो की ज्या त्या प्रांताचं  विशेष आवडीने खातो. त्यात दोघेही शाकाहारी असल्याने मांसाहार करणाऱ्या लोकांएवढे ऑप्शन्स मिळत नाहीत पण सगळीकडे वेज ऑप्शन्स असतात हे विशेष! तर एके ठिकाणी पिझ्झाचे तुकडे घेऊन ते चघळत आम्ही सेंट्रल पार्क गाठायचा प्लॅन केला, अर्धा दिवस आधीच सरला असल्याने उरलेला दिवस कसा सत्कारणी लावता येईल याकडे आमचा भर होता. एकच ठिकाण आज उरकणार...

न्यूयॉर्कनामा - भाग २

#न्यूयॉर्कनामा  #भाग_दोन फिनिक्समधून आमचं रात्री विमान होतं. इकडे ज्या ज्या अमेरिकन लोकांना आम्ही न्यूयॉर्कला जातोय हे माहिती होतं त्यापैकी बरेच लोक कधी अमेरिकेच्या पूर्व भागात गेलेच नव्हते. त्यातलाच एक आमचा कॅब ड्रायवर होता. आमच्यापेक्षा जास्त त्याला आम्ही न्यूयॉर्कला जातोय म्हणून उत्सुकता वाटत होती. आम्हाला खूप शुभेच्छा देत माझ्या हातातलं सामान, “तू नको उचलूस” म्हणून आपण घेत अगदी दारापर्यंत सोडवायला आला. मी त्याला म्हणलं, की आमच्या घरचा माणूस आम्हाला सोडायला आलाय अशी भावना येतेय तुला बघून, त्यावर प्रसन्न हसून तुमचा प्रवास सुखरुप होवो म्हणून निघून गेला.   कोण कुठली माणसं ही?  पण माणसाला माणसासाठी माणसासारखा आनंद होणारी!  आमच्या त्यांच्यात संबंध काय तर माणूस असण्याचा!  पुढे आम्हाला भेटणाऱ्या फार गोड माणसांच्या गोष्टीची ही नांदी होती. विमानात बसलो आणि मी कुठला सिनेमा पाहायचा म्हणून स्क्रिन पाहात होते, तेवढ्यात विमान फिरुन वगैरे रनवेला लागलं होतं. माझं बाहेर अजिबात लक्ष नव्हतं, पण जय पूर्ण वेळ माझ्याकडे पाहात होता, मी विचारलं काय झालं तर हसून म्हणाला, की पहिल्यांद...